भाग्यनगर (हैद्राबाद) : सतीशकुमार प्रधान यांच्या अटकेसंदर्भात भाग्यनगर (हैद्राबाद) येथील भाजपचे आमदार आणि श्रीराम युवा सेना या हिंदुत्वनिष्ठ संघटनेचे अध्यक्ष राजासिंह ठाकूर यांच्याशी दैनिक सनातन प्रभातच्या प्रतिनिधीने चर्चा केली. या प्रकरणासंदर्भात राजासिंह म्हणाले, आज भारतात सर्वात मोठ्या प्रमाणात गोहत्या होत आहेत. भारत जागतिक स्तरावर सर्वाधिक प्रमाणात गोमांस निर्यात करणारा देश झाला आहे. पंजाब गोरक्षा दल त्यांच्या स्तरावर गोरक्षणाचे कार्य करत आहे. विविध शहरांमध्ये त्यांच्या शाखाही आहेत. पंजाब पोलिसांनी सतीश कुमार यांना अटक करून संपूर्ण हिंदु समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. जर गोमातेला राष्ट्रीय प्राणी घोषित करून कायद्याने तिला संरक्षण दिले असते, तर गोरक्षणाच्या संदर्भात आज अशी दुस्थिती दिसली नसती. कोणताही सनातनी हिंदु गोहत्या होतांना पाहू शकत नाही. मी सतीश कुमार प्रधान आणि सर्व गोरक्षक यांच्या पाठीशी आहे. प्रधान यांना माझा पाठिंबा आहे.
धडाडीचे गोरक्षक श्री. सतीश प्रधान यांच्या अटकेच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील गोसेवकांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया !
गोरक्षकांना नाहक त्रास देण्याची किंमत शासनाला चुकवावी लागेल ! – पंडितकाका मोडक, संचालक, सरसेनापती हंबीरराव मोहिते गोशाळा, वडकी
हिंदुत्वाच्या प्रेमापोटी लोकांनी पंतप्रधानांना बहुमताने निवडून दिले. मोदी यांनी गोरक्षकांना समाजकंटक संबोधून त्यांच्या भावनांना ठेच पोहोचवली आहे. गोरक्षकांवर गुन्हे प्रविष्ट करण्याऐवजी त्यांनी प्राणीसंरक्षण कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करावी. पोलिसांकडून गोरक्षणाचे कार्य होत नसल्याने गोरक्षकांना हे कार्य करावे लागते. महाराष्ट्रात गोरक्षणाच्या संदर्भात ९५ टक्क्यांहून अधिक प्रथमदर्शी अहवाल हे गोरक्षकांचे आहेत. पोलीस आपणहून कोणतीही अवैधरित्या गोवंशियांची वाहतूक करणारी गाडी पकडत नाहीत. मोदी सरकारने हिंदूंच्या भावनांचा विचार करावा. गोरक्षकांच्या दृष्टीने गाय हा जिवंत देव आहे. सतीश कुमारांसारख्या गोरक्षकांना अटक करून सरकारने वेडेपणा केला आहे. त्यांची किंमत सरकारला चुकवावी लागेल. हिंदुत्वाच्या भावनेने गोरक्षक पंतप्रधान मोदी यांच्यासमवेत राहिले. मोदी शासन सत्तारूढ होण्यात गोरक्षकांचा मोठा वाटा आहे. पंतप्रधान मोदी यांनी गोरक्षकांच्या संदर्भात असंवेदनशील वक्तव्य करायलाच नको होते; कारण गोरक्षण करणारा कार्यकर्ता स्वतःचा जीव धोक्यात घालून धन अर्पण करून गोरक्षणाचे कार्य करत असतो.
सतीश प्रधान हे केवळ गोरक्षक नाही, तर साधूच आहेत. त्यांची भेट होण्याचा योग आला, तेव्हा पहाटे चार वाजता उठून ते गोशाळेत गोमातेची काळजी घेत असल्याचे मी पाहिले आहे. गोरक्षणासाठी ते रात्रंदिवस कष्ट घेत आहेत. तेथे गायीला चारा द्यायला येण्यासाठी लोकांची रांग लागलेली असते. त्यांच्या अटकेने पंजाबमधील लाखो लोकांच्या भावनेला ठेच पोहोचली आहे.
सरकारच्या शक्तीपेक्षा गोमातेची शक्ती निश्चितच मोठी ! – अधिवक्ता देवदास शिंदे, सचिव, हिंदु स्वाभिमान प्रतिष्ठान
गोरक्षण करतांना सतीश प्रधान यांनी केलेले कार्य हे एखाद्या स्वातंत्र्यसैनिकाने केलेल्या कार्याप्रमाणे आहे. गोरक्षणाच्या कार्यात ते कधीच मागे ढळणार नाहीत. कोणतेही सरकार गोरक्षकांना गोरक्षणापासून परावृत्त करू शकणार नाही; कारण सरकारच्या शक्तीपेक्षा गोमातेची शक्ती निश्चितच मोठी आहे. त्यामुळे सरकारने चुकीचे कार्य करण्यापेक्षा गोरक्षकांचे मत आणि गोमातेचे दुःख समजून घेणे आवश्यक आहे. गोरक्षकांना यातना देण्याचा, तसेच त्यांना गोरक्षणापासून परावृत्त करण्याचा कितीही प्रयत्न झाला, तरी गोरक्षणाचे कार्य अबाधितपणे पुढे चालू राहील. महाराष्ट्र गोरक्षा दलाचा समन्वयक म्हणून माझ्यासह सहस्रो गोरक्षक सतीश प्रधान यांच्यासमवेत शेवटपर्यंत रहातील.
गायीला आपली माता समजा ! – श्री. नितीन वाटकर, गोवंश रक्षा समितीचे पिंपरी-चिंचवड समन्वयक
भारत हा माझा देश आहे, असे समजणार्या प्रत्येकाने गायीला आपली माता समजावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी याप्रमाणे वागत नाहीत. त्यांनी ८० टक्के गोरक्षक हे समाजकटंक असल्याचे केलेले विधान पूर्णतः चुकीचे आहे. भ्रष्टतेचा नियम भाजपला लावायचा झाला, तर पक्षातील ८० टक्के लोकप्रतिनिधी भ्रष्ट असल्याचे म्हणावे लागेल.
गोरक्षकांवर कारवाई म्हणजे एकप्रकारे गोमातेवरच कारवाई होय ! – अंकुश गोडसे, संस्थापक-अध्यक्ष, गोविज्ञान आणि गोसंवर्धन संस्था, सांगली
भाजप शासन केंद्रात सत्तेत येण्यासाठी गोरक्षकांनीही जिवाचे पाणी केले आहे. असे असतांना भाजप शासन गोरक्षणासाठी कार्य करणार्या खर्या गोरक्षकांवर कारवाई करून त्यांच्यावर अन्यायच करत आहे. गोरक्षकांवर कारवाई म्हणजे एकप्रकारे गोमातेवरच कारवाई होय ! ज्याप्रमाणे आजपर्यंत गोमाता आणि गोरक्षक यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला, त्याचे काय परिणाम झाले, हे शासनाला वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे या शासनालाही त्याचे परिणाम भोगावे लागतील, हे शासनाने लक्षात ठेवावे !
गोमातेच्या रक्षणासाठी कोणतीही तडजोड करणार नाही ! – सचिन पवार, गोल्ला समाज, राष्ट्रीय अध्यक्ष
आताचे शासन केवळ मतांचे राजकारण करून गोरक्षकांना त्रास देत आहे, हे अत्यंत दुदैवी आहे. वास्तविक आताच्या सत्ताधार्यांकडून गायींच्या रक्षणासाठी काहीतरी होईल, या मोठ्या अपेक्षेने गोरक्षक पहात होते; मात्र आताचे सत्ताधारी त्याच्या उलट वागत आहेत. कत्तलीसाठी ज्या गायी गाड्यांमध्ये कोंबल्या जात आहेत. त्यामुळे त्यांचे मृत्यू होत आहेत. त्या घायाळ होत आहेत. ज्या गायींची रस्त्यावर हत्या होत आहे, असे प्रकार शासनाला दिसत नाहीत, तर जे गोरक्षक प्र्राणांची बाजी लावून गायींचे रक्षण करत आहेत, त्यांच्यावर मात्र तात्काळ कारवाई होत आहे. गोरक्षणासाठी आम्ही यापूर्वीही प्राणांची बाजी लावलेली आहे आणि यापुढेही लावू. गोमातेच्या रक्षणासाठी आम्ही कोणतीही तडजोड करणार नाही. गायीचे काम करणार्यांच्या विरुद्ध कृती करणार्यांना गोपालक भगवान श्रीकृष्णच योग्य ती शिक्षा देईल !
सदंर्भ : दैनिक सनातन प्रभात