राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी सतर्क असलेल्या हिंदु जनजागृती समितीच्या प्रबोधनाचा परिणाम !
मुंबई : हिंदु जनजागृती समितीने प्रबोधन केल्यानंतर अकोला येथे साकारण्यात येणार्या राष्ट्रध्वजाची प्रतिकृती असलेल्या २३५ फुटांच्या केकच्या रंगामध्ये पालट करणार असल्याचे आश्वासन समितीला देण्यात आले.
११ ऑगस्ट या दिवशी दैनिक लोकमतमध्ये प्रसारित केलेल्या वृत्तानुसार अकोला येथे नॅशनल इंट्रेग्रिटी मिशन, वंदेमातरम् संघ आणि हुशे ज्वेलर्स यांच्या संयुक्त विद्यमाने १५ ऑगस्टला हा विशाल केक साकारण्यात येणार होता. या केकवर राष्ट्रध्वजाचे चित्र दाखवण्यात आले होते. या संदर्भात माहिती मिळाल्यानंतर हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवाजी वटकर यांनी हुशे यांना संपर्क केला. अशा प्रकारचा केक सिद्ध करून तो कापणे हा राष्ट्रध्वजाचा अवमान आहे. या संदर्भात आमच्याकडे तक्रारी आल्या आहेत, असे श्री. वटकर यांनी सांगितल्यावर हुशेे यांनी केकवर अशोकचक्र नसून आम्ही अधिवक्त्यांचाही सल्ला घेतला आहे, असे सांगितले. त्यावर हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी लोकमतमधील वृत्ताचा संदर्भ देऊन केकवर राष्ट्रध्वजाची प्रतिकृती नसल्याचे वृत्त स्पष्टपणे प्रसिद्ध करावे, अशी विनंती केली. यावर हुशेे यांनी केकचा रंग पालटण्यात येऊन तीन रंगांऐवजी केवळ पांढर्या रंगाचा केक सिद्ध करण्यात येईल, असे आश्वासन समितीच्या कार्यकर्त्यांना दिले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात