श्री गणेशाच्या आगमनापूर्वी गणेशभक्तांना असा मोर्चा काढावा लागणे याहून दुसरे दुर्दैव कुठले ?
गणेशोत्सव आनंदात साजरा करता यावा, यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना अपरिहार्य आहे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
कराड : येथील मुख्याधिकार्यांनी गणेशमंडळांवर लादलेल्या निर्बंधांच्या विरोधात कराड येथील गणेशभक्तांनी प्रांत कार्यालयावर भव्य मोर्चा काढला. मोर्च्याचे नेतृत्व हिंदु एकता आंदोलनाचे पश्चिम महाराष्ट्रचे अध्यक्ष आणि कराड नगरसेवक श्री. विनायक पावसकर यांनी केले. मुख्याधिकार्यांनी सर्वोच्च न्यायालयाचा आदेश पुढे करत गणेशमंडळांनी वाहतुकीसाठी रस्त्यावर जागा सोडावी, असे सांगत गणेशमंडळांना नोटिसा बजावल्या आहेत. त्या अनुषंगाने मोर्च्याचे आयोजन करण्यात आले होते.
१. कराड येथील गणेशभक्त गेली १०० हून अधिक वर्षे गणेशोत्सव साजरा करत आहेत. आतापर्यंत गणेशमंडळांनी शासनाला सहकार्यच केले आहे; पण कराड नगरपालिकेचे मुख्याधिकारी औंधकर यांनी गणेशमंडळांच्या कार्यकर्त्यांशी कोणतीही चर्चा न करता गणेश मंडळांना नोटिसा बजावल्या. कराडच्या भौगोलिक स्थितीविषयी त्यांना काहीच ठाऊक नाही. कराडमधील पुष्कळ रस्त्यांवरून अग्नीशमन दलाची गाडी जाऊ शकत नाही. त्यामुळे मंडळांनी तेथे जागा कशी सोडायची ? कराडचे मुख्याधिकारी म्हणजे मोहम्मद गझनी असून त्यांनी हुकूमशाही आरंभली आहे. कायद्याच्या आडोशाने ते गणेशोत्सवात विघ्ने आणत आहेत. गणेशमंडळे आहे त्याच ठिकाणी गणेशमूर्ती बसवतील. त्याला विरोध केला आणि कराडमधील शांतता भंग पावली, तर त्याला कराडचे मुख्याधिकारीच उत्तरदायी असतील, असेही या मोर्च्यात या वेळी सांगण्यात आले.
२. कराडचे नगरसेवक श्री. हणमंतराव पवार म्हणाले, आमचे मंडळ पाण्याच्या टाकीखाली गणेशोत्सव साजरे करते. त्यामुळे मुख्याधिकार्यांनी आम्हालाही नोटीस बजावली आहे. हा अधिकारी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अपलाभ घेत आहे. वाहतुकीसाठी प्रत्येक ठिकाणी पर्यायी रस्ते उपलब्ध असतांना त्यांची ही हुकूमशाही कशासाठी ?
३. प्रांत येथे उपविभागीय अधिकारी श्री. किशोर पवार यांच्याशी चर्चा केल्यावर त्यांनी मंडळांची ठिकाणे आणि पर्यायी रस्ते यांची पाहणी करून निर्णय घेणार असल्याचे सांगितले.
४. त्यानंतर मोर्चा मुख्य बाजारपेठमार्गे नगरपालिकेच्या ठिकाणी नेण्यात आला; परंतु नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रांत कार्यालयातच होते. ते तेथे आले नाहीत. त्यांच्या प्रतिनिधीला निवेदन देऊन मोर्च्याची सांगता झाली.
५. या वेळी सर्व मंडळांनी आहे, त्याच ठिकाणी गणेशमूर्ती बसवावी, असे ठरवण्यात आले. या वेळी सर्व पक्ष, विपक्ष यांचे नगरसेवक मंडळांच्याच बाजूने उभी रहातील, असे सांगण्यात आले.
६. मोर्च्यासाठी कराडचे नगरसेवक मंडळांचे कार्यकर्ते, सनातन संस्थेचे साधक, हिंदु धर्मजागृती समितीचे कार्यकर्ते आणि बहुसंख्येने हिंदू धर्माभिमानी उपस्थित होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात