गोरक्षण आणि काश्मीरमधील सैन्याला सर्वाधिकार मिळावेत, या मागण्यांसाठी कळंबोली येथे समस्त राष्ट्रप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे आंदोलन
नवी मुंबई, २२ ऑगस्ट : गोहत्या बंदी कायद्याचा काहीच उपयोग नाही. पोलीस आणि प्रशासन यांच्या संगनमताने आजही गोतस्करी आणि गोहत्या होतात. पोलीस पैसे घेऊन कसायांना निर्दोष सोडतात. गोरक्षकांवर खोटे खटले प्रविष्ट केले जातात. असे कितीतरी खटले आम्ही आज चालवत आहोत. मोदी यांच्या विधानाने गोरक्षकांवर कुर्हाडच कोसळली आहे. आमची २५ अधिवक्त्यांची संघटना गोरक्षकांना सर्व कायदेशीर सहकार्य करत आहे. पुढेही गोरक्षकांनी न भीता हे कार्य चालू ठेवावे. आमचा सर्व अधिवक्त्यांचा त्यांना पूर्ण पाठिंबा असेल, अशी ग्वाही मुंबई उच्च न्यायालयाचे अधिवक्ता राजू गुप्ता यांनी दिली. कळंबोली येथील आंदोलनात उपस्थित हिंदुत्ववाद्यांना मार्गदर्शन करतांना अधिवक्ता राजू गुप्ता बोलत होते.
गोरक्षकांच्या विषयीचे पंतप्रधान मोदी यांनी काढलेले अनुद्गार मागे घेऊन गोमातेची क्षमा मागावी आणि काश्मिर मध्ये सैन्याला सर्वाधिकार देऊन आतंकवादी आणि त्यांच्या समर्थकांवर कडक कारवाई करावी, या मागण्यांसाठी येथे २१ ऑगस्ट या दिवशी राष्ट्रप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीन आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात स्वराज्य मावळा प्रतिष्ठान, श्रीराम मंदिर समिती, हिंदू गोवंश रक्षा समिती, महाराणा प्रताप बटालियन, सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती आदी संघटनांचे १२५ राष्ट्र आणि धर्म प्रेमी सहभागी झाले होते.
आंदोलनात हिंदुत्ववाद्यांनी व्यक्त केलेले विचार गोरक्षक समाजकंटक आहेत, मग गोमांस खाणारे कोण आहेत ? – गुरुनाथ मुंबईकर, स्वराज्य मावळा प्रतिष्ठान
काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट आणा. त्या ठिकाणी पॅलेट नाही, तर बुलेट गन वापरायला हव्यात. हिंदूंनी संघटित होणे आवश्यक आहे. ८० टक्के गोरक्षक समाजकंटक आहेत, असे मोदी यांनी काढलेले अनुद्गार मागे घ्यावेत. गोरक्षक समाजकंटक आहेत, मग गोमांस खाणारे कोण आहेत ?
पंतप्रधानांनी आता शब्द फिरवले ! – महेश पवार, श्रीराम मंदिर समिती
हिंदूंनी मोदींना एकमताने कौल दिला. मोदींनी मात्र आता शब्द फिरवले. त्यामुळे हिंदू दुखावले गेले आहेत. मोदींनी जर गोरक्षकांविषयीचे अनुद्गार मागे घेतले नाहीत, तर हिंदूंना पुढच्या प्रत्येक मतदानात नकाराधिकाराचा उपयोग करावा लागेल.
देशभक्त तुरुंगात आणि देशद्रोही मोकाट, हे काँग्रेसप्रमाणे भाजपचेही धोरण झाले आहे ! – श्री. अजयसिंग सेंगर, महाराणा प्रताप बटालियन
फाळणीच्या वेळी गांधीजींनी अल्पसंख्याकांना थांबवले नसते, तर आज गोहत्या आणि काश्मीरचा प्रश्न राहिला नसता. देशभक्त तुरुंगात आणि देशद्रोही मोकाट हे काँग्रेसप्रमाणे भाजपचेही धोरण झाले आहे. त्यामुळे आता हिंदु राष्ट्राला पर्याय नाही !
देशात काश्मीरप्रमाणे परिस्थिती निर्माण झाल्यावर मोदींना जाग येणार का ? – श्री. मारुति गुरव
हिंदूंनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श ठेवायला हवा. पंतप्रधान नरेंद्र मोदी गांधींचा आदर्श ठेवत आहेत. देशात काश्मीरप्रमाणे परिस्थिती निर्माण झाल्यावर मोदींना जाग येणार का ?
विदेशी पाहुणे देशाला नकोत ! – श्री. पवित्रसिंघ सिंधू, इंटिग्रिटी अँटीकरप्शन
आमच्यासाठी गाय पशू नव्हे, माता आहे. हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांच्या विदेशी पाहुण्यांना तरी लागेल ते गोमांस पुरवावे लागेल, या वक्तव्याचा निषेध करावा तितका थोडाच आहे. असे विदेशी पाहुणे या देशाला नकोत.
आंदोलनाच्या वेळी पंजाबमधील गोरक्षकांच्या अटकेविषयी उपस्थित हिंदुत्ववाद्यांनी भाजप शासनाविषयी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
बीफ बंदीचा कायदा अस्तित्वात नाही, असेच वाटू लागले आहे. मोदींनी हिंदूंच्या धर्मभावना दुखावल्या आहेत. – श्री. संभाजी जावीर, श्रीराम मंदिर समिती
शासनाने गोरक्षकांचे रक्षण करणारे कायदे करावेत ! – श्री. संतोष मोकल, श्रीराम मंदिर समिती
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात