भांडुप येथील हिंदु जनजागृती समितीच्या हिंदूसंघटन मेळाव्यात विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचा सहभाग
भांडुप, २२ ऑगस्ट : देशात आजही मोगलाई चालू आहे. मुघलांचे अत्याचार दूर करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज होते. त्यांच्या पाठीशी त्यांचे गुरु समर्थ रामदासस्वामी होते. शिवरायांच्या मुखात कुलदेवीचे नामस्मरण होते. त्यामुळेच त्यांनी हिंदवी स्वराज स्थापन केले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याप्रमाणे धर्मकर्तव्य म्हणून राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्यासाठी स्वत:चे तन, मन आणि धन अर्पण करायला हवे. संतांच्या आशीर्वादानेच हिंदु राष्ट्राची स्थापना होईल, असा ठाम विश्वास भाजपचे कल्याण शहर उपाध्यक्ष डॉ. उपेंद्र डहाके यांनी व्यक्त केला. २१ ऑगस्ट या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील पराग विद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या हिंदूसंघटन मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी व्यासपिठावर सनातन संस्थेच्या प्रवक्त्या सौ. नयना भगत, हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुमित सागवेकर उपस्थित होते. मेळाव्याला बजरंज दल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, हिंदू राष्ट्रसेना, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, शौर्य प्रतिष्ठान, श्री संप्रदाय आणि योग वेदांत सेवा समिती या संघटना अन् शिवसेना, भाजप या राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांसह १६५ धर्माभिमानी हिंदू उपस्थित होते.
हिंदूसंघटन मेळाव्याचा प्रारंभ शंखनादाने करण्यात आला. मेळाव्याचे सूत्रसंचालन श्री. सुनील कदम यांनी केले. श्री. योगेश शिर्के यांनी हिंदु जनजागृती समितीच्या कार्याची ओळख करून दिली. या वेळी स्वसंरक्षणासाठी प्रशिक्षण किती आवश्यक आहे, हे स्वसंरक्षण प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून दाखवण्यात आले.
हिंदुत्वनिष्ठांच्या गळचेपीचे आधुनिक नाव म्हणजे पुरोगामी ! – सौ. नयना भगत, प्रवक्ता, सनातन संस्था
पुरोगाम्यांनी भारतातील हिंदुत्वनिष्ठांची गळचेपी केली आहे. पुरोगामी सनातन संस्थेवर बंदी आणण्याचा प्रयत्न करत आहे. गळचेपीचे आधुनिक नाव म्हणजे पुरोगामी. हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी प्रत्येक हिंदुने वज्रमूठ आवळली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे हिंदवी स्वराज्य स्थापनेचे कार्य सनातन संस्था करत आहे.
देव, देश आणि धर्म यांच्या रक्षणासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा ! – सुमित सागवेकर, हिंदु जनजागृती समिती
आज प्रत्येक क्षेत्रात लूटमार चालू आहे. पैसे दिल्याविना शासकीय कार्यालयात काम होत नाही. देशात आतंकवाद फोफावत आहे. झाकीर नाईकसारखे देशद्रोही आतंकवादाचे समर्थन करत आहेत. हे लोकशाहीचे राज्य आपल्याला काशी, मथुरा, अयोध्या परत देऊ शकत नाही. देव, देश आणि धर्म यांच्या रक्षणासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा.
या सभेसाठी धर्मभिमानी श्री. बाळकृष्ण बनेशेठ यांनी विनामूल्य सभागृह उपलब्ध करून दिले. अनेक धर्माभिमान्यांनी सभेसाठी आवश्यक साहित्य विनामूल्य उपलब्ध करून धर्मकार्यासाठी सहकार्य केले.
क्षणचित्र – मेळाव्याला विश्व हिंदु परिषदेचे सत्संगप्रमुख श्री. शिवगणेश तिवारी मुलगा आणि २ मुली यांसह उपस्थित होते. स्वसंरक्षणाची प्रात्यक्षिके पाहून त्यांच्या मुलींनी प्रशिक्षणवर्गाची मागणी केली. श्री. तिवारी यांनी पुढील कार्याच्या दृष्टीने आयोजित केलेल्या बैठकीला उपस्थित रहाणार असल्याचे सांगितले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात