अंबरनाथ (जिल्हा ठाणे) : शासकीय आणि निमशासकीय कार्यालयाच्या आवारात, शाळांमध्ये, तसेच सार्वजनिक ठिकाणी १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी या दिवशी ध्वजारोहण करण्यात येते. त्या दिवशी राष्ट्रध्वजाचा अवमान होऊ नये, यासाठी अंबरनाथ येथे ११ ऑगस्ट या दिवशी राष्ट्रध्वज अंबरनाथ तालुका स्तरीय समितीच्या वतीने बैठक घेण्यात आली होती. या वेळी प्लास्टिकच्या राष्ट्रध्वज वापरणे गुन्हा आहे. प्लास्टिकचा राष्ट्रध्वज इतरत्र कुठे विकत असल्यास त्यावर कारवाई करण्यात यावी आणि रस्त्यावर ध्वज टाकून त्याची विटंबना होऊ नये, या संदर्भात तसेच शाळांमधून राष्ट्रध्वजाचा मान राखावा यावर व्याख्याने घेण्यात यावी, असे परिपत्र तालुक्याचे तहसीलदार श्री. प्रशांत जोशी यांनी उपस्थित अधिकार्यांना काढण्यास सांगितले. त्याचसमवेत नगरपरिषदेला सूचना देऊन ठिकठिकाणी फ्लेक्स लावून त्याविषयी जागृती करू, असेही सांगितले. या बैठकीत शिक्षण विभाग प्रशासन अधिकारी श्री. गजानन मंदाडे, अग्निशमन विभागाचे अधिकारी श्री. पाटील आणि श्री. सोनोने, तसेच हिंदु जनजागृती समितीचे श्री. विरेश अहीर उपस्थित होते.
या बैठकीत हिंदु जनजागृती समितीचे श्री. विरेश अहीर यांनी हिंदु जनजागृती समिती निर्मित राष्ट्रध्वजाचा अवमान टाळा या संदर्भातील ध्वनीचित्रफीत उपस्थितांना दाखवली. त्या वेळी तहसीलदार श्री. जोशी यांनी आम्ही ही ध्वनीचित्रफीत पुढच्या वेळी दाखवू असे सांगितले. सध्या त्यांनी केबलद्वारे तळपट्टी दाखवण्याचे आश्वासन दिले आणि स्थानिक दैनिकांना सूचना देऊ, असे सांगितले. दिलेल्या सूचनेनुसार स्थानिक वृत्तपत्र अमृत कलश मधून आवाहन प्रसिद्ध करण्यात आले आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात