नंदुरबार : शहरातील सर्व गणेशोत्सव मंडळांना एकत्रित करून हिंदु जनजागृती समितीने स्थापन केलेल्या गणेशोत्सव महामंडळाच्या मागण्यांवर चर्चा करून येथील जिल्हाधिकारी डॉ. कलशेट्टी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र डहाळे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत त्या सोडवण्याचे आश्वासन दिले. २१ ऑगस्ट या दिवशी मोठा मारुति मंदिर येथे त्यांनी शहरातील सर्व गणेशोत्सव मंडळांची एकत्रित बैठक घेतली होती. शहरातील विविध मंडळांचे ९५ हून अधिक पदाधिकारी या बैठकीस उपस्थित होते.
हिंदु जनजागृती समिती आणि अन्य मंडळे यांच्याकडून करण्यात आलेल्या मागण्यांवर जिल्हाधिकार्यांनी दिलेली आश्वासने
१. विविध विभागांशी संबंधित अनुमती एक खिडकी योजनेतून उपलब्ध करून देण्यासाठी प्रभावी अंमलबजावणी करू.
२. प्रकाशा येथे थेट पात्रात जाण्याची सोय नसल्याने पुलावरूनच मूर्ती फेकून विसर्जित केली जाते. ही विटंबना थांबवण्यासाठी पुलावर विसर्जनाच्या दिवशी क्रेन देऊ किंवा पात्रात उतरण्यासाठी रस्ता करू.
३. मंडपाजवळील आणि रस्त्यांवरील छेड काढणार्या मुलांचा बंदोबस्त करण्यासाठी दामिनी पथकात उपनिरीक्षक दर्जाचे ४ अधिकारी नेमू. गणेशोत्सव महामंडळामध्ये सहभागी व्यक्ती आणि संघटना हिंदु जनजागृती समितीचे डॉ. नरेंद्र पाटील, जय बजरंग व्यायाम शाळेचे शेखर मराठे, मारुति व्यायामशाळेचे अर्जुन मराठे, भगवती व्यायाम शाळेचे बंटी नेतलेकर, गौरीपुत्र व्यायामशाळेचे प्रेमसिंधी, तसेच मानाचे बाबा गणपति, दादा गणपति आणि काका गणपति यांचे, तसेच रोकडेश्वर व्यायामशाळेचे आणि अन्य मंडळांचे पदाधिकारी
निवेदनात केलेल्या अन्य मागण्या
१. मूर्तीदानामुळे धर्मभावना दुखावतात, तसेच ते धर्मशास्त्रसंमत नाही. तसेच संकलित मूर्ती तुटलेल्या अवस्थेत पडलेल्या दिसतात. त्यामुळे देवतांचा अवमान होतो. याला पायबंद घातला जावा.
२. कृत्रिम तलावात मूर्तीविसर्जन करणे, कचर्याच्या गाडीतून मूर्ती वाहून नेणे, निर्माल्य पालिकेच्या कचर्याच्या गाडीतून वाहून नेणे, हेही धर्मशास्त्राच्या विरोधात असून धर्मभावना दुखावणारे आहे. तेही बंद करावे.
३. विसर्जन मार्गावरील रस्त्यांची कायमस्वरूपी दुरुस्ती व्हावी.
४. विसर्जनाच्या दिवशी किंवा गणेशोत्सवाच्या काळातही पथदिवे बंद असणे किंवा वीज खंडित होणे थांबवले जावे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात