बोगस गोरक्षक असा आरोप करत विपर्यस्त वृत्त प्रसारित केल्याचे प्रकरण
संघटितपणे आणि वैध मार्गाने आंदोलन करून एबीपी माझाच्या पत्रकाराचे बिंग फोडणारे श्री. मिलिंद एकबोटे आणि अन्य गोरक्षक यांचे अभिनंदन ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
गोरक्षकांनी उत्स्फूर्तपणे दिलेल्या घोषणा
मंदार गोंजारीचे करायचे काय, खाली डोके वर पाय !
एबीपी माझाचे करायचे काय, खाली डोके वर पाय !
भ्रष्टाचारी एबीपी माझाचा धिक्कार असो !
गोमातेशी गद्दारी करणार्या एबीपी माझाचा धिक्कार असो !
पुणे : येथील गोरक्षक श्री. शिवशंकर स्वामी आणि श्री. मिलिंद एकबोटे यांच्याविरुद्ध एबीपी माझा या वृत्तवाहिनीचे पुण्यातील पत्रकार मंदार गोंजारी यांनी बोगस गोरक्षक असा आरोप करत विपर्यस्त वृत्त प्रसारित केले होते. त्या वृत्ताचा निषेध करण्यासाठी अखिल भारत कृषी गोसेवा संघ आणि समस्त हिंदु आघाडी यांच्या १५० हून अधिक गोरक्षकांनी ९ ऑगस्ट या दिवशी एबीपी माझाच्या पुण्यातील कार्यालयाबाहेर हातात भगवे झेंडे आणि भगव्या टोप्या परिधान करून वैध मार्गाने आंदोलन केले. त्यानंतर निवेदन सादर करून मंदार गोंजारी यांना क्षमा मागण्यास भाग पाडले.
या आंदोलनाला संबोधित करतांना समस्त हिंदु आघाडीचे श्री. मिलिंद एकबोटे म्हणाले, श्री. शिवशंकर स्वामी यांनी गोरक्षणाचे कार्य तपश्चर्या म्हणून केले आणि अनेक कसायांवर ३०० हून अधिक गुन्हे प्रविष्ट केले आहेत. त्यांनाच एबीपी माझा बोगस गोरक्षक म्हणते. त्यामुळे त्यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते. कसाई गायीची हाडे विकून आलेले पैसे इसिसला पाठवतात, असा केंद्रीय गुप्तचर यंत्रणांचा अहवाल आहे. असे असतांना त्यांची पाठराखण करणार्या मंदार गोंजारी आणि एबीपी माझा यांचा आम्ही धिक्कार करतो.
आंदोलनाच्या वेळी पाऊस पडत असतांना आंदोलक ३ घंट्यांहून अधिक काळ कार्यालयाबाहेर गोंजारी यांना भेटण्यासाठी उभे होते. जोपर्यंत गोंजारी क्षमा मागत नाहीत, तोपर्यंत मागे हटणार नाही, असा पवित्रा गोरक्षकांनी घेतल्यामुळे गोंजारी यांना कार्यालयाबाहेर येऊन गोरक्षकांचे निवेदन स्वीकारत क्षमा मागावी लागली.
क्षणचित्र : पोलिसांनी संपूर्ण आंदोलनाचे चित्रीकरण केले. (हाच वेळ पोलिसांनी आतंकवाद्यांच्या शोधार्थ वापरला असता, तर एव्हाना देश आतंकवादमुक्त झाला असता ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
समीर गायकवाड यांच्या अटकेनंतर दोन दिवसांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीच्या पत्रकारांनी रामनाथी येथील आश्रमाला भेट दिली. या पत्रकारांमध्ये मंदार गोंजारी यांचाही सहभाग होता. भेट घेण्यापूर्वी त्यांनी आम्हाला तुमचे कार्य जाणून घ्यायचे आहे, असे सांगितले. त्या वेळी त्यांना सनातनचा आश्रम दाखवण्यात आला. नंतर त्यांनी सनातनचे प्रवक्ता आणि अन्य एक उत्तरदायी साधक यांना प्रश्न विचारून त्यांची मते घेतली. निघतांना मात्र यातील मुख्य पत्रकाराने तुमचे कार्य आणि आश्रम चांगला आहे; पण आम्ही बातमी तुमच्याविषयी नकारात्मकच दाखवणार, असे स्पष्ट सांगितले. त्यानंतर आतापर्यंत एबीपी माझा वृत्तवाहिनीवरून सातत्याने सनातनची अपकीर्ती करणारी वृत्ते प्रसारित केली जात आहेत. याचा अर्थच सनातनचे कार्य कितीही चांगले असले, तरी एबीपी माझासारख्या वृत्तवाहिन्यांचे धोरण धर्मप्रेमी संघटनांच्या विरोधात वृत्ते छापण्याचेच आहे, हे समाजाने जाणावे. – श्री. वीरेंद्र मराठे, व्यवस्थापकीय विश्वस्त, सनातन संस्था.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात