नवी देहली : अमेरिकन महिलेवर बलात्कार प्रकरणी दोषी आढळल्याने “पिपली लाईव्ह‘ या हिंदी चित्रपटाचा सहदिग्दर्शक मोहम्मद फारूकी याला सात वर्षांची कैद आणि ५० हजार रुपयांचा दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
फारूकीला ३० जुलै रोजी अमेरिकन महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. या प्रकरणाची देहलीतील न्यायालयात सुनावणी सुरू होती. दरम्यान फारूकी हा जामिनावर बाहेर होता. मात्र या प्रकरणात दोषी आढळल्याचा न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर तातडीने त्याला ताब्यात घेण्यात आले.
न्युयॉर्क येथील कोलंबिया विद्यापीठातील ३५ वर्षांच्या महिलेवर फारूकी याने २८ मार्च २०१५ रोजी बलात्कार केला होता. ही महिला राजधानी देहलीत डॉक्टरेटसंदर्भातील संशोधन कामासाठी आली होती. सुरुवातीला फारूकीने आपल्यावर बलात्कार केला आणि नंतर अनेकदा ई-मेल्स पाठवून माफी मागितली. मात्र आपल्यावर ठेवण्यात आलेले आरोप खोटे असल्याचा दावा फारूकीने केला होता. तपासाअंती फारूकी दोषी आढळला असून त्याला सात वर्षांची कैद आणि ५० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तसेच दंड भरला नाही तर तीन महिन्यांची अतिरिक्त कैद देण्यात येईल, असा आदेश न्यायालयाने दिला आहे.
संदर्भ : सकाळ