जळगाव : जे हिंदूंच्या मतांवर निवडून येतात आणि सत्तेवर बसतात, तेच गोमातचे रक्षण करणार्यांच्या विरोधात वक्तव्ये करत असतील, तर धिक्कार असो त्यांचा ! छत्रपती शिवाजी महाराज १४ वर्षांचे असतांना त्यांनी कसायांच्या हातून गोमातेची सुटका केली आणि कसायांचे हात छाटले; मात्र आजचे राज्यकर्तेच गोरक्षण करणार्यांना गुंड म्हणत असतील, तर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांकडून कोणता आदर्श घेतला ? हिंदूंच्या भावना दुखावणारी वक्तव्ये करू नका. तुम्ही केलेले विधान मागे घ्या, अशी मी विनंती करतो, असे प्रतिपादन ह.भ.प. गजानन महाराज वरसाडेकर यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोरक्षकांविषयी केलेल्या अपमानकारक वक्तव्यांचा निषेध करण्यासाठी, तसेच जम्मू-काश्मीर येथे चालू असलेल्या हिंसाचाराला रोखण्यासाठी सैन्याला सर्वाधिकार देण्यात यावेत, या मागण्यांसाठी येथे आयोजित केलेल्या राष्ट्रीय हिंदू आंदोलनात ते बोलत होते. आंदोलनाला विविध हिंदुत्ववादी संघटनांचे ९० प्रतिनिधी उपस्थित होते. या वेळी हस्तफलक धरून निदर्शने करण्यात आली.
पंतप्रधानांच्या गोरक्षकांविषयीच्या वक्तव्याचा निषेध ! – अधिवक्ता निरंजन चौधरी
गोमातेची आज मोठ्या प्रमाणात हत्या होत आहे. असे असतांना त्यावर उपाय करण्याऐवजी गोरक्षकांविषयी अपमानकारक वक्तव्ये करणे निषेधार्ह आहे. मोदींनी गोरक्षकांविषयी विचारपूर्वक बोलायला हवे. जेवढ्या गोरक्षकांवर शासन गुन्हे प्रविष्ट करेल, त्यांना मी अधिवक्ता या नात्याने गोसेवा म्हणून विनामूल्य सहकार्य करीन.
पंतप्रधानांच्या विधानांमुळे हिंदूंचे खच्चीकरण ! – श्री. मोहन तिवारी, शिवसेना
मोदी सत्तेवर आल्यावर हा देश हिंदु राष्ट्र म्हणून घोषित होईल, अशी अपेक्षा होती; मात्र त्यांच्या विधानांमुळे हिंदूंचे खच्चीकरण झाले आहे. गोमातेच्या रक्षणासाठी आमच्यावर कितीही गुन्हे प्रविष्ट झाले तरी चालतील; मात्र आम्ही गोमातेचे रक्षण करणारच !
क्षणचित्र – काही मुसलमान बराच वेळ आंदोलनाच्या ठिकाणी थांबून आंदोलनाचे निरीक्षण करत होते.
पंतप्रधानांनी गोरक्षकांना समाजकंटक म्हटल्याविषयीचे वक्तव्य मागे घ्यावे ! – धर्माभिमान्यांची निवेदनाद्वारे मागणी
कोल्हापूर : पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी गोरक्षकांना समाजकंटक म्हटल्याविषयीचे वक्तव्य मागे घ्यावे, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने धर्माभिमान्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी श्री. शंकर बर्गे यांना १२ ऑगस्ट या दिवशी दिले. या वेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सर्वश्री संभाजी भोकरे, करवीर तालुकाप्रमुख राजू यादव, श्री शिवप्रतिष्ठानचे राहुल नागटिळक, आशिष लोखंडे, बजरंग दलाचे सुधाकर परमणी, वन्दे मातरम् युथ ऑर्गनायझेशनचे अवधूत भाट्ये, युवा सेनेचे भाऊ चौगुले, हिंदु एकता आंदोलनाचे शिवाजीराव ससे, शिवसेनेचे भुदरगड तालुकाप्रमुख प्रकाश पाटील, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष धनराज घाडगे, हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते, तसेच सनातन संस्थेच्या साधिका यांसह अन्य धर्माभिमानी उपस्थित होते.
धर्माभिमान्यांनी श्री. शंकर बर्गे यांच्याशी पंतप्रधानांच्या वक्तव्यासंबंधी चर्चा केली. या वेळी श्री. बर्गे यांनीही धर्माभिमान्यांच्या भावना शासनाला कळवण्यात येतील, असे आश्वासन दिले.
पंतप्रधानांनी गोरक्षक आणि गोमाता यांची क्षमा मागावी ! – पुण्यातील विविध हिंदुत्ववादी संघटनांची मागणी
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोरक्षकांच्या विरोधात केलेले विधान मागे घेऊन गोमातेची क्षमा मागावी, अशा आशयाचे निवेदन येथील हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी श्री. राजेंद्र मुठे यांना देण्यात आले. या वेळी धर्माभिमानी सर्वश्री अनिकेत हराळे, अभिजीत औटी, हिंदु जनजागृती समितीचे प्रवीण नाईक, कृष्णाजी पाटील आणि सनातन संस्थेचे विनायक बागवडे उपस्थित होते.
हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने आंदोलन घेता यावे, यासाठी कार्यकर्ते पोलीस ठाण्यात अनुमती मागायला गेले. त्या वेळी पंतप्रधानाच्या विरोधात आंदोलन करता येणार नसल्याचे सांगून आंदोलनाला अनुमती नाकारण्यात आली. पंतप्रधान स्वत: लोकशाहीचे पुरस्कर्ते असतांना लोकशाही पद्धतीनेच आंदोलन करण्यास अनुमती नाकारल्याने कार्यकर्त्यांनी असंतोष व्यक्त केला.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात