राम झालाच नाही, रामाने रामसेतू बांधलाच नाही, असे म्हणणार्यांना याविषयी काय म्हणायचे आहे ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात
नोएडा : भारताची संस्कृती आणि पुराण यांमध्ये अत्यंत महत्त्वाचे स्थान असणार्या रामायणातील रामसेतूवर भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या (आयआयटीच्या) विद्यार्थ्यांकडून नव्याने संशोधन करण्यात येणार आहे.
श्रीरामांनी जेव्हा लंकेवर आक्रमण केले, तेव्हा त्यांनी वानरसेनेच्या साहाय्याने समुद्रावर या सेतूचे निर्माण केले होते. भगवान विश्वकर्मा यांचे पुत्र नल आणि नील यांच्या अतिशय प्रगत स्थापत्य तंत्रज्ञानाने निर्माण करण्यात आलेला हा सेतू पाण्यावर तरंगत होता. वानरसेनेने दगडांवर राम लिहून पाण्यात टाकल्यामुळे ते तरंगले, अशी आख्यायिकाही या संदर्भात प्रसिद्ध आहे. भारत आणि श्रीलंका यांच्या सीमेवर असलेला हा सेतू कोणत्या तंत्रज्ञानाने निर्माण केला होता, या रहस्याचा शोध अद्याप जगातील एकही शास्त्रज्ञ लावू शकले नाहीत. अशाच प्रकारे भारतातील अनेक रहस्य ज्याच्यापर्यंत आजचे विज्ञान पोहचू शकले नाही, अशा भारतातील प्राचीन स्थळांवरील स्थापत्यकलेचा शोध घेण्यासाठी भारतीय तंत्रज्ञान संस्थेचे (आयआयटीचे) विद्यार्थी त्या काळातील संस्कृत ग्रंथांचा अभ्यास करणार आहेत.
या दृष्टीकोनातून आयआयटी, खडकपूरमध्ये एक केंद्र चालू करण्यात येणार आहे. त्यासह भुवनेश्वर येथेही संस्कृत भाषेचा एक अभ्यासक्रम चालू करण्यात येणार आहे. आयआयटी रूडकी येथेही संस्कृत ग्रंथांमधील विज्ञान आणि अभियांत्रिकीचे ज्ञान शिकवण्याचे नियोजन करण्यात येत आहे. आयआयटीच्या एका संचालकांच्या मते, अभियांत्रिकीमधील चमत्कारांचे तंत्रज्ञान शेकडो वर्षांपूर्वी केवळ संस्कृत ग्र्रंथांमध्येच होते. रामसेतू आणि अशोक स्तंभ त्याचे मोठे उदाहरण आहेत.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात