पुणे, २९ ऑगस्ट : धार्मिक क्षेत्राशी निगडित प्रश्नांसंबंधी सरकारी अधिकारी काही निर्णय घेऊन ते सर्वसामान्यांवर लादतात. सरकारी अधिकारी हे काही धर्मशास्त्राचे अभ्यासक नाहीत. परत परत फतवे काढून शासकीय आणि प्रशासकीय स्तरावर धर्मशास्त्राची पायमल्ली केली जाते. हिंदूंच्या सहिष्णुतेचा अपलाभ घेत हिंदूंच्या धार्मिक भावनांची खिल्ली उडवली जाते. धार्मिक सणांंसंबंधी निर्माण होणार्या प्रश्नांविषयी विचारविनिमय करण्यासाठी सरकारने धर्माचा अभ्यास आणि ज्ञान असलेल्या अधिकारी व्यक्तींची समिती नेमून योग्य ते निर्णय घ्यावेत. हिंदूंच्या धार्मिक श्रद्धा दुखावत राहिल्यास हिंदू ते सहन करणार नाहीत, अशी चेतावणी समर्थभक्त पू. सुनील चिंचोलकर यांनी दिली. २९ ऑगस्ट या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील पत्रकार भवनात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
पुणे महानगरपालिका, तसेच अन्य तथाकथित पर्यावरणवादी आणि पुरो(अधो)गामी यांच्या वतीने भाविकांना धर्माचरणापासून परावृत्त करत कृत्रिम हौदात श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करण्याची सक्ती केली जाते. यंदाच्या वर्षी तर कृत्रिम हौद, मूर्तीदान या धर्मशास्त्रविरोधी उपक्रमांमध्ये अमोनियम बायकार्बोनेट वापरून श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करण्याच्या प्रकाराची भर पडली आहे. या पर्यायाचा महानगरपालिकेकडून मोठ्या प्रमाणावर प्रचार चालू आहे. त्या पार्श्वभूमीवर या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले, सनातन संस्थेचे श्री. चंद्रशेखर तांदळे, तसेच पर्यावरण अभियंता श्री. विकास भिसे उपस्थित होते.
‘गणेशोत्सवाच्या काळात दुबई, अबूधाबी, शारजा आदी मुसलमानबहुल देशांमध्ये जाणे होते, तेव्हा तेथेदेखील गणेशोत्सव शास्त्रसंमत पद्धतीने साजरा होत असल्याचे दिसून येते. मग भारतात त्यासंबंधी एवढा वैचारिक गोंधळ का ?’, असा प्रश्नही पू. चिंचोलकर यांनी या वेळी उपस्थित केला.
श्री. चंद्रशेखर तांदळे यांनी धर्मशास्त्राला अनुसरून शाडूच्या श्री गणेशमूर्तीचे पूजन करण्याचे, तसेच मूर्तीचे वहात्या पाण्यात विसर्जन करण्याचे आवाहन केले.
अशास्त्रीय मूर्तीविसर्जनाचा निर्णय मागे न घेतल्यास तीव्र आंदोलन करणार ! – पराग गोखले
महापौर, आयुक्त यांनी त्यागपत्र द्यावे !
१. वर्षभर शहरातील घाण नदी-नाल्यांत सोडून प्रदूषण करणार्या महानगरपालिका गणेशोत्सव आल्यावर मात्र प्रदूषणाविषयी सक्रिय होतात आणि त्यांच्यासह झोपलेले नव-पर्यावरणवादीही बिळातून बाहेर पडू लागतात.
२. ‘गणेशोत्सव म्हणजे प्रदूषण’ असे विचित्र समीकरण मांडून कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक हितसंबंधांतून कृत्रिम हौद बांधण्याचे नाटक केले जात आहे. या हौदांत श्री गणेशमूर्तींच्या विसर्जनाचे आवाहन केले जाते. प्रत्यक्षात तेथे विसर्जित केलेल्या मूर्ती काढून महापालिका त्या कचर्याच्या गाडीतून नेऊन श्री गणेशमूर्तींची विटंबना करून त्या पुन्हा नदीच्या पात्रातच टाकत असल्याचे पुण्यातील प्रसिद्धीमाध्यमांनी चित्रासह उघड केले आहे. हिंदूंच्या धार्मिक भावना दुखवण्यासाठीच प्रदूषणाच्या नावाखाली जनतेला लुटण्याचे आणि हिंदु धर्माला अपकीर्त करण्याचे कारस्थान रचले जात आहे. हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारे महापौर आणि आयुक्त यांना खरेतर श्री गणेशमूर्ती विसर्जनाच्या संदर्भात निर्णय घेण्याचा नैतिक अधिकार नाही. त्यांनी हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी त्यागपत्र द्यायला हवे.
३. यंदा तर पुणे महापालिकेने घरच्या घरी बालदीत मूर्ती विरघळवण्यासाठी अमोनियम बायकार्बोनेट पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेने असले नवीन प्रयोग करण्यापेक्षा धर्मशास्त्रानुसार मातीची मूर्ती बनवण्याच्या दृष्टीने निर्णय घेतल्यास आणि अनुदान दिल्यास दोन्ही उद्देश साध्य होतील; मात्र अशास्त्रीय निर्णय घेऊन गणेशभक्तांना धर्मपालनापासून परावृत्त करण्याचाच प्रयत्न केला जात आहे.
४. अमोनियम बायकार्बोनेटचा वापर करून श्री गणेशमूर्ती विसर्जन करण्यास सांगणार्या पुणे महापालिकेने उद्या ‘मृतदेहावर अग्निसंस्कार केल्याने वायूप्रदूषण होते’, असे म्हणत ‘मृतदेहही रसायनामध्ये विसर्जित करा’, असा निर्णय घेतल्यास नवल वाटायला नको.
५. माहितीच्या अधिकारात मिळवलेल्या माहितीनुसार पुण्यात प्रतिदिन १७ कोटी ७० लक्ष लिटर सांडपाणी कोणत्याही प्रक्रियेविना नद्यांमध्ये सोडले जाते. राज्यातील २५ मोठ्या शहरांत २ अब्ज ५७ कोटी १७ लक्ष लिटर सांडपाणी हे प्रतिदिन कोणत्याही प्रक्रियेविना नदीमध्ये सोडले जाते. दूषित पाण्यामुळे ८० टक्के साथीचे आजार पसरतात, तसेच १२ लक्ष लोक आजारी पडतात, हे वास्तव आहे. हे प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेने काय प्रयत्न केले ?
६. यंदा मोठ्या प्रमाणात पाऊस पडून सर्व धरणे भरली आहेत, असे असतांना मूर्तीविसर्जनाला आडकाठी का ? कोट्यवधी रुपये अमोनियम बायकार्बोनेट आणि कृत्रिम हौद यांसाठी खर्च करण्यापेक्षा पालिकेने एवढे रुपये शाडू मातीची श्री गणेशमूर्ती बनवण्यासाठी मूर्तीकारांना अनुदान द्यावे.
७. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही नुकतेच ‘मन की बात’मध्ये ‘पीओपी’च्या जागी मातीची मूर्ती बनवण्याविषयी संदेश दिला आहे. त्यामुळे पालिका प्रशासन पंतप्रधानांच्या या आवाहनाला प्रतिसाद देईल, अशी अपेक्षा आहे; मात्र पालिकेने जर हा धर्मभावना दुखवणारा अशास्त्रीय निर्णय पालटला नाही, तर हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या तीव्र आंदोलनाला सामोरे जावे लागेल.
८. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आदर्श गणेशोत्सव मोहीम राबवण्यात येत असून त्यात सहभागी होऊ इच्छिणार्यांनी ८९८३३३५५१७ या क्रमांकावर संपर्क साधावा.
श्री गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी अमोनियम बायकार्बोनेटच्या अशास्त्रीय वापरासंबंधी श्री. भिसे यांच्याकडून पोलखोल
अमोनियम बायकार्बोनेटचा वापर घातक ! – विकास भिसे
१. शाडूमातीच्या श्री गणेशमूर्तींमुळे कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होत नाही. एवढेच नाही, तर प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्तींमुळेही कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होत नाही.
२. प्लास्टर ऑफ पॅरिस हे जिप्सम या घटकापासून बनलेले असते. जिप्सम भाजून त्यातील पाणी अल्प केले असता प्लास्टर ऑफ पॅरिस बनते. मूर्तीविसर्जन केल्यानंतर प्लास्टर ऑफ पॅरिसचे पुन्हा जिप्सममध्ये रूपांतर होते. जिप्सम हा एक भूसुधारक घटक मानला गेला आहे.
३. अमोनियम बायकार्बोनेटच्या द्रव्यामध्ये श्री गणेशमूर्तीचे विसर्जन केल्यास अमोनियम सल्फेट आणि सोडियम बायकार्बोनेट सिद्ध होतात. त्यांपैकी अमोनियम सल्फेट हे जरी एक खत असले, तरी भारतातील भूमी अल्कलाईन प्रकारची असल्याने तेथे हे वापरण्यास योग्य तर नाहीच, शिवाय प्रदूषणकारीही आहे.
४. प्रतिदिन सांडपाण्याच्या माध्यमातून होणार्या जलप्रदूषणाच्या तुलनेत श्री गणेशमूर्तींच्या विसर्जनामुळे होणारे प्रदूषण ०.०१ टक्कासुद्धा नाही.
५. ‘अमोनियम बायकार्बोनेट’ हा ‘खायचा सोडा’ असल्याचे वक्तव्य महापौरांनी केले होते, ते अर्धसत्य आहे. गेल्या काही दशकांपासून हे रसायन कालबाह्य झाले असून सध्या खाद्यपदार्थांमध्ये अमोनियम बायकार्बोनेट नाही, तर बेकिंग पावडर वापरतात.
६. महानगरपालिकेच्या वतीने देण्यात येणारे अमोनियम बायकार्बोनेट हे ‘इंडस्ट्रियल ग्रेड’ (आस्थापन दर्जाचे) असून ते घातक आहे. याशिवाय अमोनियम बायकार्बोनेट पाण्यात मिसळल्यानंतर जो द्रवपदार्थ निर्माण होतो तो एकत्रित कसा करणार, त्याची वाहतूक कशी करणार, असे प्रश्नच आहेत.
७. पर्यावरणपूरक म्हणून श्री गणेशमूर्ती बनवण्यासाठी कागदाचा वापर करणे, हे तर सर्वाधिक पर्यावरणविरोधी आहे. कागदाच्या श्री गणेशमूर्तींमुळे सर्वाधिक प्रदूषण होते.
८. त्यामुळे श्री गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी एवढा द्राविडीप्राणायाम करण्यापेक्षा पालिका प्रशासनाने अन्य धर्मशास्त्रीय मार्गांचा विचार करावा.
पुणे महानगरपालिकेच्या इमारतीसमोर हिंदुत्वनिष्ठांचे उद्या निषेध आंदोलन
श्री गणेशोत्सवाच्या काळात हिंदूंच्या धर्मशास्त्राशी सुसंगत नसलेले निर्णय घेऊन हिंदूंच्या धर्मभावना दुखवणार्या पुणे महानगरपालिकेच्या निषेधार्थ हिंदुत्वनिष्ठांच्या वतीने ३१ ऑगस्ट या दिवशी दुपारी ३ ते ५ या वेळेत महानगरपालिकेच्या इमारतीसमोर निषेध आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात अधिकाधिक हिंदूंनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात