-
यज्ञयागादी विधींवर टीका करणार्या अंनिसवाल्यांना याविषयी काय म्हणायचे आहे ?
-
पर्जन्ययागानंतर मांजरा नदी दुथडी भरून वाहू लागली, तर नागझरी धरण पाण्याने पूर्ण भरले !
धाराशिव – मराठवाड्यातील लातूर आणि धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचे अवर्षण दूर व्हावे आणि लातूर आणि कळंब परिसरातील धरण क्षेत्रामध्ये भरपूर प्रमाणात पाऊस व्हावा, या उद्देशाने प्राकृती फाऊंडेशन बेंगळुरू आणि सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील कासारवाडी येथील श्री योगिराज वेद विज्ञान आश्रम यांच्या संयुक्त विद्यमाने कळंब शहरातील ढोकी रोडवरील श्री साई मंगल कार्यालयात पर्जन्ययाग आणि सुवृष्टीकारक प्रवर्ग्य विधीचे आयोजन करण्यात आले होते. २६ जुलैला प्रारंभ झालेल्या या विधीचा ३० जुलैला दुपारी २ वाजता पूर्णाहुती दिल्यानंतर समारोप झाला. कळंब येथील श्री. समीर देशपांडे आणि त्यांच्या धर्मपत्नी सौ. दीपाली देशपांडे यांनी यागाचे यजमानपद भूषवले. श्री योगीराज वेद विज्ञान आश्रमचे अहिताग्नि सोमयाजी श्री. चैतन्य काळे गुरुजी त्यांच्यासह आश्रमातील १६ ऋत्विजांनी या यज्ञाचे पौरोहित्य केले.
पर्जन्ययागानंतर परिसरात मुसळधार पाऊस
यावर्षी धाराशिव जिल्ह्यातील काही भागांमध्ये थोड्याफार प्रमाणात पाऊस पडत असला, तरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस पडत नव्हता आणि धरणाला पाण्याचा पुरवठा होत नव्हता. त्यामुळे येणार्या काळातील दुष्काळाचे संकट टळावे आणि या भागात भरपूर पाऊस व्हावा, याकरता आयोजित पर्जन्य याग आणि सुवृष्टीकारक प्रवर्ग्य विधी पार पडल्यानंतर ३० जुलैला रात्री ११ वाजता मुसळधार पाऊस पडला. सतत ४ घंटे पडलेल्या या पावसामुळे भारतीय संस्कृतीतील यज्ञयागाचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले. या पावसामुळे शहरातील सर्व रस्ते पाण्याने भरले, मांजरा नदी दुथडी भरून वाहू लागली आणि लातूर जवळचे नागझरी धरणही पाण्याने पूर्ण भरले. २६ जुलैला पर्जन्ययागाला प्रारंभ केल्यानंतरही तेथे ५५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात