न्यूयॉर्क : ‘इस्लामिक स्टेट’ या क्रूर दहशतवादी संघटनेने त्यांच्या ताब्यातील गुलाम स्त्रियांशी शारीरिक संबंध कसे ठेवावेत, याचा सविस्तर फतवा काढल्याचे समोर आले आहे. गुलाम स्त्रियांशी शारीरिक संबंध ठेवताना ‘नियमभंग’ झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी हा फतवा काढला.
अमेरिकेच्या विशेष कार्यकारी दलाने ‘आयएस’च्या उच्च अधिकाऱ्यावर या वर्षी मे महिन्यात धाड टाकली होती. यामध्ये त्यांना मिळालेल्या अनेक कागदपत्रांमध्ये या फतव्याचा समावेश आहे. जारी केलेल्या फतव्यानुसार, वडील आणि मुलाला समान महिलेशी संबंध ठेवता येणार नाहीत. एखादी माता आणि तिची मुलगी या दोघींशी त्यांचा मालक संबंध ठेवू शकणार नाही, असे यामध्ये म्हटले आहे. तसेच एखाद्या महिलेला कुणी संयुक्तपणे विकत घेतले असेल, तर तिच्यावर त्या दोघांचाही समान अधिकार असेल.
‘इस्लामिक स्टेट’वर संयुक्त राष्ट्रे आणि मानवी हक्कांच्या गटांनी हजारो स्त्रियांचे अपहरण, बलात्कार यांसारखे आरोप केलेले आहेत. यामध्ये अगदी बारा वर्षांच्या मुलींचाही समावेश आहे. यातील बहुसंख्य स्त्रिया उत्तर इराकमधील याजिदी अल्पसंख्य गटातील आहेत. यातील अनेकांनी आपल्या घरातील स्त्रियांना ‘आयएस’च्या लढाऊ गटातील सैनिकांना बक्षीस म्हणून किंवा लैंगिक गुलाम म्हणून विकले आहे. या गुलामगिरीचे व्यवस्थापन करण्यासाठी ‘आयएस’ने ‘वॉर स्पॉइल्स’ नावाचा एक स्वतंत्र विभागच तयार केला.
‘आयएस’ने जारी केलेला हा फतवा हा त्यांच्या आतापर्यंतच्या फतव्यापेक्षा वेगळा असून या फतव्याला कायद्याचे रूप देण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला असल्याचे एका अभ्यासकाने म्हटले आहे. इराक आणि सीरियामधील ‘आयएस’च्या ताब्यातील प्रदेशात स्त्रियांच्या लैंगिक गुलामगिरीचे समर्थन करणाऱ्या हजारो वर्षांपूर्वींच्या शिकवणीचे पुन्हा स्पष्टीकरण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
महिलांवर वारंवार बलात्कार
मानवी हक्कांच्या गटाने ‘आयएस’च्या तावडीतून सुटलेल्या वीस महिलांच्या मुलाखती या वर्षी एप्रिल महिन्यामध्ये घेतल्या होत्या. त्यांनी सांगितलेली माहिती अंगावर काटा आणणारी आहे. ‘तरुण महिला आणि मुलींना बाकींच्यापासून वेगळे केले जाते. अत्यंत संघटितपणे इराक आणि सीरियातील विविध ठिकाणी या स्त्रियांना नेले जाते. त्यानंतर त्यांना विकले जाते किंवा बक्षीस म्हणून दिले जाते. त्यांच्यावर नंतर वारंवार बलात्कार करण्यात येतो,’ असे त्यांनी सांगितले.
संदर्भ : महाराष्ट्र टाईम्स