भुवनेश्वर (ओडिशा) येथील विस्थापित काश्मिरी हिंदू सौ. अर्चना काक यांनी व्यक्त केलेले हृदयद्रावक मनोगत
भुवनेश्वर (ओडिशा) : येथे ९ ऑगस्ट या दिवशी एक भारत अभियान – कश्मीरकी ओर या अंतर्गत भारत रक्षा मंच, हिंदु जनजागृती समिती आणि पनून कश्मीर यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या जाहीर सभेत विस्थापित काश्मिरी हिंदू सौ. अर्चना काक यांनी व्यक्त केलेले मनोगत येथे प्रसिद्ध करत आहोत. त्यांचे मनोगत ऐकतांना संपूर्ण सभागृह सुन्न झाले होते आणि मनोगत संपल्यानंतर अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळले.
आज काश्मिरी हिंदूंच्या पुनर्वसनाची सभा आहे, हे भित्तीपत्रकावर वाचले, तेव्हा मला रहावले नाही आणि मी या कार्यक्रमाला आले. मी बोलतांना कदाचित् मला रडू आवरणार नाही. त्या वेळी मला समजून घ्या.
माझे वडील जम्मू-काश्मीरच्या पोलीस खात्यात प्रामाणिक आणि देशभक्त अधिकारी म्हणून ओळखले जायचे. त्यांना वारंवार धर्मांध जिहादी मुसलमानांच्या धमक्या येऊनही ते त्याला कधी घाबरले नाहीत. त्यांनी निरंतर पोलीससेवेतून देशसेवा चालू ठेवली. हाच त्यांचा अपराध होता; म्हणूनच काय, एके दिवशी दुपारच्या वेळी काही पोलीस अधिकारी तिरंग्यामध्ये गुंडाळलेले त्यांचे शव घेऊन आमच्या घरी आले. मी त्या वेळी ७ वर्षांची होते, तर माझा भाऊ ५ वर्षांचा होता. आम्हाला काय घडले आहे, हे कळले नव्हते; पण तो दिवस आजही आठवतो. माझी अत्यंत धार्मिक वृत्ती असलेली आई हे दृश्य पाहूच शकली नाही. त्या पतिव्रता स्त्रीला हा धक्का सहन झाला नाही आणि तिने जागीच प्राण सोडले. त्या दिवशी आमच्या घरातून एकाच वेळी आई-वडिलांच्या तिरड्या बाहेर पडल्या. आम्ही एका क्षणात निराधार झालो. आमचे बालपण कोमेजले.
वडील पोलीस खात्यात असल्याने आमचे नातेवाईक आणि शेजारील हिंदू यांनीही स्वतःवरील संकट ओळखून आमचे दायित्व घेणे टाळले. त्यांच्या मनात भय होते की, पोलिसांच्या अपत्यांना सांभाळल्यास धर्मांध जिहादी आपल्याला लक्ष्य करतील. आमची परवड झाली. प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या घरात जाऊन जेवण करून आम्ही कसे बसे शिक्षण पूर्ण करत होतो. एकदा रस्त्यावरून येत असतांना २ युवक माझ्या आजूबाजूने येत होते. त्यांनी त्यांच्याकडे लपवलेले शस्त्र मला दाखवले आणि ते म्हणाले, एक तर मुसलमान हो किंवा काश्मीर सोडून जा । माझ्या तोंडातून शब्दच फुटेना. माझे शरीर थंड पडले. मी प्रचंड घाबरले होते. या प्रसंगानंतर आम्ही काश्मीर कायमचे सोडले आणि जम्मूमधील एका दूरच्या नातेवाईकाकडे आश्रयाला आलो. पुढे आम्ही उच्च शिक्षण दिल्लीत येऊन घेतले. आज कसे बसे आम्ही स्थिरस्थावर होऊन येथे (ओडिशामध्ये) रहात आहोत.
माझ्या घरात जे घडले, ते अनेक घरात त्या काळात घडले. अनेकांचे जीवन उद्ध्वस्त झाले. काश्मिरी हिंदु महिलांवर अत्याचार झाले. कोणावर कधीही येऊ नये, अशी पाळी काश्मिरी हिंदूंवर आली. भविष्यात असे कोणाच्या संदर्भातही होऊ नये, यासाठी या एक भारत अभियानात मी वेळ देण्यास सिद्ध आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात