११ राज्यांतील हिंदु संघटनांच्या शिष्टमंडळाने घेतले शंकराचार्यांचे मार्गदर्शन !
जगन्नाथपुरी (ओडिशा) : गेली २६ वर्षे विस्थापित असलेल्या काश्मिरी हिंदूंना न्याय मिळवून देण्यासाठी देशभरातील हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी मिळून एक भारत अभियान – चलो कश्मीर की ओरची घोषणा केली. या चळवळीसाठी आशीर्वाद आणि मार्गदर्शन घेण्यासाठी ११ राज्यांतील विविध संघटनांच्या पदाधिकार्यांनी नुकतीच पुरी येथील गोवर्धन पीठाचे शंकराचार्य जगद्गुरु स्वामी निश्चलानंद सरस्वती महाराज यांची भेट घेतली. या वेळी शंकराचार्यांनी काश्मिरी हिंदूंच्या हक्कांसाठी चालू केलेल्या या अभियानाला आशीर्वाद दिले.
जगद्गुरु शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांनी या वेळी केलेले मार्गदर्शन
१. मी फार पूर्वीपासून काश्मीरमध्ये चालू असलेल्या घटनांविषयी माहिती घेत आहे आणि मार्गदर्शनही करत आहे.
२. अगोदर माझ्याकडे येणार्या नेत्यांत प्रामाणिकपणा दिसत होता; मात्र नंतर त्यांचा उद्देश वैयक्तिक लाभ करून घेण्याचा दिसल्याने ती चळवळ सोडून द्यावी लागली.
३. असे असले, तरी मी काश्मीर हा विषय मात्र सोडलेला नाही. त्यामुळे तुमची चळवळ योग्य नेतृत्व करणार्यांच्या माध्यमातून पुढे न्या. त्यात वैयक्तिक स्वार्थ असता कामा नये.
४. योग्य निवड, उचित प्रशिक्षण आणि कुशल व्यूहरचना या सूत्रांद्वारे हे अभियान चालवल्यास निश्चित यश प्राप्त होईल. तसेच हा लढा दीर्घकाळ चालणारा असल्याने संयम बाळगून, त्वरित फळाची अपेक्षा न करता कार्यरत रहा.
५. वैयक्तिक प्रसिद्धीचा, नेतृत्वाचा हव्यास न धरता आणि त्यागाच्या भावनेने प्रेरित अशा ईश्वर नियोजित व्यक्ती समाजातून शोधून त्यांच्या माध्यमातून ही चळवळ पुढे न्या.
६. इतिहासकाळातील आर्य चाणक्य आणि चंद्रगुप्त, तसेच समर्थ रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याप्रमाणे कार्य केल्यास यश प्राप्त होते.
७. नेपाळला हिंदु राष्ट्र बनवण्यासाठी प्रयत्न करतांनाही लक्षात आले की, त्या चळवळीतील प्रत्येक नेत्याला माझ्याकडेच नेतृत्व (पंतप्रधानपद) सोपवले गेले पाहिजे, असे वाटत होते. त्यामुळे हिंदूंमधूनच अनेक नेते उभे राहिल्याने, त्यात आपण यशस्वी होऊ शकलो नाही.
८. काश्मीरच्या समस्येच्या कारणांचा बारकाईने अभ्यास करा आणि एक योजना ठरवून योग्य व्यक्तींच्या हातात ही चळवळ देऊन ती पुढे न्या.
९. कोणत्याही समस्येशी लढण्यासाठी मनोबळाला आध्यात्मिक बळाचीही आवश्यकता आहे. आध्यात्मिक बळ नसेल, तर त्यागापासून चालू झालेली वाटचाल उपभोगाकडे कधी पोहोचली, हे ही कळत नाही आणि आंदोलन अपयशी ठरते.
१०. ही समस्या ज्या काश्मीरशी निगडित आहे, त्या काश्मीरमधील हिंदूंच्या भावना या आंदोलनाशी जोडल्या गेल्या पाहिजेत.
शंकराचार्य जगद्गुरु स्वामी निश्चलानंद सरस्वती महाराज यांचे आशीर्वाद घेण्यासाठी गेलेल्या शिष्टमंडळातील हिंदुत्वनिष्ठ
या शिष्टमंडळात पनून कश्मीरचे अध्यक्ष श्री. अजय च्रोंगू; युथ फॉर पनून कश्मीरचे श्री. विठ्ठल चौधरी; फ्रंट फॉर जस्टिसचे अधिवक्ता श्री. विष्णु शंकर जैन, भारत रक्षा मंचचे राष्ट्रीय संयोजक श्री. सूर्यकांत केळकर आणि सचिव श्री. अनिल धीर; श्रीराम सेनाचे संस्थापक श्री. प्रमोद मुतालिक; हिंदु मक्कल कच्छीचे संस्थापक श्री. अर्जून संपथ; शिवसेनेचे तेलंगणा आणि आंध्रप्रदेशचे अध्यक्ष श्री. टी.एन्. मुरारी; श्री. पोन्नूस्वामी; हिंदु स्वाभिमान प्रतिष्ठानचे अधिवक्ता देवदास शिदे; सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. चेतन राजहंस; हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. रमेश शिंदे, तसेच हिंदु जनजागृती समितीचे बंगाल आणि झारखंड समन्वयक श्री. आनंद जाखोटिया हे उपस्थित होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात