चाकण : येथील पोलीस ठाण्यातील दामिनी पथकातील महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी रोड रोमियो व बेशिस्त वाहन चालकांवर धडक कारवाई करून आजपर्यंत एकूण १५० रोडरोमिओंवर कारवाई केली आहे. दामिनी पथकातील महिला पोलीस रणरागिणी झाल्याने रोडरोमिओ चांगलेच वठणीवर आले आहेत. तसेच मुली व महिलांच्या सुरक्षेसाठी कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी नुकत्याच काढलेल्या आदेशानुसार चाकण पोलीस ठाण्यात निर्भया पथकाची स्थापना करण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांनी दिली.
निर्भया पथकात एक पोलीस अधिकारी, दोन महिला पोलीस व दोन पुरुष पोलीस यांचा समावेश असून हे पथक साध्या वेशात टेहळणी करून गस्त घालत आहेत. मुलींची छेडछाड होणाऱ्या ठिकाणी लक्ष ठेवून साध्या वेशात स्टिंग ऑपरेशन करून कार्रवाई करत आहे, त्यासाठी कॅमेरा व व्हॉइस रेकॉर्डिंग करून गुन्हे दाखल करण्यात येत आहे व यापूढेही कायमस्वरूपी चालू राहणार आहे. निर्भया पथकातील नावे गुप्त ठेवण्यात आली आहेत. मुलाचे स्टिंग ऑपरेशन करून त्याच्या आई वडिलांना पोलीस ठाण्यात बोलावून आपल्या मुलाचा प्रताप त्यांना दाखविण्यात येत आहे. तसेच विवाहित पुरुष असल्यास त्याच्या पत्नीला पोलीस ठाण्यात बोलावून आपल्या नवऱ्याचा प्रताप दाखविण्यात येत असल्याने छेडछाड करणाऱ्यांवर चांगलाच वचक बसला आहे. एखादी महिला तक्रार देण्यास पुढे येत नसेल तर महिला पोलीस फिर्यादी होऊन गुन्हा दाखल करण्यात येत असल्याचे गिरीगोसावी यांनी सांगितले.
महाविद्यालय परिसर, एस टी बस स्थानक, बाजारपेठ व रस्त्यावर, नो पार्किंग मध्ये आदी ठिकाणी बेशिस्त पणे गाड्या लावणाऱ्यावर सुद्धा कारवाई करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली दामिनी स्कॉड मधील महिला पोलीसांनी परिसरात बेधडक कारवाई केल्याने नागरिकांमधून त्यांचे अभिनंदन होत आहे. त्यामुळे महाविद्यालयीन मुलींमध्ये आत्मविश्वास वाढला आहे. अशा कारवाई मध्ये पोलिसांनी सातत्य ठेवल्याने नागरिकांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण झाली आहे.
संदर्भ : लोकमत