नाशिक, २२ ऑगस्ट : पंतप्रधानांनी गोरक्षकांचे चुकीचे मूल्यमापन केले. संपूर्ण भारतात गोहत्या रोखण्यासाठी स्वत:चे शासन असावे, अशा हेतूने भारतियांनी त्यांना मते दिली; मात्र त्यांनीच गोरक्षकांचा अवमान केला. या माध्यमातून त्यांनी गोपालक असणार्या श्रीकृष्णाचाही एकप्रकारे अवमान केला आहे. त्यांच्या या विधानाचा निषेध करण्यासाठी येथील सर्व हिंदू आणि गोरक्षक राष्ट्रीय हिंदू आंदोलनाच्या माध्यमातून संघटित झाले.
या वेळी पंतप्रधानांनी त्यांचे वक्तव्य मागे घेण्यासमवेतच जम्मू-काश्मीर येथे चालू असलेल्या हिंसाचाराला रोखण्यासाठी सैन्याला सर्वाधिकार द्यावेत, तसेच आतंकवादी अन् त्यांचे समर्थक यांच्या विरोधात कठोर कारवाई करावी, अशा मागण्याही करण्यात आल्या. या आंदोलनात विविध संघटनांचे ३० हून अधिक प्रतिनिधी उपस्थित होते. वरील मागण्यांचे निवेदन उपजिल्हाधिकारी श्री. रामदास खेडकर यांना देण्यात आले.
क्षणचित्र
उपजिल्हाधिकारी श्री. रामदास खेडकर यांनी समितीच्या कार्याची प्रशंसा केली. जिल्हाधिकारी कार्यालयाचे कामकाज बंद आंदोलन असतांनाही ते केवळ निवेदन स्वीकारण्यासाठी कार्यालयात थांबले होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात