आयुर्वेदीय गर्भसंस्कार पुस्तक कायद्याच्या चौकटीतच ! – न्यायालयाचा निर्वाळा
या प्रकरणी आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांची अपकीर्ती करणारे त्यांची जाहीर क्षमा मागतील का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात
पुणे : गर्भसंस्कार केल्याने मुलगा होईल, असा दावा आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांनी आयुर्वेदीय गर्भसंस्कार या पुस्तकात कुठेही केलेला नाही. लिंगनिदान प्रतिबंधक कायद्याचा या पुस्तकात भंग झालेला नाही. तसेच त्या पुस्तकातील संदर्भ हे प्राचीन परंपरा असलेल्या आयुर्वेदातील चरक आणि सुश्रुत यांच्या ग्रंथातून घेण्यात आलेले आहेत. त्या संदर्भांचा लिंगनिदानाशी काडीमात्रही संबंध नाही. त्यामुळे आयुर्वेदीय गर्भसंस्कार या पुस्तकातील लिखाणाच्या अनुषंगाने तांबे यांच्या विरोधात प्रविष्ट केलेली तक्रार मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपिठाचे न्यायमूर्ती ए.व्ही. निरगुडे आणि न्यायमूर्ती व्ही.एल्. अचलिया यांनी फेटाळून लावली आहे. आपल्या पुस्तकातील प्रतिपादनाचा हेतू पुत्रप्राप्ती हा नसून सुदृढ अपत्यप्राप्ती हा आहे, असे तांबे यांच्या वतीने अधिवक्ता राजेंद्र रघुवंशी आणि अधिवक्ता ज्ञानेश्वर बागुल यांनी खंडपिठासमोर मांडले. या युक्तीवादानंतर संगमनेर येथील न्यायालयात प्रविष्ट असलेली तक्रार रहित करण्याचे आदेश खंडपिठाने दिले.
ही तक्रार फेटाळतांना न्यायालयाने म्हटले आहे की, आयुर्वेदीय गर्भसंस्कार या पुस्तकातील हे लिखाण हा भारतीय वैद्यकशास्त्र, आयुर्वेद शाखेच्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमात, तसेच शिक्षणपद्धतीमध्ये समाविष्ट आहे. या पुस्तकातील विवेचन हे कायद्याचा भंग करणारे आहे, असे ओढून ताणूनही दाखवता येणार नाही.
अपकीर्तीविषयी संबंधितांवर कायदेशीर कारवाई करणार ! – आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे
आयुर्वेद वैद्यविशारद पदवीचे मूळ प्रमाणपत्र महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसीनकडे सादर केल्यानंतरच त्यांनी वर्ष १९८७ मध्ये नोंदणी केली आहे. तरीसुद्धा वस्तूस्थितीच्या विपरीत आणि पुराव्यांकडे दुर्लक्ष करून जाणीवपूर्वक खोडसाळपणे संभ्रम निर्माण करणे अन् चारित्र्यहनन करणे, याविषयी कथित समाजसेवक गणेश बोर्हाडे प्रयत्न करत आहेत. उच्च न्यायालयाने तक्रार फेटाळल्यानंतरही त्यांनी वर्तमानपत्रांना खोटी माहिती पुरवलेली आहे. त्यामुळे अपकीर्ती केल्याविषयी कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे, असे आयुर्वेदाचार्य श्री. बालाजी तांबे यांनी म्हटले आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात