विजयवाडा : १२ वर्षांतून एकदा येणारा कृष्णा नदीचा पुष्कर पर्वाला यावर्षी १२ ऑगस्ट या दिवशी आरंभ झाला असून तो २३ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. कृष्णा नदी ज्या ज्या ठिकाणी वहाते, त्या ठिकाणी हे पर्व साजरे केले जाते. या पर्वकाळात कृष्णा नदीमध्ये स्नान करणे पुण्यकारक मानले जाते. हा मेळा आध्रप्रदेशात कृष्णेच्या तिरावर वसलेल्या विजयवाडा येथील पवित्र संगम घाटावर (कृष्णा आणि गोदावरी नदी यांचा संगम) मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. या निमित्ताने सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने या ठिकाणी भव्य ग्रंथ प्रदर्शन आणि विक्रीकेंद्र उभारण्यात आले आहे. या प्रदर्शनाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
क्षणचित्रे
१. या पुष्कर पर्वामध्ये कर्नाटक, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश आणि तेलंगण या राज्यांतील साधक सहभागी झाले आहेत.
२. पुष्कर पर्वात प्रसारासाठी फलक लावतांना स्थानिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला.
३. कामधेनू सिल्कच्या मालकांनी त्यांच्या १० विज्ञापनांच्या फलकांवर पुष्कर स्नानासंबंधीचा सनातनच्या ग्रंथातील मजकूर प्रसिद्ध केला.
४. भाग्यनगरचे अबकारी खात्याचे आयुक्त डॉ. आर्.व्ही. चंद्रवदन् यांनी विजयवाडा येथील बांधकाम विभागाचे मैदान प्रदर्शनासाठी विनामूल्य उपलब्ध करून दिले. त्यांनी सर्व सात्त्विक वस्तूंचे महत्त्व जाणून घेतले, तसेच काही ग्रंथ आणि उत्पादने विकत घेतली.
तेलगु देसम् सरकारची हिंदुविरोधी नीती
१. विविध आध्यात्मिक संघटनांनी ग्रंथप्रदर्शन लावण्यासाठी आंध्रप्रदेश सरकारकडे १ मासापूर्वी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती; मात्र पुष्कर पर्वाला केवळ एक दिवस बाकी असतांना सरकारने १० फूट जागेसाठी १० सहस्र रुपये या दराने जागा उपलब्ध करून देण्याची सिद्धता दर्शवली, तसेच त्यासाठी कुठल्याच सुविधा देण्यास नकार दर्शवला.
२. या पुष्कर पर्वात तेलगु देसम् सरकारने मनोरंजनासाठी लक्षावधी रुपये व्यय करून भव्यदिव्य व्यवस्था केली होती. यासाठी आध्यात्मिक संस्थांकडूनही सहस्रो रुपये देणगी वसूल केली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात