-
मंदिर सरकारीकरणाचा दुष्परिणाम !
-
देवधनाचा वापर हा धर्मकार्यासाठीच व्हायला हवा, असे शास्त्र सांगते.
शिर्डी : भाविकांना पायाभूत सुविधा देणे, हे श्री साई संस्थानचे आद्यकर्तव्य आहे. त्यामुळे शिर्डीच्या स्थानिक विकासानंतरच राज्य सरकारला निधी देण्याविषयी विचार करू, असे प्रतिपादन श्री साई संस्थानचे अध्यक्ष श्री. सुरेश हावरे यांनी केले. (राज्याचा विकास करणे हे शासनाचे कर्तव्य आहे, त्यासाठी देवस्थानच्या निधीवर डोळा कशाला ? हिंदूंना धर्मशिक्षण नसल्यानेच असे विचार होत आहेत ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) शिर्डीचे ग्रामस्थ आणि देवस्थानचे विश्वस्त यांची संयुक्त बैठक १६ ऑगस्ट या दिवशी झाली. त्या वेळी ते बोलत होते.
राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी नुकतीच श्री साई संस्थानसह राज्यातील अन्य देवस्थानांचा ५० टक्के निधी सरकारने आरोग्याच्या सुविधेसाठी घ्यावा, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. त्या मागणीला विरोध म्हणून ग्रामस्थांनी महाजन यांच्या पुतळ्याचे दहनही केले होते. या पार्श्वभूमीवर शिर्डी संस्थानच्या अध्यक्षांनी भूमिका स्पष्ट करावी, अशी भूमिका घेतली होती. त्या दृष्टीने ही बैठक आयोजित केली होती.
या वेळी हावरे यांनी सांगितले की, शिर्डीतील वैद्यकीय सेवा अधिक सक्षम आणि लोकाभिमुख करू. शताब्दीच्या पार्श्वभूमीवर शहर आणि संस्थान यांचा एकत्रित विकास करू. त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार यांच्याकडून निधी मिळवू, तसेच भाविकांचे दर्शन आनंददायी होण्याकरता येथे भक्तीमय अन धार्मिक वातावरण निर्माण करू. त्याचसमवेत लेझर-शो, श्री साई गार्डन यांसारख्या मनोरंजनाच्या सुविधा निर्माण करू. (मनोरंजनाच्या सुविधांमुळे वातावरण भक्तीमय कसे होईल ? देशातील अनेक धार्मिक स्थळे पर्यटनस्थळे बनल्यामुळे आज तेथील सात्त्विकता आणि चैतन्य न्यून झाले आहे. त्यामुळे धार्मिक स्थळी भक्तीभाव वृद्धींगत करणारे सत्संग, नामजप आदी कार्यक्रम झाले, तर धार्मिक वातावरण निर्माण होईल ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात