हिंदु जनजागृती समितीची राष्ट्रध्वजाचा मान राखा मोहीम !
मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबईतील महापालिकेच्या शाळांमध्ये शिक्षण विभागाच्या वतीने व्हर्च्युअल क्लासच्या माध्यमातून येणार्या प्रक्षेपणामध्ये हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रध्वजाचा मान राखा हे व्याख्यान, तसेच हिंदु जनजागृती समितीची राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्याच्या संदर्भातील ध्वनीचित्रफीत मुंबईतील महापालिकेच्या ४८० शाळांमध्ये दाखवण्यात आली.
मुंबईतील चार भाषांच्या (मराठी, हिंदी, इंग्रजी आणि उर्दू) शाळांतील १ लाखांहून अधिक विद्यार्थांपर्यंत हा विषय पोचवण्यात आला. यामध्ये विद्यार्थ्यांना क्रांतीकारकांची माहिती, तसेच स्वातंत्र्यदिन आदर्शरित्या कशाप्रकारे साजरा करावा ?, राष्ट्रधवजाचा मान कशा प्रकारे राखला पाहिजे ? याविषयीचे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कु. वर्षा जेवळे यांनी केले. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाचे आणि त्याच्या सहकार्यांचे या उपक्रमासाठी चांगल्या प्रकारे सहकार्य लाभले.
मुंबईच्या महापौर सौ. स्नेहल आंबेकर यांना जेव्हा समितीचे शिष्टमंडळ भेटले, त्या वेळी त्यांनी त्वरित संबंधित उपायुक्त श्री. रणजित ढाकणे, शिक्षण अधिकारी श्री. महेश पालकर यांना हिंदु जनजागृती समितीच्या उपक्रमांना सहकार्य करण्याचे आदेश दिले. त्याचप्रमाणे महापौरांनी स्वातंत्र्यदिनी प्लास्टिकचे राष्ट्रध्वज वापरू नयेत, या आशयाचे आवाहनपत्रक काढले. वरळीच्या शिवसेना नगरसेविका आणि बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण समितीच्या अध्यक्षा सौ. हेमांगी वरळीकर यांचेही सहकार्य लाभले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात