पावित्र्यरक्षण, धर्मपरंपरांचे पालन, भ्रष्टाचारमुक्त देवस्थान यांसह पंचसूत्रींसाठी कृती समिती आक्रमक !
पंढरपूर (जिल्हा सोलापूर) : श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात धार्मिक प्रथा-परंपरांचे पालन न होणे, गोशाळेतील गायींचा प्लास्टिक खाऊन मृत्यू होणे, तसेच प्रक्षाळपूजेसारख्या मुख्य धार्मिक विधींच्या तिथी पालटून प्रक्षाळपूजा करणे, असे मनमानी कारभार शासकीय प्रशासकांकडून होत आहेत. या समस्या थांबवण्यासाठी, तसेच श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात पावित्र्यरक्षण, धर्मपरंपरांचे पालन, धर्मशास्त्रानुसार तिथींचे पालन, भ्रष्टाचारविरहित प्रशासन, गोशाळेतील गोमातेचे रक्षण आणि संगोपन करणे यांसाठी येथे वारकरी संप्रदाय, हिंदुत्ववादी संघटना यांच्यासमवेत ८ ऑगस्ट या दिवशी येथे बैठक घेण्यात आली. या बैठकीत वरील पंचसूत्री कार्यक्रम राबवण्यासाठी श्री विठ्ठल-रुक्मिणी देवस्थान संरक्षक कृती समितीची स्थापना करण्यात आली.
या वेळी हिंदु जनजागृती समितीचे राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांची कृती समितीचे राज्य प्रवक्ता, ह.भ.प. रामकृष्ण महाराज वीर हे स्थानिक प्रवक्ता आणि हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता श्री. वीरेंद्र इचलकरंजीकर यांची कायदेशीर सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. बैठकीला वरील पदाधिकार्यांसह ह.भ.प. राणा महाराज वासकर, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. प्रताप साळुंखे, श्री. सौरभ थिटे, श्री. वीरेंद्र उत्पात, श्री. विजय बडवे, हिंदु जनजागृती समितीचे जिल्हा समन्वयक श्री. राजन बुणगे, सनातन संस्थेचे श्री. अप्पासाहेब सांगोलकर, पेशवा युवा मंचचे श्री. गणेश लंके, शिवसेनेचे श्री. वैभव बडवे, महेशाचार्य उत्पात उपस्थित होते. या बैठकीत आंदोलनाची पुढील दिशा निश्चित करण्यात आली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात