पाकमधील हिंदूंचे अत्याचार थांबवण्यासाठी स्वातंत्र्यापासून आतापर्यंत भारतातील एकाही शासनकर्त्याने प्रयत्न केले नाहीत, हे लज्जास्पद आहे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
इस्लामाबाद : पाकच्या २० कोटी लोकसंख्येत केवळ १० टक्के अल्पसंख्यांक आहेत. त्यात अधिक हिंदू आहेत. त्यांच्यावर स्वातंत्र्यापासून आतापर्यंत अत्याचार होत आहेत. त्याचा निषेध करण्यासाठी पाकिस्तानमध्ये अल्पसंख्यांक दिवस साजरा केला गेला. या वेळी पाकच्या प्रत्येक शहरातील हिंदूंनी रस्त्यावर येऊन पाकचा विरोध केला.
सध्या पाकमधील हिंदू संतप्त आहेत. याला पाकिस्तान पीपल्प पार्टीचे माजी खासदार अब्दुल हक उत्तरदायी आहेत. हक यांना मियां मिठ्ठू या नावानेही ओळखले जाते. पाकमध्ये हिंदूंच्या धर्मांतराचे सूत्रधार मिठ्ठू हेच असल्याचा आरोप हिंदूंकडून होत आहे. मियां मिठ्ठू हिंदु मुलींचे अपहरण करून त्यांचे धर्मांतर करतात. आतापर्यंत त्यांच्यावर ११७ गुन्हे प्रविष्ट करण्यात आलेले आहेत. अल्पसंख्यांकदिनी हिंदूंनी मियां मिठ्ठू यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. पाकच्या संसदेत सत्ताधारी पक्षाचे खासदार डॉ. रमेश कुमार वांकवानी यांनी पाकमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारांची माहिती दिली. मियां मिठ्ठू यांच्याकडून हिंदूंच्या करण्यात येत असलेल्या धर्मांतरावरही त्यांनी अनेकदा आवाज उठवला आहे.
पाकमधील काही वृत्तवाहिन्यांनी मियां मिट्ठू यांच्या गुन्हेगारीवर वृत्त प्रसिद्ध केले आहे; मात्र त्याच्यावर अजून कारवाई झालेली नाही. पाकमधील वरिष्ठ पत्रकार नजम सेठी एका वृत्तवाहिनीवर बोलतांना म्हणाले की, जर मुल्ला-मौलवींना अधिकार मिळाले, तर ते जनावरांनाही मुसलमान करतील. त्यांच्या या कट्टरतेमुळे संपूर्ण जगात पाकिस्तानची अपकीर्ती झाली आहे. पाकमध्ये प्रत्येक वर्षी १२ ते १५ वर्षांच्या ३०० हिंदु मुलींचे अपहरण केले जाते, असे मुव्हमेंट फॉर सॉलिडेटरी अॅण्ड पीस या पाकमधील संस्थेच्या अहवालात म्हटले आहे. अपहरणानंतर त्यांचे बळजोरीने विवाह करून धर्मपरिवर्तन केले जाते. हिंदूंच्या विरोधाचे आणखी एक कारण म्हणजे गेल्या काही आठवड्यांपासून हिंदूंच्या हत्या होत आहेत. कराचीमध्ये एका हिंदु तरुणाची आणि एका हिंदु डॉक्टरची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात