आजच्या धावपळीच्या जीवनात ताणतणावांमुळे विविध आजारांचे प्रमाण वाढत आहे. या आजारांपासून दूर राहण्यासाठी योग करणे आवश्यक आहे. सर्व वयोगटातील स्त्री,पुरूषांनी योग करायला हवा, असे प्रतिपादन योग प्रशिक्षक डॉ.तुळशीराम रावराणे यांनी केले. फोंडाघाट येथे झालेल्या योग शिबिरात तज्ज्ञ प्रशिक्षकांकडून प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करण्यात आले.
पतंजली योग समिती, महिला पतंजली, भारत स्वाभिमान न्यास सिंधुदुर्ग, लायन्स कल्ब फोंडाघाट व शाहू प्रतिष्ठान कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने फोंडाघाट येथे योग प्राणायाम शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. उद्घाटन कार्यक्रमास योग प्रशिक्षक परशुराम साधले, डॉ.वंदना कोरगावकर, श्रीकृष्ण नानचे, सुभाष मर्ये, प्रा.डॉ.बालाजी सुरवसे, प्रा.डॉ.संतोष रायबोले, विजय डोंगरे, सचिन नारकर उपस्थित होते.
ज्या कुटुंबातील महिलांचे आरोग्य चांगले असते त्या कुटुंबातील सर्वाचेच आरोग्य चांगले राहते असे डॉ.वंदना कोरगावकर यांनी सांगितले. परशुराम साधले यांनी विविध योगासनांची प्रात्यक्षिके करून दाखविताना प्रत्येक योगासनाचे महत्व विषद केले. तसेच उपस्थित प्रशिक्षणार्थींकडून विविध योगासने करून घेतली. प्रास्ताविक प्रा.डॉ.बालाजी सुरवसे तर आभार विजय डोंगरे यांनी मानले.
संदर्भ : पुढारी