Menu Close

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अभिनव भारत या संघटनेच्या स्थापनेचा जाज्वल्य इतिहास !

savrkar
वर्ष १९०६ पासून इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी (गदरच्या माध्यमातून), अमेरिका, हाँगकाँग, सिंगापूर, ब्रह्मदेश इत्यादी ठिकाणी अभिनव भारत या गुप्त संघटनेच्या शाखा कार्यरत झाल्या. अभिनव भारतची चळवळ दडपण्यासाठी नाशिकमध्ये वर्ष १९०९ मध्ये ब्रिटिशांनी बाबाराव सावरकरांना पकडले आणि त्यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावून अंदमानात पाठवले. त्याचा सूड म्हणून वर्ष १९०९ मध्ये ब्रिटिशांची राजधानी लंडन येथे क्रांतीवीर मदनलाल धिंग्रा याने कर्झन वायलीला भर समारंभात गोळ्या घालून ठार मारले, तर पुढील वर्षीच नाशिकमध्ये विजयानंद चित्रपटगृहामध्ये जिल्हाधिकारी (कलेक्टर) जॅक्सनला क्रांतीकारक अनंत कान्हेरे, देशपांडे आणि कर्वे यांनी पिस्तुलने गोळी झाडून ठार मारले.

शेवटी ब्रिटिशांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांना अटक करून आणि अभिनव भारतच्या अनेक क्रांतीकारकांना पकडून त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला भरला. त्यांना जबरदस्त शिक्षा ठोठावल्या आणि ही क्रांतीकारक चळवळ दडपण्याचा प्रयत्न केला, तरीही सशस्त्र क्रांतीची ही चळवळ नष्ट झाली नाही.

१५ ऑगस्ट १९४७ ला देशाचे विभाजन करून का होईना, ब्रिटिशांना भारत सोडावा लागला आणि तीन चतुर्थांश हिंदुस्थान स्वतंत्र झाला. त्यानंतर १० ते १२ मे १९५२ अशा तीन दिवसांच्या पुण्यातील महोत्सवात स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अभिनव भारत या क्रांतीकारी संघटनेची सांगता केली. स्वतंत्र आणि लोकशाही भारतात सशस्त्र उठावाचा मार्ग अव्यवहार्य असल्याने संस्था विसर्जित करण्यात आली.

abhinav_bharat

१. अभिनव भारत या क्रांतीकारी संघटनेच्या स्थापनेची संकल्पना

१ अ. तात्या (स्वातंत्र्यवीर सावरकर), श्री. म्हसकर आणि श्री. पागे यांनी देशस्वातंत्र्यासाठी शपथ घेण्याचे अन् सशस्त्र क्रांतीच्या कार्यासाठी एक गुप्त मंडळ स्थापन करण्याचे ठरवणे : प्लेगच्या काळात शासकीय रुग्णालयातील एक कनिष्ठ अधिकारी श्री. म्हसकर आणि त्यांचे स्नेही श्री. पागे यांच्याशी तात्यांचा (स्वातंत्र्यवीर सावरकरांचा) चांगलाच परिचय झाला होता. श्री. म्हसकर आणि श्री. पागे हे श्री. शि.म. परांजपे यांच्या काळचे वाचक होते अन् त्यांना काळकर्त्यांची मतेही पटत होती. तथापी त्यांच्या मनात क्रांतीकारक संघटना स्थापन करावी, असा विचार येत नव्हता. तात्यांसमवेत जेव्हा त्यांची चर्चा होत असे, तेव्हा तात्या त्यांना आपण क्रांतीकारकांचे गुप्त मंडळ स्थापले पाहिजे, असे सुचवत असत. तात्यांसमवेत होणार्‍या नियमित गाठीभेटी आणि चर्चा यांतून त्यांच्याही मनात सशस्त्र क्रांतीची स्पष्ट कल्पना आणि उत्कट इच्छा मूर्तरूप घेऊ लागली. शेवटी असे ठरले की, तात्या सावरकर, श्री. म्हसकर आणि श्री. पागे या तिघांनी देशस्वातंत्र्यासाठी शपथ घ्यायची अन् सशस्त्र क्रांतीच्या कार्यासाठी एक गुप्त मंडळ स्थापन करायचे.

१ आ. राष्ट्रभक्त समूह नावाने गुप्त संस्था आणि तिचे निरुपद्रवी रूप असलेली मित्रमेळा ही संघटना यांची स्थापना : वर्ष १८९९ मध्ये या गुप्त मंडळाची स्थापना झाली. या संघटनेचे नाव राष्ट्रभक्त समूह असे ठेवण्यात आले. आपल्या या गुप्त मंडळात तरुणांचा सहभाग होणे आवश्यक आहे. त्यासाठी अत्यंत सावधगिरीने निरुपद्रवी अशी एक उघड संस्था स्थापन करावी, असे मत तात्यांनी व्यक्त केले आणि मग तिघांच्या सहकार्याने नाशिकच्या तिळभांडेश्‍वरच्या बोळात १.१.१९०० या दिवशी मित्रमेळा नावाची एक प्रकट संस्था स्थापन झाली. ही मित्रमेळा संस्था राष्ट्रभक्त समूह या गुप्त संस्थेची प्रकट शाखा होती.

१ इ. विषारी झाडांची पाने खुडत बसण्यापेक्षा त्याच्या मुळावर घाव घालणे श्रेष्ठ कसे ?, हे बैठकांमध्ये सांगून सावरकरांनी राष्ट्रप्रेम जागृत करणे : या मंडळाच्या बैठका प्रत्येक शनिवारी आणि रविवारी होत. या बैठकीत वेगवेगळ्या विषयांवर चर्चा होत असे. प्रथम विषय अगदीच साधे असत; पण तात्याराव सावरकर मात्र त्यांचा संबंध अकस्मात् राजकारणाशी जुळवून देत असत. ते म्हणायचे, निर्बंध वाईट आहेत, तेे बदला. जे क्रूर अन् जाचक आहे, तेे काढा, अशी किरकोळ रडवी गार्‍हाणी किती दिवस करायची ? विषारी झाडांची पाने खुडत बसण्यापेक्षा त्यांच्या मुळावर घाव घातला, तरच तेे नष्ट होईल. कधीतरी तो घाव घालायचाच आहे, तर मग आजच तो का न घालावा ? जो कुणी आरंभ करील, त्याला स्वतःच्या प्राणांचे मूल्य द्यावेच लागणार. मग तो आरंभ आजच करून प्राणदानाचे मूल्य आपण का द्यायचे नाही ?

१ ई. मुळावर घाव न घालणार्‍या राष्ट्रीय पक्षांची चूक बैठकांमध्ये मांडून विषारी वृक्षाचे अमृतवृक्षात रूपांतर होणे अशक्य असल्याचे सांगणारे १७ वर्षे वयाचे सावरकर ! : या विषारी वृक्षांची पाने तेवढी वाईट आहेत, ती खुडली पाहिजेत. मुळाशी आमचा वाद नाही, असे म्हणण्यात राष्ट्रीय पक्षाची चूक आहे. या विषारी वृक्षाला न दुखावता नुसत्या प्रार्थनांचे ओशट दूध घालत राहिलो, तर तो आपण होऊन अमृतवृक्षात रूपांतरित होईल, असे म्हणणारे नेमस्त चुकत आहेत. या दोन्ही चुका बुद्धीभ्रष्ट आहेत. त्या दोन्हीही सुधारल्या पाहिजेत. त्यांना जे शक्य वाटत नाही, ते आपण शक्य करूया; कारण तो परवशतेचा विषारी वृक्ष सुधारण्याचा एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे त्याचे आमूलात् उन्मूलन. सावरकरांनी हे भाषण जेव्हा केले, तेव्हा त्यांचे वय अवघे सतरा वर्षांचे होते. सावरकर असे विचार आपल्या भाषणातून मांडायचे.

१ उ. बैठका आडवळणावरील एका माडीवर घेण्याचा निर्णय घेणे आणि क्रांतीकारकांची छायाचित्रे लावून ती सजवणे : त्यांच्या या बैठका प्रथम पागे, म्हसकर किंवा अन्य सहकारी मित्र यांच्या घरी होत. नंतर मात्र आबा दरेकरांच्या माडीवर मंडळाची जागा निश्‍चित झाली. आबा दरेकरांची माडी ही नाशिकमध्ये अशा ठिकाणी होती की, ती माडी म्हणजे गुप्त कटासाठी असलेले एक बीळ होते. सावरकरांना वाटायचे, ही जागा म्हणजे नियतीने गुप्त कटासाठीच आधीपासून शास्त्रोक्त पद्धतीने बांधलेली जागा आहे. नंतर त्या उदास जागेत गुप्त कटाला साजेसा शृंगार चढवण्यात आला. रवि वर्मा यांनी काढलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र त्या माडीवर मुख्यस्थानी विराजमान झाले. सावरकरांनी त्यांच्या वडिलांनी जतन करून ठेवलेले नानासाहेबांचे छायाचित्र लावले. झाशीची राणी, तात्या टोपे, वासुदेव बळवंत फडके, चापेकर आणि रानडे या क्रांतीकारकांची छायाचित्रे त्या माडीवर झळकली.

१ ऊ. खोलीतील क्रांतीकारकांच्या छायाचित्रांमुळे संघटना देशद्रोही वाटू शकते, यासाठी इंग्रजी राजाचे चित्र लावायचा समुपदेश सावरकरांनी फेटाळणे आणि त्याऐवजी देवतांची चित्रे लावणे : एक सहकारी म्हणाला, माझी एक सूचना आहे. आपण देशभक्त आणि क्रांतीकारक यांची छायाचित्रे लावली. हे पुष्कळ छान झाले. पुढे-मागे जर कधी पोलिसांनी इथे छापा टाकला, तर ही सगळी एकाच पंथातील बंडखोरांची छायाचित्रे पाहून आपली संस्था देशद्रोही आहे, याचा सबळ पुरावा त्यांना मिळेल; म्हणून या सर्वांच्या छायाचित्रांसमवेत इंग्रजांच्या राजाचे किंवा राणीचे चित्र लावावे. त्यांच्या या सूचनेला म्हसकर आणि पागे यांनी अनुमोदन दिले. सावरकरांनी आणि त्यांच्या अन्य मित्रांनी ही सूचना अत्यंत तिरस्काराने फेटाळून लावली. केवळ सूचना फेटाळून सावरकर गप्प बसले नाहीत, तर ते म्हणाले, आम्हाला राजद्रोहाची शिक्षा झाली, तरी चालेल; पण आमच्या देशाच्या प्रत्यक्ष शत्रूंंची चित्रे आम्ही वंदनीय मानणार नाही. पोलिसांच्या डोळ्यांत धूळ फेकण्यासाठीही आम्ही ती लावणार नाही. वाटल्यास राजकीय वास येऊ नये; म्हणून आपल्या देवतांची चित्रे लावण्यास हरकत नाही. मग त्या ठिकाणी श्रीराम आणि श्रीकृष्ण यांची चित्रे लावली.

१ ए. माडीवरील मित्रमेळा पोलिसांच्या दृष्टीस पडू नये, याची पूर्ण काळजी घेतली जाणे : पोलिसांच्या डोळ्यांत मित्रमेळा एकाएकी भरू नये, याची सावधगिरी पाळण्यात येत होती. आबा दरेकारांची माडी बोळातील एका कोपर्‍यात होती. त्यामुळे तेथे होणार्‍या व्याख्यानांचा आवाज बाहेर रस्त्यापर्यंत येत नव्हता, तरीसुद्धा सावधानता म्हणून माडीवर बैठका चालू असतांना मित्रमेळ्याचे १ – २ सभासद जागता पहारा द्यायचे. सावरकरांची व्याख्याने मात्र अक्षररूपाने किंवा लेखी स्वरूपात ठेवली नव्हती. मित्रमेळ्याच्या सभासदांनी लिहून आणलेले निबंध तेवढे जतन करून ठेवले होते; कारण त्या निबंधात व्यापार, व्यायाम, स्वदेशी, शिक्षण, वेदांत असे विविध विषय असायचे. त्यामुळे मित्रमेळा हे मंडळ निरुपद्रवी, राजकारणशून्य आणि साधारण वक्तृत्व सभा आहे, असे वाटावे.

२. शिवजयंती आणि गणेशोत्सव यांतून केलेली जागृती

२ अ. पारतंत्र्याच्या जोखडातून मुक्त होण्यासाठी आम्ही शिवजयंतीच्या उत्सवाचे आयोजन केले आहे ! : एका शिवजयंतीच्या उत्सवात सार्वजनिक व्याख्यान देतांना सावरकर म्हणाले, आजवर आपण महाराष्ट्रीय लोक असे सांगत होतो की, शिवोत्सव ऐतिहासिक आहे. या उत्सवात आमचा राजकीय हेतू काहीही नाही; पण आज आम्ही जो उत्सव करत आहोत, तो संपूर्णपणे राजकीय आहे. शिवाजी उत्सव करण्याचा अधिकार त्यांनाच आहे की, जे शिवाजीसारखे आपल्या या परतंत्र मातृभूमीला स्वतंत्र करण्यासाठी झुंजण्यास समर्थ आहेत. या उत्सवाचा मुख्य उद्देश इंग्रजांच्या बेड्या तोडून स्वदेशाला स्वतंत्र करण्याची स्फूर्ती आम्हाला मिळावी, हाच आहे.

२ आ. शिवाजी ही स्वातंत्र्याची देवता असून पारतंत्र्यात सुखाने रहाणे, सवलती मागणे, असे हेतू असलेल्यांसाठी शिवजयंती नाही ! : जर परवशतेत समाधानाने रहायचे असेल, केवळ लठ्ठ पगाराच्या जागा मिळवायच्या असतील, परदास्याचे पट्टेवाले व्हायचे असेल, हा कर न्यून व्हावा, हा निर्बंध ढिला (सैल) व्हावा, इतकेच ध्येय असेल; आम्हाला निवृत्तीवेतन हवे, सवलती हव्यात, एवढीच ज्यांची महत्त्वाकांक्षा असेल, अशांच्या ध्येयाला शिवाजींचा उत्सव सुसंगत होणार नाही. अशा ध्येयपूर्तीसाठी मग शेवटच्या बाजीरावांचा उत्सव साजरा करणे अधिक सुसंगत होईल, म्हणजे पावला तर तो पावेल; पण रायगडचा शिवाजी पावणार नाही. ती स्वातंत्र्याची देवता आहे. आम्ही आज या स्वातंत्र्यदेवतेला आवाहन करतो की, ती देवता आमच्या अंगात संचारावी आणि तिने स्वदेश स्वातंत्र्याच्या कर्मक्षेत्री झुंजण्याची आणि जिंकण्याची शक्ती यावी. परिस्थितीनुरूप साधने पालटतील; पण साध्य तेच राहील. बाण पालटतील; पण लक्ष्य तेच राहील !

२ इ. सावरकरांनी शिवजयंती आणि गणेशोत्सव यांवेळी केलेल्या व्याख्यानांमुळे नाशिकमध्ये स्वातंत्र्यलक्ष्मीचा जयजयकार निनादू लागणे : सावरकरांच्या या ओजस्वी विचारांनी सभा भारावून गेली. सार्वजनिक सभेत पूर्वी अशी खळबळ कधी उडाली नव्हती. संपूर्ण नाशिकमध्ये आठवडाभर याच विषयांवर चर्चा होत होती. नाशिककरांना समजून चुकले की, हा मित्रमेळा साधासुधा नाही. देशभक्तीची आणि जाज्वल्य देशाभिमानाची प्रभा या मित्रमेळ्याभोवती आहे. शिवजयंती उत्सवाच्या मागोमाग आलेल्या गणेशोत्सवातही स्वातंत्र्याच्या अन् स्वदेशाच्या स्फूर्तीदायक संदेशाविना अन्य बोलणे नव्हते. सावरकरांच्या व्याख्यानांना नाशिककर गर्दी करू लागले. भाषणांत सावरकरांनी स्वातंत्र्यलक्ष्मी की जय असा जयजयकार केला आणि संपूर्ण नाशिक शहर याच जयजयकाराने निनादू लागले.

३. इंग्लंडच्या राजावर स्तुतीसुमने उधळणार्‍यांना खडसवणारे स्वातंत्र्यवीर सावरकर !

३ अ. संस्कृत पंडितांनी इंग्लंडच्या राजावर केलेल्या काव्यात त्याला देव संबोधणे आणि सावरकरांनी त्या राजाचा खरपूस समाचार घेणे : एकदा तात्या सावरकर त्र्यंबकेश्‍वरला गेले होते. त्र्यंबकेश्‍वरला इंग्लंडचे सातवे राजे एडवर्ड यांच्या गौरवाची धामधूम चालू होती. तिथल्या एका संस्कृत पंडिताने एडवर्डला देव मानून त्याच्यावर काव्य केले. त्यात इंग्रज शासनाला मायबाप असे संबोधले होते. त्या संस्कृत पंडितांचे ते काव्य सावरकरांच्या हाती पडले. इंग्रजांच्या राजाला देव, पृथ्वीपती म्हणून गौरवल्याचा त्यांना राग आला. त्यांनी त्या पंडिताला सांगितले, Truely these are pearls, but they are thrown before swine (हे सर्व मोती आहेत; पण डुकरापुढे फेकलेले !) आपण आपल्या गिर्वाणवाणीला इंग्रज राजावर स्तुतीसुमने उधळण्यासाठी वापरू नका. अशाने ती देवभाषा विटाळेल ना ? विष्णुः पृथ्वीपती हे खरे आहे; पण तो राजा आपला असला तर ! दुसर्‍यांच्या देशावर जो केवळ शस्त्रबलाच्या आधारावर राज्य करतो, तो आपला राजा नाही आणि देव तर नाहीच नाही !

३ आ. राजा एडवर्डच्या आरोग्यासाठी आयोजित केलेल्या सभेला विरोध करणारी पत्रके वाटणे : राजा एडवर्ड यांच्या आरोग्यासाठी त्र्यंबकेश्‍वर मंदिराजवळ एक सभा आयोजित करण्यात आली. सावरकरांनी रातोरात गावात परराजाशी निष्ठा म्हणजे स्वराष्ट्राशी द्रोह अशी पत्रके लावली. सभेचे अध्यक्ष म्हणाले, राजे एडवर्ड खरोखरच आपले बाप आहेत. दुसर्‍या दिवशी संपूर्ण गावात राजा एडवर्ड जर आपले बाप आहेत, तर आपले वडील आपल्या मातोश्रींचे कोण ?, अशी पत्रके झळकली.

४. राष्ट्राभिमानालाच प्राधान्य देणारे सावरकर !

४ अ. देशाच्या अस्मितेसाठी कधीही तडजोड न करणे : सावरकरांनी देशहितासाठी, स्वत्वासाठी आणि देशाच्या अस्मितेसाठी कधीही तडजोड केली नाही आणि राष्ट्राभिमान गहाण ठेवला नाही. त्यांच्या मित्रमेळ्याचा उद्देश पुढीलप्रमाणे होता.

बिंदूचे बनते तळे या सृष्टीक्रमाते धरा ।
हिंदू जे असतील ते मिळवूनी निर्दाळणे या परा ।
निंदूनी जनघातकारक सुखा राष्ट्रार्थ मृत्यू बरा ।
शुक्ल दुज्ज्वल बीजमंत्र हृदी ही संस्था धरी उर्वरा ॥

४ आ. इंग्रजांच्या सामर्थ्याचे कौतुक करणार्‍या मित्राला सडेतोडपणे उत्तर देणे : आपण पारतंत्र्यात आहोत, याचे सावरकरांना विलक्षण दुःख होते. हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यासाठी आपण पराकाष्ठेचे प्रयत्न केले पाहिजेत, असे त्यांना वाटायचे. आपल्या मित्रांकडेसुद्धा ते याविषयी बोलायचेे. त्यांचे मित्र म्हणायचे, इंग्रजांचे सामर्थ्य केवढे आणि आपले केवढे ? काही तुलना तरी होऊ शकते का ? इंग्रज म्हणतात ते खरे आहे. त्यांच्या साम्राज्यावरचा सूर्य कधीच मावळणार नाही. त्यावर सावरकरांनी तात्काळ उत्तर दिले,

जे मत्त फारचि बलन्वित गर्ववाही ।
उद्विग्न मानस निराशाही जे तयाही ।
हे पाहिजे स्वमनी चिंतन नित्य केले ।
विश्‍वात आजवरी शाश्‍वत काय झाले ?

४ इ. लोकांमध्ये वीरश्री निर्माण होण्यासाठी पोवाडे लिहिणे : सावरकरांनी मित्रमेळ्याच्या कार्यक्रमांसाठी देशभक्ती जागवणार्‍या कविता, देशास्तव धारातीर्थी पडलेल्या वीरांवर पोवाडे लिहिणे, ते सादर करणे, तसेच तानाजीचा पोवाडा (सिंहगडचा पोवाडा), बाजीप्रभु देशपांडे यांचा पोवाडा, असे पोवाडे लिहून जनतेत वीरश्री निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

५. क्रांतीकारकांसाठी राष्ट्रीय शिक्षण संस्था असणारी अभिनव भारत संंघटना !

५ अ. इटलीच्या मझिनीच्या क्रांतिकारी संघटनेच्या यंग इटली या नावाप्रमाणे आपल्या संघटनेचे नाव असण्याच्या सावरकरांच्या इच्छेमुळे संघटनेचे नाव पालटून अभिनव भारत असे ठेवण्यात येणे : मे १९०४ मध्ये नाशिकला भागवतांच्या वाड्यात मित्रमेळ्याचे संमेलन आयोजित करण्यात आले होते. या संमेलनाला २०० च्या वर तरुण उपस्थित होते. मित्रमेळा हे क्रांतीकारी संघटनेचे नाव मिळमिळीत आहे, असे सावरकरांचे पहिल्यापासून मत होते; पण म्हसकर आणि पागे यांच्या आग्रहास्तव त्यांनी त्या नावाला मान्यता दिली होती. इटलीचा मझिनी हा सावरकरांचा आदर्श होता. त्याच्याप्रमाणेच आपणही हिंदुस्थानला स्वतंत्र करण्यासाठी तरुणांची संघटना स्थापन करायची, हीच त्यांच्या जीवनाची इतिकर्तव्यता होती. हिंदुस्थानचा मझिनी होणे, हे त्यांचे स्वप्न होते. मझिनीच्या क्रांतीकारी संघटनेचे नाव यंग इटली होते, त्याचप्रमाणे आपल्याही संघटनेचे नाव असले पाहिजे, असे त्यांना वाटत होते; म्हणून त्यांनी या संमेलनाच्या निमित्ताने मित्रमेळ्याचे अभिनव भारत असे नामकरण केले आणि संघटनेचा जन्महेतू स्पष्ट झाला. शिक्षण पूर्ण होताच आपल्या हेतूला कृतीचे रूप द्यायचे त्यांनी मनात पक्के केले होते.

५ आ. देश स्वतंत्र होण्यासाठी एकट्याने लढून मरण आले तरी चालेल, अशी शिकवण देणारी अभिनव भारत संघटना ! : अभिनव भारत ही केवळ क्रांतीकारकांची संघटना नव्हती, तर ती एक राष्ट्रीय शिक्षणसंस्था होती. आपल्या देशाला स्वतंत्र करणे, हेच आपले साध्य आहे. इंग्रजी सत्ता उलथवून टाकणे, ही काही अशक्य गोष्ट नाही. सशस्त्र क्रांतीयुद्धात आपल्याला आपले कर्तव्य बजावले पाहिजे. प्रत्येकाने निदान आपल्या एका शत्रूला तरी ठार मारावे. इतरांनी आपला कित्ता गिरवला, तरी भले, नाही तरी भले ! आपल्या कार्यात आपल्याला यश येवो अथवा न येवो. देशमाता मुक्त होण्यासाठी, शत्रुचा सूड उगवण्यासाठी तू एकटा जरी लढलास, एका शत्रूला मारून दास्य शृंखलेचा एक दुवा जरी तोडलास, या कार्यात कामी आलास, तरी हरकत नाही; कारण तू तुझे कर्तव्य पार पाडले आहे, असे अत्यंत उग्र अन् उत्कट त्यागाचे शिक्षण अभिनव भारतमध्ये दिले जात होते.

६. शिक्षणानंतर सावरकरांनी अभिनव भारत संघटना स्थापन करून घेतलेली शपथ !

६ अ. उच्च शिक्षणासाठी आगबोटीने जातांना सावरकरांची देशवासियांशी देशाच्या स्वातंत्र्याविषयी चर्चा होणे आणि गुप्त संघटनेच्या स्थापनेच्या त्यांच्या विचाराने दोन तरुण भारावून जाणे : सावरकरांचे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाले. कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी ते १.६.१९०६ या दिवशी लंडनला जाण्यासाठी परशिया या आगबोटीवर चढले. त्यांच्यासमवेत हिंदुस्थानातील अनेक तरुण होते. त्यांच्याशी प्रवासात परिचय झाला आणि त्यांच्यात देश मुक्त कसा होईल ?, यावर चर्चा होत असे. सावरकरांच्या विचारांनी तरुण भारावून जायचे. केशवानंद आणि शिष्टाचारी हे दोन तरुण सावरकरांचे जीवलग मित्र बनले. सावरकरांनी त्यांना इटलीच्या जोसेफ मझिनीचे चरित्र वाचायला दिले.

त्या दोघांनी ते मनःपूर्वक वाचले. त्यानंतर सावरकर त्यांना म्हणाले, आपल्या हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यासाठी मझिनीच्याच यंग इटलीसारखी गुप्त संस्था स्थापणे आवश्यक आहे.

६ आ. मझिनीच्या यंग इटलीचेे उदाहरण देऊन सहकार्‍यांचे शंकानिरसन करणे : शिष्टाचारी म्हणाले, अशी गुप्त संस्था स्थापन करणे, हे तर आपले प्रथम कर्तव्यच आहे; पण अशी गुप्त संस्था आपल्यासारख्या मूठभर तरुणांनी स्थापून काय उपयोग ? त्यात आपल्याला तर कुणीही ओळखत नाही. टिळक, लाला लजपतराय किंवा बडोद्याचे सयाजीराव यांच्यासारख्या कुणी ती स्थापली, तर काही उपयोग आहे. त्यांनी जर अशी संस्था स्थापन केली, तर आपण त्यात सहभागी होऊ. ती स्थापन होईपर्यंत मात्र आपल्याला थांबावे लागेल. त्यावर सावरकर म्हणाले, मझिनी आणि त्यांच्या यंग इटलीतील तरुणही आपल्यासारखेच अप्रसिद्ध आणि मूठभरच होते; पण त्यांच्या नावाचा उच्चार करताच युरोपातील सिंहासनांचा थरकाप उडायचा. एखादी गुप्त संस्था हिंदुस्थानात स्थापनही झाली असेल. अशी गुप्त संस्था काही वृत्तपत्रातून तिच्या स्थापनेची प्रसिद्धी देईल का ?

६ इ. आपणच गुप्त संस्था का स्थापन करू नये ?, असा प्रश्‍न विचारणे आणि सहकार्‍यांमध्ये देशभक्तीची मशाल प्रज्वलित करणे : जर अशी संस्था स्थापन करणे, हे आपल्याला आपले प्रथम कर्तव्य वाटत असेल, तर आपणच तशी संस्था का स्थापन करू नये ? आपण तिघेजण पुष्कळ मोठे कार्य करू शकतो. चापेकर बंधूंनी नाही का अत्याचारी इंग्रज अधिकार्‍यांचे शिरकाण करून राष्ट्राचा सूड उगवला ? आपल्या प्राणांच्या बदल्यात शत्रूचा एक प्राण, याप्रमाणे शत्रूंची आपल्याला हानी करता येईल. मग कुणी आपल्यासमवेत येवो किंवा न येवो; पण आगीने आग जशी पेटत जाते, तशीच देशविरांच्या शौर्याने शौर्य भडकत जाते. कधी कधी ठिणगीने वणवा पेटतो.

६ ई. भारावून गेलेल्या सहकार्‍यांनी आगबोटीवरच संस्था स्थापन करण्याचा निणर्र्य घेणे आणि तिचे अभिनव भारत हे नावही निश्‍चित करणे : सावरकरांच्या या विचाराने केशवानंद आणि शिष्टाचारी उत्तेजित झाले. ती चर्चा तिथेच थांबली; पण रात्री शिष्टाचारींनी वीर सावरकरांना आपल्या खोलीत बोलावून काही शंका विचारल्या. सावरकरांनी त्यांच्या शंकांचे निरसन केले. शिष्टाचारी सावरकरांना म्हणाले, तुमच्या विचारांनी आणि दणकट देशभक्तीने मी भारावून गेलो आहे. चला, आपण आताच या आगबोटीवरच क्रांतीकारक गुप्त संघटनेची स्थापना करूया; पण त्या संस्थेचे नाव काय ठेवायचे ? सावरकर म्हणाले, अभिनव भारत. केशवानंदांचे काय ?, असे शिष्टाचारींनी विचारताच ते तर अशा गुप्त संस्थेची शपथ घेण्यास केव्हाही सिद्ध आहेत. अभिनव भारत हे नावही त्यांना आवडले आहे, असे सावरकरांनी सांगितले.

६ उ. सावरकरांनी सहकार्‍यांना शपथ वाचायला देणे आणि हे आमरण व्रत असल्याचे त्यांच्या मनावर बिंबवणे : सावरकरांनी इंग्रजीत शपथ लिहून आणली होती. तो कागद त्यांनी शिष्टाचारींसमोर धरला आणि म्हणाले, प्रथम ही शपथ वाचा. त्या शपथेच्या रम्याद्भुततेने दिपून जाऊ नका. उत्क्षुब्धही होऊ नका. शपथ घेतल्याने होणार्‍या भयंकर परिणामांचा प्रथम विचार करा. हे आमरण व्रत धरले नाही, तरी चालेल; पण एकदा हे व्रत घेतले की, त्यातून सुटका नाही. अगदी मरेपर्यंत !

६ ऊ. सहकार्‍यांनी सहमती दर्शवल्यानंतर सावरकरांनी सवर्र्र्प्रथम शपथ घेऊन अभिनव भारत या संघटनेची स्थापना करणे : शिष्टाचारींनी ही शपथ वाचली आणि गंभीर होत ते म्हणाले, मी हा वसा, हे व्रत घ्यायला सिद्ध आहे. ठीक आहे. आता सर्वांत प्रथम मीच ही शपथ घेतो, असे म्हणून सावरकरांनी ती अद्भुत शपथ घेतली आणि अजरामर अशा अभिनव भारत या संघटनेची स्थापना झाली.

– श्री. दुर्गेश परुळकर (संदर्भ : प्रज्वलंत, आत्मार्पण विशेषांक, २६ फेब्रुवारी २००१)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *