जे हिंदुत्वनिष्ठांच्या निदर्शनास येते, ते शिक्षण विभागाच्या का येत नाही ? याला उत्तरदायी असणार्यांवर शासन काय कारवाई करणार ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात
पुणे, २४ ऑगस्ट : डॉ. दाभोलकर यांच्या हत्येला ३ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने २० ऑगस्ट या दिवशी येथे मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्च्यामध्ये येथील रावसाहेब पटवर्धन शाळेतील २०० विद्यार्थ्यांना संपूर्ण गणवेशासह सहभागी करण्यात आले होते. याच्या निषेधार्थ हिंदुत्वनिष्ठ श्री. गजानन मुंज आणि श्री. प्रवीण नाईक यांनी प्राथमिक अन् माध्यमिक विभागाच्या शिक्षण संचालकांना २३ ऑगस्ट या दिवशी निवेदन दिले. (अंनिसच्या आंदोलनातील चुकीच्या प्रकाराला वैध मार्गाने विरोध करणार्या हिंदुत्ववाद्यांचे अभिनंदन ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
प्राथमिक विभागाचे शिक्षण सहसंचालक एस्.आर्. चव्हाण आणि माध्यमिक शिक्षण विभागाच्या उपसंचालक कार्यालयाचे अधीक्षक वासुदेव भुसे यांनी हे निवेदन स्वीकारले. ‘त्यांनी आम्ही हे निवेदन शिक्षण संचालकांना देतो. या प्रकरणाची चौकशी होईलच’, असे सांगितले. निवेदनात म्हटले आहे की, डॉ. दाभोलकर हत्या प्रकरण न्यायप्रविष्ट आणि संवेदनशील असल्याने विद्यार्थ्यांना सहभागी करणे चुकीचे आहे. त्याचप्रमाणे अंनिसवर आर्थिक घोटाळे आणि नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या गंभीर आरोपांची चौकशी चालू आहे. मुलांना नीतीमत्तेचे धडे देणे आवश्यक आहेत. या प्रकरणातील शाळेचे अधिकारी, शिक्षक आणि कर्मचारी यांची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात