शिवसेनेचे आमदार श्री. राजेश क्षीरसागर यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर !
भ्रष्टाचाराच्या विरोधात सातत्याने आवाज उठवणारे आमदार श्री. राजेश क्षीरसागर यांचे अभिनंदन ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
मुंबई : पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या भ्रष्टाचाराची समयमर्यादेत चौकशी पूर्ण करून दोषींवर त्वरित कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेचे आमदार श्री. राजेश क्षीरसागर यांनी ५ ऑगस्ट या दिवशी मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असणारे श्री महालक्ष्मी मंदिर, जोतिबा देवस्थान यांसह सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमधील ३ सहस्र ६७ देवस्थानांचा समावेश असणार्या पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या घोटाळ्याची राज्य गुन्हे अन्वेषण शाखेच्या विशेष पथकाच्या वतीने चौकशी करण्यात येईल, असा आदेश ८ एप्रिल २०१५ या दिवशी मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत लक्षवेधीवर दिला होता.
आमदार श्री. राजेश क्षीरसागर यांनी या निवेदनात म्हटले आहे की,
१. देवस्थान समितीच्या भूमी घोटाळ्यात प्रामुख्याने देवस्थानच्या २५ सहस्र एकर भूमीपैकी ८ सहस्र एकर भूमी दिसून येत नाही, तसेच वर्ष १९६९ पासून वर्ष २००४ या ३५ वर्षांचे लेखापरीक्षण झालेेले नाही.
२. श्री महालक्ष्मीदेवीच्या चांदीच्या रथातील शेकडो किलो चांदीच्या घोटाळ्याच्या संदर्भात, तसेच श्री महालक्ष्मी देवस्थान आणि केदारलिंग देवस्थान सोडून प्रत्येक देवस्थानचे दागदागिने किती, त्यांचे मूल्य किती, याविषयी समितीकडे कोणतीही नोंद नाही.
३. कोट्यवधी रुपयांच्या खाणकामाची रॉयल्टी नाही. त्याचप्रमाणे खाणकामाची अनुमती कोणी दिली, हेही शासनाला माहीत नाही. यातील अनेक गोष्टी लेखापरीक्षक आणि जिल्हाधिकारी यांना त्यांच्या पडताळणीत निदर्शनास आणून देऊनही त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे.
४. सव्वा वर्षाहून अधिक कालावधी लोटला, तरी राज्य गुन्हे अन्वेषण चौकशीत पुढे काय झाले, यासंदर्भात काहीच माहिती सांगितली जात नाही. परिणामी संबंधित गुन्हेगार उजळ माथ्याने समाजात फिरत आहेत.
५. श्री तुळजापूर देवस्थानविषयीही असाच चालढकलपणा करणारी चौकशी वर्षांनुवर्षे चालू आहे. या पद्धतीने हे प्रकरणही दडपले जात तर नाही ना, अशी शंका कोट्यवधी भक्तांच्या मनात निर्माण झाली आहे. याविषयी अनेकांनी मला वैयक्तिक भेटीत तक्रारी केल्या आहेत.
६. या देवस्थान घोटाळ्याच्या अन्वेषण पथकाचे प्रमुख संजयकुमार हे कोल्हापूर येथे येऊन अन्य विषयांवर जेवढ्या तत्परतेने पत्रकार परिषदा घेऊन पत्रकारांना माहिती सांगतात, तसे याविषयी काहीच सांगत नाहीत, हे काय गौडबंगाल आहे ?
७. देवस्थान घोटाळ्याचे प्रकरण कोट्यवधी भक्तांशी संबंधित आणि अतिशय संवेदनशील आहे. त्यामुळे गेल्या वर्षभरात या पथकाने कोणती कारवाई केली ? कोणाकोणाची चौकशी केली ? कोणावर गुन्हे प्रविष्ट केले ? आदी माहिती मिळावी.
८. खरे तर मुख्यमंत्र्यांनी जातीने लक्ष घालणे आवश्यक आहे. प्रत्येक मासाला त्याचा आढावा घेऊन ठराविक कालमर्यादेत अन्वेषण पूर्ण करून दोषींवर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. दोषींना करागृहात पाठवले पाहिजे, अशी आमची मागणी आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात