देहराडून (उत्तराखंड) : पांडव सदेह स्वर्गारोहणासाठी चालत गेले होते. एका श्वानाने त्यांना मार्ग दाखवला. पण, ज्या रस्त्याने पांडव स्वर्गात केले ते ठिकाण देवभूमी उत्तराखंडमध्ये आहे.
बद्रीनाथजवळ माणा या गावात ते ठिकाण आहे. विशेष म्हणजे हे गाव भारतातील शेवटचे गाव आहे. रोज या ठिकाणी शेकडो भाविक भेट देतात. पौराणिक कथेनुसार स्वर्गात जाताना भीमाने आपल्या हाताने विशालकाय दोन दगड ओढून पूल तयार केला. त्यावरून पांडव स्वर्गाकडे गेले.
या पुलाला भीमपूल म्हणून ओळखले जाते. दोन मोठ-मोठ्या दगडांनी तो बनलेला आहे. येथूनच सरस्वती नदीसुद्धा वाहते. धार्मिक कथेनुसार, स्वर्गात जाण्यासाठी पांडव या ठिकाणी आले. तेव्हा द्रौपदीला नदी पार करण्याची भीती वाटत होती.
त्यामुळे पांडवांनी सरस्वती नदीला हात जोडून रस्ता मोकळा करून देण्याची विनंती केली. त्यावर सरस्वतीने रस्ता देण्यास नकार दिला. याचा भीमाला प्रचंड राग आला. त्याने आपल्या हाताने दोन विशालकाय दगड ओढून पूल तयार केला. त्यामुळेच या पुलाला भीमपूल म्हणतात.
या पुलाखालून अदृश्य मानली जाणारी ‘सरस्वती’ मोठा आवाज करत वाहते. ही नदी पुढे अलकनंदा नदीला मिळते. नदी अदृश्य असण्यामागेसुद्धा पौराणिक कथेत कारण दिले. नदीने रस्ता देण्यास नकार दिला होता. त्याचा भीमाला राग आला. त्याने आपली गदा जमिनीवर आदळली. त्यामुळे नदी पाताळात गेली.
या पुलावरून पुढे स्वर्गाकडे जाताना पहिल्यांदा वाटेत द्रौपदीचा मृत्यू झाला. पुढे युधिष्ठिर वगळता इतर चार पांडवसुद्धा मृत्युमुखी पडले. मार्ग दाखवणारा कुत्रा हा कुत्रा नसून यमराज होता. त्याने युधिष्ठिराला स्वर्गाऐवजी नर्क दाखवला आणि त्याची परीक्षा घेतली. त्या नंतर पाचही पांडव आणि द्रौपदीला स्वर्गात स्थान दिले. विशेष म्हणजे यापैकी केवळ युधिष्ठिरच जिवंतपणी स्वर्गात गेला.
संदर्भ : दिव्य मराठी