- हज हाऊसमध्ये देशद्रोही कारवाया होत असल्याचे सिद्ध झालेले असतांना नवनवीन हज हाऊसच्या निर्मितीसाठी जागा देणे म्हणजे देशातील आतंकवादी कारवायांना प्रोत्साहन देण्यासारखेच नव्हे का ?
- वारकरी भवनाचा प्रश्न प्रलंबित ठेवणार्या पुणे महानगरपालिकेचा हा पक्षपात म्हणायचा का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात
पुणे, २५ ऑगस्ट : शहरातील कोंढवा खुर्द भागामध्ये हज हाऊस बांधण्यासाठी १ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव काँग्रेसचे अविनाश बागवे यांनी दिला होता. त्यासाठी पदपथाच्या निधीचे वर्गीकरण करून १ कोटी रुपये उपलब्ध करून देण्याचा निर्णय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी आगामी पालिका निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून बहुमताच्या जोरावर स्थायी समितीमध्ये २४ ऑगस्ट या दिवशी घेतला आहे. (हिंदूंनो, अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन करणार्या अशा पक्षांना पालिकेच्या आगामी निवडणुकीत घरी बसवा ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) हज हाऊससाठी पैसे देण्याच्या निर्णयाला शिवसेना आणि भाजप यांनी विरोध केला. तरीही हज हाऊसला संमती देण्यात आली; पण वारकरी भवनाचे काय, असा प्रश्नही या वेळी उपस्थित करण्यात आला.
१. हज हाऊससाठी पैसे देण्यास शिवसेना आणि भाजप यांनी विरोध केल्याने त्यावर मतदान घेण्यात आले. स्थायी समितीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचे बहुमत असल्याने त्याविषयीचा प्रस्ताव संमत झाला, असे स्थायी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब बोडके यांनी सांगितले.
२. या वेळी भाजपच्या नगरसेविका मुक्ता टिळक आणि श्रीकांत जगताप यांनी सांगितले, विकासाचा निधी अशा प्रकारे वळवण्यास आमचा विरोध आहे. शिवसेनेचे गटनेते अशोक हरणावळ यांनी सांगितले, आगामी पालिका निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून मताच्या राजकारणासाठी विशिष्ट वर्गाला खूश करण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी हज हाऊसला संमती दिली आहे.
३. शहरात हज हाऊसच्या प्रस्तावाआधी वारकरी भवन उभारण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता. हज हाऊससाठी कोंढवा खुर्द येथे अॅमिनिटी स्पेसची जागा मिळाली; परंतु संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज यांची पालखी ज्या शहरात प्रतिवर्षी २ दिवस मुक्कामी असते, त्या शहरात वारकरी भवनासाठी जागा मिळत नाही. वारकरी भवनासाठी जागा नसल्याचे कारण पुढे करून काँग्रेस आणि राष्ट्रवादी हात झटकत आहेत, अशी टीका हिंदुत्वनिष्ठांनी केली आहे. (वारकरी भवनसाठी जागाच उपलब्ध नाही म्हणणार्यांना हज हाऊससाठी जागा कशी मिळते ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
वारकरी भवनसाठी २ मासांत जागा देणार ! – महापौर जगताप
हज हाऊसच्या संमतीनंतर महापौर प्रशांत जगताप यांना वारकरी भवन उभारण्याचे काय झाले ? याविषयी पत्रकारांनी विचारले असता मोघम आश्वासन देत ते म्हणाले की, वारकरी भवनसाठी २ मासांत जागा उपलब्ध करून देण्यात येईल.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात