Menu Close

गंगापूर (जिल्हा संभाजीनगर) : छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या हातातील तलवारीची चोरी !

तलवार चोरून छत्रपती शिवाजी महाराजांची अशा प्रकारे विटंबना केली जाणे, हे सरकारला लज्जास्पद आहे ! अशांचा तातडीने शोध घेऊन त्यांच्यावर सरकारने कठोर कारवाई करावी, अशी जनतेची अपेक्षा आहे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात

२७ जुलैपासून सहस्रो शिवप्रेमींकडून पुतळ्याच्या पायथ्याशी आमरण उपोषण चालू

shivaji_maharaj

संभाजीनगर : गंगापूर येथील साखर कारखान्याच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या हातातील तलवार २१ जुलै या दिवशी चोरीला गेली. या प्रकरणी नागरिकांनी वरिष्ठ पोलीस अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि पोलीस प्रशासन यांनाही सांगितले; मात्र अजूनही त्यांनी कोणतीही कारवाई न केल्याने तालुक्यातील शिवप्रेमींनी संतप्त होऊन २७ जुलैपासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या पायथ्याशी सकाळपासून सहस्रोंच्या संख्येने आमरण उपोषणास प्रारंभ केला. (केवळ उपोषण करून वाट पहाण्यापेक्षा संबंधित आरोपींवर कारवाई करण्यासाठी पोलीस प्रशासनाचा पाठपुरावाही घ्या ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) या वेळी शिवप्रेमींनी काही मागण्याही मांडल्या आहेत. मागण्या मान्य न झाल्यास याचे पडसाद महाराष्ट्रभर उमटतील, अशीही चेतावणी शिवप्रेमींच्या वतीने देण्यात आली आहे. एवढे होऊनही पोलीस प्रशासन गुन्हा प्रविष्ट करत नसल्याने शिवद्रोही मोकाट असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

१. गंगापूर साखर कारखान्याच्या आवारात वर्ष १९९४ मध्ये लोकवर्गणीच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्‍वारूढ पुतळा बसवण्यात आला होता. हा कारखाना गेल्या १० ते १५ वर्षांपासून बंद अवस्थेत आहे. केवळ निवडणुकांच्या कालावधीतच तो गजबजलेला असतो.

२. झालेल्या प्रकाराविषयी येथील आमदार आणि कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत बंब यांनी कोणतीही कारवाई केलेली नाही.

३. संभाजीनगर येथे जामगाव सहकारी साखर कारखान्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आरंभण्यात आलेल्या या आमरण उपोषणात शिवप्रेमींनी सहभाग घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

आमरण उपोषणास बसलेल्या शिवप्रेमींच्या मागण्या

१. प्रशासनाने तात्काळ आरोपींना अटक करावी.

२. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची दुरस्ती करून पुतळ्याचा शासकीय जीर्णोद्धार करावा.

३. पुतळ्याच्या परिसरात तातडीने क्लोज्ड सर्किट टीव्ही कॅमेरे बसवावेत आणि २४ घंटे सुरक्षारक्षकही नेमावा.

४. पुतळ्याच्या कठड्यावर ग्रील बसवून सुरक्षा जाळी लावून सुशोभीकरणही करावे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *