कोल्हापूर : काश्मीर येथे सद्यस्थिती बिकट आहे. प्रतिदिन तिथे आंतकवादी कारवाया होत आहेत. तेथे हिंदू संकटात आहेत. सनातन संस्था समाजाला धर्मशिक्षण देत असल्याने आम्ही सनातन संस्थेच्या पाठीशी आहोत, तसेच उपस्थितांनीही सनातन संस्थेच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले पाहिजे. सध्या बालभारतीच्या चौथीच्या पुस्तकातून अयोग्य इतिहास शिकवला जात असून अफझलखानवधाचे चित्र वगळून छत्रपती शिवाजी महाराज-अफझलखान भेट असे चुकीचे चित्र प्रकाशित करण्यात आले आहे, असे प्रतिपादन शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. संभाजी भोकरे यांनी केले. ते केर्ले (ता.पन्हाळा) येथील श्री हनुमान मंदिरात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ३१ जुलै या दिवशी झालेल्या हिंदूसंघटन मेळाव्यात बोलत होते. या मेळाव्यासाठी २०० हून अधिक हिंदू धर्माभिमानी उपस्थित होते.
या वेळी श्री. अमोल कुलकर्णी यांनी स्वसंरक्षण प्रशिक्षण काळाची आवश्यकता या विषयावर, तर हिंदु जनजागृती समितीचे श्री. किरण दुसे यांनी सामाजिक समस्यांवर संघटित प्रतिकार आणि उपाय याविषयावर मार्गदर्शन केले. श्री. अमोल कुलकर्णी आणि श्री. किरण दुसे यांचा सत्कार श्री. रणधीर किल्लेदार यांनी केला, तर श्री. संभाजी भोकरे यांचा सत्कार श्री. विक्रमसिंह माने यांनी केला. या वेळी पंचायत समिती सदस्य श्री. तानाजी आंग्रे यांचा तसेच हिंदु धर्माभिमानी सर्वश्री सागर कोळी आणि रामभाऊ मेथे यांचाही सत्कार करण्यात आला.
क्षणचित्रे
१. ५ ते १० वयोगटातील ८ मुलांनी दिवसभर पूर्वसिद्धतेत साहाय्य केले.
२. धर्मशिक्षण वर्गातील युवकांनी मेळाव्याची पूर्वसिद्धता केली. युवकांनी मेळाव्यासाठी ध्वनीक्षेपक यंत्रणा, विद्युत यंत्रणा, सभागृह मिळवून देणे यांसाठी साहाय्य केले.
३. मेळाव्यासाठी केर्ले प्रयाग चिखली, पडवळवाडी, पोरली, वडणगे या गावातील हिंदु धर्माभिमानी यांची उपस्थिती होती.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात