एथेन्स (ग्रीस) : ५० वर्षांपूर्वी ग्रीस राजघराण्यातील सदस्यांनी कांची परमाचार्य प.पू. चंद्रशेखरेंद्र सरस्वती स्वामीगल यांची मचिलीपट्टणम् येथे भेट घेतली होती. हे कुटुंब ईश्वराच्या शोधार्थ साधक बनून येथे आले होते. त्यांचा आध्यात्मिक प्रवास उच्च कोटीचा होता. तेव्हापासून प्रतिवर्षी हे कुटुंब कांची मठामध्ये आयोजित केल्या जाणार्या कार्यक्रमात सहभागी होत आहे.
लाल तपकिरी रंगाची साडी नेसलेल्या आणि कपाळावर कुंकू लावलेल्या राजकन्या आयरीन मागील आठवणींना उजाळा देतांना म्हणाल्या, ५० वर्षांपूर्वी मचिलीपट्टणम् येथे आम्ही परमाचार्यांची भेट घेतली होती. आंध्रप्रदेशला परत भेट देण्यास मला खूप आनंद होतो. भारतीय तत्त्वज्ञानी टीएम्पी महादेवन् यांच्यामुळे आम्हाला भारतीय तत्त्वज्ञानाचे श्रेष्ठत्व कळले. गेल्या ५० वर्षांपासून आमचे कुटुंब तत्त्वज्ञानावर परिषदा आणि बैठका यांचे आयोजन करत आहे. वेद आणि भारतीय तत्त्वज्ञानच जगाला शांतीचा मार्ग दाखवू शकते. वेद हे ज्ञानाचे खूप मोठे स्रोत आहेत. वेद हे प्रत्येकासाठी आहेत. वैदिक जीवनाचा अवलंब केल्यास जागतिक शांती प्रस्थापित होऊ शकते.
पू. विजयेंद्र सरस्वती स्वामिगल यांनी सांगितले की, वेद म्हणजे प्रत्येक धर्माचे सार आहे. प्रत्येक नागरिकाने गोरक्षण केले पाहिजे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात