भाजपशासित राज्यांतील गोमातांची दुरवस्था !
ग्वाल्हेर (मध्यप्रदेश) : राजस्थानच्या जयपूर येथील हिंगोनिया गोशाळेतील ५०० हून अधिक गायींच्या मृत्यूनंतर आता मध्यप्रदेशातील ग्वाल्हेर येथील महापालिकेच्या लालटिपारा गोशाळेत गेल्या ४ महिन्यांत १ सहस्र २०० हून अधिक गायींचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. गोशाळेत क्षमतेपेक्षा अधिक गायी आहेत. त्यामुळे त्यांना चारा पुरवण्यात अडचण येत आहे, औषधोपचारही देण्यात अडचण आहे, असे म्हटले जात आहे. महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांच्या मते, पॉलिथीन खाणे आणि कुंकू चाटल्यामुळे मृत्यू होत आहे.
१. लालटिपारा गोशाळेत ३ सहस्र गायी आहेत. ही गोशाळा काही एकर जागेत आहे. त्यातील ७५ टक्के जागेत गायींसाठी गवत उगवले जाते, तर इतर जागेत गायींना ठेवण्यात येते.
२. गोशाळेत मोठ्या प्रमाणात चिखल आहे. त्यामुळे यात फसलेल्या गायीला बाहेर काढणे कठीण होते.
३. या गोशाळेत प्रतिदिन ९ गायींचा मृत्यू होत आहे. या गोशाळेवर प्रतिवर्षी साडेचार कोटी रुपये खर्च करण्यात येतो.
४. गायींना गोठ्यात इतके जवळ जवळ बांधण्यात आले आहे की, त्या हलूही शकत नाहीत. त्यामुळे एकाच जागेवर सतत उभे राहिल्यानेही त्यांचा मृत्यू होत आहे.
५. तज्ञांच्या मते एका गायीसाठी १५ चौ. फुटाची जागा असायला हवी. येथे केवळ ५ चौ. फुटाचीच जागा आहे.
६. गायींना पुरेसे खाद्यही दिले जात नाही. याचे कारण बाजारात चारा महाग असल्याचे सांगितले जात आहे.
७. येथील डॉक्टरांच्या मते गोशाळेत गायी अधिक असल्याने तसेच कर्मचारी अल्प असल्याने त्यांची देखभाल होत नाही; म्हणून गायींचा मृत्यू होत आहे.
८. राज्याच्या नागरी प्रशासन मंत्री माया सिंह यांनी म्हटले की, साडेचार कोटी रुपये मिळत असूनही गोशाळेतील १ सहस्र २०० गायींचा मृत्यू होणे गंभीर आहे. याची संपूर्ण चौकशी केली जाईल.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात