क्वेट्टा : पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातील क्वेट्टा शहरातील एका सरकारी रुग्णालयात घडवून आणलेल्या आत्मघाती बाँबहल्ल्यातील मृतांची संख्या ७० झाली आहे. या हल्ल्यात शंभरहून अधिक जण जखमी झाले आहेत. स्फोटानंतर काही काळ गोळीबार झाल्याचेही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
क्वेट्टामधील प्रसिद्ध वकील बिलाल कासी यांच्यावर आज सकाळी गोळीबार होऊन त्यात त्यांचा मृत्यू झाला होता. या वकिलाचा मृतदेह या सरकारी रुग्णालयात आणला असता, तेथे शेकडो वकील, पत्रकार आणि सामान्य नागरिक जमा झाले होते. याच वेळी दहशतवाद्यांनी हा स्फोट घडवून आणला. या दोन घटनांचा परस्पर संबंध असल्याची शंका व्यक्त होत असली तरी अद्याप निश्चित माहिती हाती आलेली नाही. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेने स्वीकारलेली नाही.
मृतांमध्ये बहुतांश वकील आणि आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या स्फोटासाठी तब्बल आठ किलो स्फोटके वापरण्यात आली होती.
क्वेट्टा हे शहर बलुचिस्तान प्रांतात आहे. या प्रांतामध्ये घुसखोरीचे प्रमाण प्रचंड आहे. येथे अनेक फुटीरतावादी गट कार्यरत असले तरी अल कायदा आणि तालिबानसारख्या दहशतवादी संघटनांनीही येथे बस्तान बांधले आहे. येथे होणाऱ्या दहशतवादी कारवायांविरोधात वकील आणि पत्रकारांनी भूमिका घेतल्याने काही महिन्यांपासून त्यांच्यावर हल्ले होत आहेत. आजचा हल्ला हा त्याचाच परिणाम असल्याचे सांगितले जाते.
संदर्भ : सकाळ