Menu Close

जिहादी विळख्यात सापडलेला पाक आणि बलुचिवासियांचे बंड !

Bhau_torsekar
श्री. भाऊ तोरसेकर

१. ज्या बुद्धीवादी वर्गाने पाकिस्तानी जिहादी मानसिकतेला खतपाणी घातले, तीच मनोवृत्ती आता तिथल्या अभिजनांवर उलटली !

पाकिस्तानात आता तिथल्या जाणत्या वा अभिजनांना जिहादचे चटके जाणवू लागले आहेत. काही दिवसांपूर्वी क्वेट्टा येथे झालेली भीषण बॉम्बस्फोटाची घटना त्याचीच ग्वाही देते; कारण या स्फोटात सर्वाधिक मारले गेले आहेत, ते अधिवक्ते आहेत. एका सन्मान्य अधिवक्त्यावर दोन दुचाकीस्वारांनी गोळ्या झाडल्या. तो अधिवक्ता संघटनेचा पदाधिकारी होता. साहजिकच वकीलवर्गात त्यावरून संतापाची लाट येणार हे उघड होते. त्याला उपचारासाठी रुग्णालयात आणले गेले आणि त्याचा तिथेच मृत्यू झाला. पुढल्या घटना अपेक्षित होत्या. विनाविलंब तिथे वकिलांनी गर्दी केली आणि त्या गर्दीतच कोणीतरी भयंकर स्फोट घडवून पाऊणशे लोकांचा झटक्यात बळी घेतला. यामागे कोणाचा हात आहे, त्याचा शोध घेण्याच्या आधीच बलुचिस्तानच्या मुख्यमंत्र्यांनी भारतीय गुप्तचर खात्यावर घातपाताचा आरोप करून टाकला. पाक सेनेच्या स्थानिक अधिकारी वर्गानेही त्याला दुजोरा देऊन टाकला. आता ही पाकिस्तानी शैली झालेली आहे.

पाकिस्तानात कुठेही असंतोष वा हिंसक घटना घडली की, त्यासाठी भारतीय गुप्तचर संस्थेला उत्तरदायी धरणे ही जणू फॅशन झाली आहे. आरंभीच्या काळात त्याचा गवगवा पाकिस्तानी माध्यमे आणि पत्रकारही करत असत; मात्र त्याचे चटके बसू लागले, तेव्हा अनेकांना जाग येऊ लागली. भारताला हिणवण्याची संधी म्हणून ज्या बुद्धीवादी वर्गाने पाकिस्तानी जिहादी मानसिकतेला खतपाणी घातले, तीच मनोवृत्ती आता तिथल्या अभिजनांवर उलटू लागली. पाकमध्ये शेकड्यांनी लहानमोठे जिहादी गट तयार झाले असून, ते आपापल्या हेतूसाठी कोणालाही लक्ष्य करू लागले आहेत. त्या मानसिकतेचा भीषण आविष्कार म्हणजे क्वेट्टा येथील घटना म्हणता येईल; पण त्यातला भारतावर झालेला आरोप नुसता झटकून टाकता येणार नाही. त्यामागे किती तथ्य आहे, त्याकडेही बारकाईने बघावेच लागेल.

२. पाकच्या सेनेनेच प्रशिक्षित केलेल्या बलुची तरुणांनी पाकविरुद्ध पुकारले बंड !

balochi_man
आंदोलन करणारे बलुची

गेल्या दहा-बारा वर्षांत बलुचिस्तान हा पाकिस्तानचा प्रांत धुमसू लागला आहे. मुळात भारत स्वतंत्र झाला आणि त्याची फाळणी झाली, तेव्हा बलुचिस्तान हा पाकिस्तानला मिळणारा प्रदेश नव्हता. ब्रिटिशांनी तिथल्या सुलतानाला स्वयंनिर्णयाची मुभा दिलेली होती; पण इथे काश्मिरात घुसखोरी करणार्‍या पाक लष्कराने, राजकीय समर्थनाने बलुचिस्तानात घुसखोरी केली आणि तो प्रांत बळकावला. तिथल्या सुलतानाच्या कपाळाला पिस्तुल लावून विलिनीकरणाच्या प्रस्तावावर स्वाक्षर्‍या घेण्यात आल्या. तेव्हापासून बलुची टोळ्या अस्वस्थ राहिलेल्या आहेत. आरंभीच्या काळात या टोळीवाल्यांना आधुनिक जगाच्या रितीच ठाऊक नसल्याने, त्यांना सुलतानाच्या जागी नवे पाक सरकार आल्याने काही भेद जाणवला नाही; पण जसेजसे सक्तीने त्यांच्या प्रदेशात अन्य ठिकाणचे नागरिक आणून वसवले जाऊ लागले, तसतशी नाराजी वाढू लागली. आपली जमातवादी संस्कृती सोडायला नाखुश असलेल्या या लोकसंख्येवर पाकिस्तानी सत्तेने त्यांच्या पद्धतीचा इस्लाम लादण्यास आरंभ केला. इतर गोष्टीत आधुनिक पाक कायदे राबवण्याचा अट्टाहास केल्याने संघर्ष आकाराला येऊ लागला. त्यातच वर्ष १९८० नंतर तिथे अफगाणी जिहादसाठी जगभरातून मुसलमान तरुण आणून प्रशिक्षित केले गेले. त्यांचे जगणे या टोळीवाल्यांना आपलेसे वाटणारे होते. त्यामुळेच टोळ्यांमध्ये विभागल्या गेलेल्या बलुचींमध्ये जिहादी हिंसेची लागण झाली. त्यांचे प्रशिक्षणही पाकच्या सेनेने केले. साहजिकच आज ज्यांनी बलुची स्वातंत्र्याचा झेंडा खांद्यावर घेऊन बंड पुकारले आहे, ते पाकसेनेनेच प्रशिक्षित केलेले जिहादी आहेत. तालिबान म्हणून घडवले गेले, त्यांच्यातले काही जण बलुची होते आणि त्यांनी आता आपली वेगळी संघटना केलेली आहे. ज्या पाक हेरखात्याने आणि सेनेने त्यांना घडवले, त्याच आपल्या सूत्रधाराला ही मंडळी जुमानेशी झाली आहेत. त्यातून बलुचीस्तान धुमसू लागला आहे.

३. केवळ बंदुका रोखून वा अंगावर रणगाडे घालून पाकला बलुचिस्तान मुठीत ठेवता येणे अशक्य !

आधी अफगाण जिहाद आणि नंतर अमेरिकेच्या तालिबान मुक्तीसाठी पाकिस्तानने मारलेली कोलांटी उडी, यातून जिहादींमध्ये दुफळी माजली. त्यांपैकी काही जण आजही पाक हेरखात्याचे हस्तक म्हणून नव्या अफगाण सरकारला सतावत असतात; पण त्यातले पख्तुनी आणि बलुची मात्र पाकिस्तानी सेनेपासून दुरावले आहेत. त्यातूनच नवा संघर्ष पेटला आहे. यातल्या काही जणांनी थेट भारताकडे हस्तक्षेपाची मागणीही केलेली आहे. अर्थात बलुची सीमा कुठेही भारतीय प्रदेशाशी जवळ नसल्याने असे कुठलेही साहाय्य भारत त्यांना पुरवू शकत नाही; पण इराणच्या मार्गाने तसे साहाय्य केले जाऊ शकते आणि तसे काहीसे होत असल्याचा पाकिस्तानचा दावा आहे. त्यात अजिबात तथ्य नसेल, असेही मानता येत नाही. मध्यंतरी इराणमध्ये व्यवसाय करणार्‍या एका माजी भारतीय लष्करी अधिकार्‍याला बलुची प्रदेशात पकडल्याचा दावा पाकिस्तानने केला होता. अजून तो पाकच्याच कह्यात आहे; पण सूत्र भारताने पाकमध्ये हिंसाचार करण्याचे किंवा तिथल्या बंडखोरांना साहाय्य करण्याचे नाही, कारण कुठल्याही देशाचे हेरखाते असे उद्योग नेहमीच करत असते. पाकची हेरसंस्था भारतात कुरापती घडवण्यास साहाय्य करत असेल, तर भारताची हेरसंस्थाही तशी कुठलीही संधी सोडणार नाही. त्याला पायबंद घालायचा, तर आपल्या प्रदेशातील लोक नाराज आणि असंतुष्ट रहाणार नाहीत, याची काळजी घ्यायला हवी. पाकिस्तानने बलुचिस्तानात तितकी सावधानता बाळगली, तर भारताला तिथे हस्तक मिळू शकणार नाही. कुठलाही देश आपले नागरिक अन्य देशांत उचापती करायला पाठवत नाही. घातपातासाठी स्थानिक लोकांचाच वापर होत असतो. क्वेट्टा वा अन्य पाक प्रदेशात असे काही होत असेल, तर आपल्या नागरिकांच्या वेदना, यातना पाकने समजून घ्यायला हव्यात. नुसत्या बंदुका रोखून वा अंगावर रणगाडे घालून बलुचिस्तान मुठीत ठेवता येणार नाही.

४. पाकच्या परराष्ट्र नीतीची सूत्रे आता आतंकवाद्यांकडे !

गेल्या वर्षभरात क्रमाक्रमाने पाकिस्तानच्या अनेक प्रांतात हिंसक घटनांचा वेग वाढतो आहे. बलुचिस्तान तर आगडोंब उसळल्यासारखा धुमसतो आहे. त्याचे चटके कराची आणि अन्य नागरी भागांतही जाणवू लागले आहेत; पण यातला भेद लक्षात घेण्यासारखा आहे. पूर्वी पाकचे राज्यकर्ते भारताला धमक्या देत असत. मग त्यांनाही मागे टाकून लष्करी नेत्यांनी, अधिकार्‍यांनी चेतावणी देण्याचा प्रघात पडला. पाकमध्ये लष्कराचाच शब्द चालतो, अशी एक समजूत त्यामुळे रूढ झाली होती; पण आता सूत्रे लष्कराच्याही हातून निसटलेली दिसत आहेत; कारण भारताला धमक्या देण्याची परराष्ट्रनीती आता तिथले मुजाहिदीन आणि तोयबा घोषित करू लागले आहेत. सईद हाफीज किंवा सलाहुद्दीन अशी मंडळी पाक सरकारला काय करावे याविषयी मार्गदर्शन करू लागली आहेत. अमुक जागी अणूबॉम्ब टाकू किंवा काश्मीरला वैद्यकीय पथक पाठवू, असे सईद हाफीज सांगतो, तेव्हा तो कुठल्या अधिकारात बोलत असतो ? हे लोक इतके उद्दाम झालेत की, त्यांचा जिहाद आणि धार्मिक आतंकवाद नागरी लोकसंख्या अन् अभिजन वर्ग यांना भयभीत करू लागला आहे. त्यातले जे कुणी विरोधात आवाज उठवतील, त्यांना घातपाताने संपवण्याची प्रक्रिया आता चालू झाली आहे. क्वेट्टा वा कराचीतील अनेक हिंसक घटना बघितल्या, तर नागरी अधिकार आणि लोकशाहीची पोपटपंची करणार्‍या बुद्धीवादी वर्गाला त्यात ठरवून लक्ष्य केले जात आहे. पाक आता पुरता जिहादी आतंकवादाच्या विळख्यात फसला आहे. निदान लष्कराला काही शिस्त असते; पण जिहादी म्हणजे रानटी न्याय. यात सर्वांत पहिला बळी बुद्धीवादी वर्गाचा जात असतो. सिरीया, इराक आणि लिबिया ही त्याची ताजी उदाहरणे आहेत.

– श्री. भाऊ तोरसेकर, ज्येष्ठ पत्रकार, मुंबई.

(संदर्भ : http://jagatapahara.blogspot.in/)

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *