Menu Close

श्री विठ्ठल मंदिरातील शेकडो वर्षांच्या धार्मिक परंपरा मोडणारी शासकीय समिती विसर्जित करा !

पंढरपूर येथे धरणे आंदोलनाद्वारे विठ्ठलभक्त आणि धर्माभिमानी यांची मागणी

pandharpur_andolan
आंदोलनात सहभागी झालेले हिंदुत्वनिष्ठ आणि वारकरी

पंढरपूर : येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीकडून सध्या अनागोंदी, भ्रष्ट आणि मनमानी कारभार चालू आहे. मंदिर समितीने प्रक्षाळपूजेची पंचांगानुसार काढलेली तिथी मनाने पालटली. मंदिर समितीच्या गोशाळेतील गैरकारभारामुळे गेल्या काही मासांत अनेक गायींचा मृत्यू झाला. मृत गायींच्या पोटात अनेक किलो प्लास्टिकही सापडले आहे. त्याच जोडीला संत नामदेव पायरी, तसेच प्रवेशद्वार येथे सुरक्षारक्षक बूट किंवा चपला घालून जातात. त्यामुळे मंदिराचे पावित्र्य भंग होत आहे. मंदिरातील धार्मिक विधी, रुढी-परंपरा, देवाचे राजोपचार पूर्ववत् होण्यासाठी शेकडो वर्षांच्या धार्मिक परंपरा मोडणारी शासकीय समिती विसर्जित (बरखास्त) करणे, या मागणीसाठी ३० जुलै या दिवशी सकाळी ११.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक, टांगा स्टॅण्डजवळ धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात २०० हून अधिक धर्माभिमानी उपस्थित होते. तहसीलदार नागेश पाटील यांनी मागण्यांचे निवेदन स्वीकारले. हिंदु जनजागृती समितीचे श्री. राजन बुणगे आणि सनातनच्या सौ. अनिता बुणगे यांनी त्यांचे विचार मांडले.

pandharpur_nivedan
तहसीलदारांना (उजवीकडे) निवेदन देतांना भागवताचार्य वा.ना. उत्पात, श्री. राजन बुणगे आणि ह.भ.प. अनिलकाका बडवे

अन्य धर्मियांच्या नव्हे, तर केवळ हिंदूंच्याच मंदिरांचे सरकारीकरण केले जाते! – भागवताचार्य वा.ना. उत्पात

देवस्थान समितीने श्रद्धेचा धंदा चालू केला आहे. आज केवळ हिंदूंच्या मंदिरांचे सरकारीकरण केले जाते, अन्य धर्मियांच्या धार्मिक स्थळांचे नाही. आपण वेळीच जागे होऊन समिती विसर्जित (बरखास्त) केली नाही, तर येत्या काळात मंदिरात भक्ताने अर्पण केलेले धन अन्य धर्मियांसाठी वापरण्यासही सरकार सरसावेल, याची दक्षता घेणे आवश्यक आहे.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शासनाकडे करण्यात आलेल्या मागण्या

१. मंदिराचे व्यवस्थापन पहाण्यास विठ्ठलभक्त समर्थ आहेत. शासन अन्य धर्मियांच्या प्रार्थनास्थळांना हात न लावता केवळ हिंदूंची मंदिरे कह्यात घेते आणि त्यांची व्यवस्था चांगली न करता अशा प्रकारे वाट लावली जाते. त्यामुळे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे सरकारीकरण त्वरित रहित करून ते भक्तांच्या नियंत्रणात द्यावे.

२. धार्मिक विधी, रुढी-परंपरा, देवाचे राजोपचार आदी पूर्ववत् चालू करावेत आणि यांमध्ये मनमानी पद्धतीने पालट करणार्‍यांवर कठोर कारवाई करावी.

३. गायींच्या मृत्यूस कारणीभूत असणार्‍या संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *