मुंबई : समुद्र, नदी, तलाव अशा नैसर्गिक जलस्रोतांमध्ये गणेशमूर्तींचे विसर्जन करून पर्यावरणास हानी पोचू नये यासाठी मुंबई महापालिका प्रतिवर्षी दोन-अडीच कोटी खर्च करून कृत्रिम तलाव बांधते. या तलावांत जेमतेम २० टक्के गणेशमूर्तीचे विसर्जन केले जाते. तसेच या मूर्तीच्या गाळाचे विसर्जन अखेर समुद्रातच होतेे. (असे आहे तर मग कृत्रिम तलांवाचा घाट नेमका कशासाठी ? त्यातील प्लास्टिक कापडाच्या भ्रष्टाचारासाठी कि पुरोगाम्यांना खुष करण्यासाठी ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
शहरात प्रतिवर्षी साधारण दोन लाखांहून अधिक घरगुती गणेशमूर्ती आणि सुमारे बारा सहस्र सार्वजनिक गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येते. पालिकेने कृत्रिम तलाव उपलब्ध करून गणेशमूर्तीच्या विसर्जनासाठी जनजागृती करूनही ८० टक्के मूर्तीचे विसर्जन समुद्र, नदी, तलाव अशा नैसर्गिक स्रोतांमध्ये केले जाते.
कृत्रिम तलावाच्या निर्मितीसाठी खोदावा लागणारा खड्डा, त्यातील प्लास्टिक कापड, दीड-पाच-सात दिवसांच्या विसर्जनानंतर पालटावे लागणारे पाणी, विसर्जन करण्यासाठी नेमलेली मुले, तलावातील गाळ घेऊन जाण्याचा वाहतूक खर्च, तसेच सुरक्षारक्षक यासाठी किमान पाच ते सात लाख रुपये खर्च येतो. शहरात कृत्रिम तलावांची संख्या वाढत असून साधारण तीस कृत्रिम तलावांसाठी दोन कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात