Menu Close

केरळमधील श्री पद्मनाभस्वामी मंदिरामध्ये १८६ कोटी रुपयांच्या सोन्याचा अपहार !

  • मंदिर सरकारीकरणाचा परिणाम ! कुठे श्रद्धेने मंदिराला दान देणारे भक्त, तर कुठे मंदिराच्या धनाची लूट करणारे आधुनिक गझनी !
  • अशा लुटारूंचा शोध घेऊन त्यांच्याकडून व्याजासह धन वसूल करा ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात

नवी देहली : सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या माजी कॅग प्रमुख विनोद राय समितीने केरळमधील श्री पद्मनाभस्वामी मंदिरातील संपत्तीचे लेखापरीक्षण करून अहवाल सादर केला. या अहवालात मंदिराच्या व्यवस्थापनाने केलेले आर्थिक घोटाळे, भ्रष्टाचार आणि अपहार यांच्या गंभीर घटनांवर प्रकाश टाकतांना मंदिरातील १८६ कोटी रुपयांच्या सोन्याचा अपहार झाल्याचे उघड केले आहे.

१. वर्ष २०१५ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने विनोद राय समितीला श्री पद्मनाभस्वामी मंदिरातील संपत्तीचे लेखापरीक्षण करण्यास सांगितले होते. त्यानुसार या समितीने तिचा एक सहस्र पानांचा आणि २ भागांत असलेला अहवाल सर्वोच्च न्यायालयाला सदर केला.

२. या अहवालानुसार सुवर्णशुद्धीच्या नावाखाली २६३ सोन्याची भांडी वाया गेली. तसेच १८६ कोटी रुपये किमतीची ७६९ सोन्याची भांडी सापडत नाहीत, म्हणजेच त्यांचा अपहार झाला.

३. सोन्याच्या शुद्धीकरणासाठी वापरण्यात आलेल्या परिमाणामध्ये पालट केल्याने २.५ कोटी रुपयांच्या सोन्याची हानी झाली.

४. शुद्धीकरण झाल्यावर उर्वरित सोने परत न आणल्याने ५९ लक्ष रुपयाची हानी झाली.

५. सोन्याच्या आणि चांदीच्या आवक वहीत १४ लक्ष १८ सहस्र रुपयांच्या साहित्याची नोंद केलेली नाही.

६. १४ लक्ष किमतीची चांदीची कांब सापडत नाही.

७. मंदिराच्या विश्‍वस्त संस्थेने मंदिराची २.११ एकर भूमी विकली, त्याची नोंद नाही.

८. गेल्या काही वर्षांमध्ये मंदिराच्या व्यवस्थापन व्ययात अचानक मोठी वाढ झाली. त्याची कारणे पटण्यासारखी नाहीत.

विनोद राय समितीने केलेल्या सूचना

विनोद राय समितीने मंदिराच्या व्यवस्थापन समितीत आणि सुरक्षा व्यवस्थेत काही दूरगामी पालट सुचवले आहेत. त्यानुसार समिती ७ सदस्यीय ठेवावी, एक निवृत्त शासकीय अधिकारी हा प्रमुख नेमून त्याच्या हाताखाली एक पुजारी, २ सन्मान्य नागरिक, राज्य शासनाचा प्रतिनिधी आणि राजघराण्यातील व्यक्ती यांचा समावेश करावा असे सुचवले आहे. वरील लेखापरीक्षण ६ पैकी ५ तळघर तिजोरील असून त्याचेच मूल्य १०० सहस्र कोटी रुपयांच्या वर आहे, असा अंदाज आहे. ६ व्या तळघरात याहून अधिक संपत्ती असण्याची शक्यता आहे. या सर्व बहुमूल्य वस्तू एखाद्या संग्रहालयात ठेवून त्यावर कडक सुरक्षा व्यवस्था नेमावी, असेही समितीने सुचवले आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात


 

केरळमधील पद्मनाभ मंदिरातील मौल्यवान हिरे आणि दागिने गहाळ !

हिंदूंच्या मंदिरांच्या सुरक्षेची दयनीय अवस्था !

थिरूवनंतपुरम् : येथील प्रसिद्ध पद्मनाभस्वामी मंदिराच्या खजिन्यातून मौल्यवान हिरे आणि दागिने गायब झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेच्या अन्वेषणासाठी देवस्थान समितीने सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका प्रविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे.

पद्मनाभस्वामींची संपत्ती ज्या ठिकाणी साठवून ठेवण्यात येते त्याला श्रीकोवील असे म्हटले जाते. श्रीकोवीलभोवती २४ घंटे कडक पहारा असतो. देवस्थान समितीने एक विशेष निवेदन प्रसिद्धीस दिले आहे, यात म्हटले आहे की, पेरियान्बी यांच्याकडे श्रीकोवीलच्या संरक्षणाची सूत्रे होती. त्यांच्या निवृत्तीनंतर ती नांबी वासुदेवन् नारायण यांच्याकडे आली. मागील वर्षी ऑगस्टमध्ये त्यांनी पदभार स्वीकारला होता. मागील ५ महिन्यांचा देवस्थानच्या संपत्तीशी संबंधित अहवाल अजून सादर झाला नसल्याचे देवस्थान समितीने म्हटले आहे. तसेच मंदिराच्या खजिन्यातील अनेक दागिने गहाळ झाल्याचे समितीने म्हटले आहे.

पद्मनाभस्वामी मंदिराच्या दागिन्यांचे मूल्य एक लाख कोटी रुपये एवढे आहे. या मंदिरामध्ये आणखी एक खोली असून २०० वर्षांपासून ती उघडण्यात आलेली नाही. या खोलीमध्येही मोठ्या प्रमाणात संपत्ती असल्याचे सांगितले जाते. धार्मिक कारणांमुळे या खोलीचे दार उघडण्यात आलेले नाही.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *