हिमाचल या नितांतसुंदर राज्यातील कुल्लु या प्रसिद्ध पर्यटन स्थळापासून जवळच एक आगळे महादेव मंदिर आहे. या मंदिराचे आगळेपण त्याच्या नावावरूनच लक्षात येते. हे मंदिर बिजली महादेव मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे. याचे वैशिष्ठ म्हणजे दर १२ वर्षांनी या मंदिरावर आकाशातून वीज कोसळते व त्यात हे शिवलिंग भंगते. मात्र येथील पुजारी हे भंगलेले शिवलिंग लोण्याच्या सहाय्याने सांधतात व ते पुन्हा मूळ रूपात येते.
यामागे एक आख्यायिका सांगितली जाते ती अशी. या ठिकाणी वीज पडून जे मालमत्तेचे नुकसान होते त्यापासून महादेव येथील लोकांचे रक्षण करतात. त्यासाठी ते हा वीजेचा लोळ स्वतः झेलतात. बियास व पार्वती नदीच्या संगमावर एका पहाडावर हे मंदिर आहे.
त्यामागची कथा अशी आहे की कुलांत नावाच्या राक्षसाने महाप्रचंड अजगराचे रूप घेऊन येथे प्रवेश केला. हे अजगर माथण गावात बियास नदीच्या पात्रात बसले त्यामुळे नदीचे पाणी वाढले व गांव बुडण्याचा धोका निर्माण झाला. तेव्हा महादेवाने त्रिशूळाने या अजगराला ठार केले. त्याच अजगराचा येथे पहाड बनला. त्यावर हे शिवमंदिर आहे. अजगराचा वध केल्यानंतर महादेवाने इंद्राला दर बारा वर्षांनी या पहाडावर वीज पाडण्याचा आदेश दिला होता. त्यानंतर आजतागायत येथे दर १२ वर्षांनी वीज पडते व नागरिक ती पडताना पाहतातही.
संदर्भ : माझा पेपर