मुंबई : रायगड किल्ल्यावरच्या महादरवाज्याच्या उजवीकडील बुरुजांवर असलेल्या मातीत गाडल्या गेलेल्या दोन शिवकालीन तोफांचे संवर्धन करण्यासाठी मुंबईतील मुलांनी मोलाचा हातभार लावला आहे. पाऊस, वारा यांचा मारा सहन करत या तोफांचे अस्तित्व लवकरच दिसेनासे झाले होते. मात्र ‘श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान’च्या मुंबई विभागाने पुढाकार घेऊन या तोफांना पूर्वीचा दिमाख मिळवून दिला.
रायगडावर १७ तोफा आहेत, असे वर्णन विविध पुस्तकांमधून करण्यात आले आहे. शिवचरित्राचा अभ्यास करणारे ‘शिवप्रतिष्ठान’चे मुंबई प्रमुख बळवंत दळवी हे गेली १५ वर्षे रायगडावर जात आहेत. या काळात त्यांनी गडावरच्या १७ तोफा शोधून काढल्या. त्यांनी शिवप्रतिष्ठान संस्थेच्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना या तोफांचे संवर्धन करण्याचे आवाहन केले आणि डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात ३२ तरुणांनी या तोफा मातीतून खेचून बाहेर काढल्या. या तोफा वर काढण्यासाठी या तरुणांजवळ कोणतेही अत्याधुनिक साहित्य नव्हते.
या तोफा सहा फूट लांब आणि एक हजार किलोंच्या आहेत. महादरवाज्याच्या उजवीकडील दुस-या बुरुजावरील तोफ ८० टक्के जमिनीत गाडली गेली होती, तर शेवटच्या बुरुजावरील दुसरी तोफ अतिशय अरूंद ठिकाणी शेवटच्या बुरुजावर होती, अशी माहिती दळवी यांनी दिली.
संदर्भ : महाराष्ट्र टाइम्स