दहीहंडीच्या नावाखाली तरुणाईची हुल्लडबाजी
पुणे, २६ ऑगस्ट : पूर्णावतार भगवान श्रीकृष्णाच्या स्मरणात साजरा करण्यात येणारा आनंददायी उत्सव म्हणजे दहीहंडी उत्सव ! दुर्दैवाने धर्मशिक्षणाच्या अभावामुळे नुकताच साजरा झालेला दहीहंडी उत्सव बहुतांश ठिकाणी विकृत पद्धतीने साजरा करण्यात आला. चौकाचौकात साजर्या झालेल्या उत्सवात तरुणाईची हुल्लडबाजी होती; पण श्रीकृष्णाप्रतीचा भाव नव्हता, नाच होता; पण त्यामध्ये आनंद नव्हे, तर बीभत्सपणा होता, तरुणांमध्ये उत्साह होता; मात्र भक्तीभावाचा अभाव होता. जवळपास सर्वच ठिकाणी अशी चित्रपटगीतांच्या तालावर थिरकत मानवी मनोरे रचत दहीहंडी फोडण्यात आली. (अशा प्रकारे सण साजरे करणे म्हणजे दहीहंडीच्या नावाखाली मनोरंजनाची, तसेच विकृत हौस भागवून घेणेच होय. सण धर्मशास्त्रीय दृष्टीकोनातून साजरे झाले, तरच त्यांचा आध्यात्मिक स्तरावर लाभ होतो. अशा विकृतीमुळे आध्यात्मिक लाभ तर होतच नाही; पण अयोग्य कृती करणारे आणि त्याला मूकसंमती देणारे मात्र पापाचे धनी होतात. असे होऊ नये, यासाठी समाजाला धर्मशिक्षण मिळणे आवश्यक आहे. – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
१. पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून दहीहंडी उत्सवाच्या ४ दिवस आधीपासूनच चौकाचौकात मंडळांच्या कार्यकर्त्यांची चमकोगिरीची हौस भागवण्यासाठी फलक लावण्यात आले होते.
२. अनेक ठिकाणी मुख्य चौकातच दहीहंडी लावण्यात आली असल्याने सायंकाळनंतर शहराच्या बहुतांश भागात वाहतूककोंडी झाली होती.
३. न्यायालयाच्या आदेशाला झुगारून अनेक ठिकाणी २० फुटांहून अधिक उंचीवर दहीहंडी बांधण्यात आली होती.
४. भपकेबाज विद्युत रोषणाई, ध्वनीवर्धकांच्या भिंती उभारून दणदणाटात लावण्यात आलेली चित्रपटगीते, त्यावर थिरकणारी तरुण मुले, फटाक्यांची आतषबाजी, दहीहंडी फोडणार्यांसाठी लक्षावधी रुपयांची बक्षिसे, अनेक ठिकाणी चित्रपट कलावंतांची उपस्थिती, चित्रपट कलावंतांना पहाण्यासाठी आबालवृद्धांनी केलेली गर्दी आणि त्याचा पोलिसांवर पडलेला ताण असेच दृष्य सर्वत्र पहायला मिळाले. चित्रपट कलावंतांना पहाण्यासाठी प्रेक्षकांनी हाणामारी करण्याची घटनाही भोसरी येथे घडली. अनेक ठिकाणी महिला दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते.
५. महाविद्यालयांमध्ये साजर्या करण्यात आलेल्या दहीहंडी उत्सवातही विद्यार्थ्यांनी चित्रपटगीतांवर नाचत दहीहंडी फोडली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात