पंढरपूर येथे हिंदु जनजागृती समितीचे पत्रकार परिषदेत आवाहन !
पंढरपूर, ३० ऑगस्ट : नास्तिकवाद्यांच्या भूलथापांना बळी न पडता भाविकांनी धर्मशास्त्रानुसार वहात्या पाण्यातच विसर्जन करावे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे पश्चिम महाराष्ट्र समन्वयक श्री. मनोज खाडये यांनी ३० ऑगस्ट या दिवशी येथील सावरकर वाचनालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत केले. या पत्रकार परिषदेला सोलापूर जिल्हा समन्वयक श्री. राजन बुणगे, हिंदु विधीज्ञ परिषदेचे सदस्य अधिवक्ता श्री. नीलेश सांगोलकर आणि अधिवक्ता श्री. संदीप अपसिंगेकर उपस्थित होते.
या वेळी श्री. खाडये म्हणाले . . .
१. हिंदूंचे धार्मिक उत्सव हे पर्यावरणपूरकच आहेत. वहात्या पाण्यात श्री गणेशमूर्तीचे विसर्जन करावे, असे पूजासमुच्चय या ग्रंथात म्हटले आहे. त्यामुळे श्रीगणेशमूर्तीमुळे प्रदूषण होण्याचा प्रश्नच येत नाही. याविषयी गेली १५ वर्षे हिंदु जनजागृती समिती समविचारी संघटनांसह प्रबोधन करत आहे. मात्र अनेक ठिकाणी कृत्रिम हौदात मूर्तीविसर्जन करण्याच्या धर्मविरोधी भूमिकेस प्रशासनकडूनही पाठबळ मिळते. पंढरपुरातही मूर्तीचे नदीत विसर्जन न करता कृत्रिम खड्ड्यात विसर्जन करण्यासाठी आवाहन करण्यात येते. त्या पद्धतीचे नदीपात्रात खड्डे बनवले जातात. यास हिंदु जनजागृती समितीचा तीव्र विरोध आहे.
२. काही ठिकाणी प्रत्यक्षात तेथे विसर्जित केलेल्या मूर्ती काढून नगरपालिका त्या कचर्याच्या गाडीतून नेऊन श्री गणेशमूर्तींची विटंबना करून त्या पुन्हा नदीच्या पात्रातच टाकत असल्याचे प्रसिद्धीमाध्यमांनी चित्रासह उघड केले आहे. मग हे प्रदूषणाच्या नावाखाली जनतेला लुटण्याचे आणि हिंदु धर्माची अपकीर्ती करण्याचे कारस्थान का ?
३. पंढरपुरात शहरातून गटार आणि नाले यांद्वारे सांडपाणी नदीत मिसळत आहे. याविषयी अनेक वेळा वृत्तपत्रांतून पत्रकारांनी आवाज उठवला आहे. मुख्याधिकारी म्हणतात, ‘शासनाकडून निधी आल्यानंतर भुयारी गटारांद्वारे शहरातील सांडपाण्याची विल्हेवाट लावली जाईल’; मात्र अजूनही गटाराचे पाणी नदीत मिसळत आहे.
४. शहरातील मांसविक्री करणार्या दुकानांतून बाहेर पडणारे रक्तमिश्रीत सांडपाणी नदीत मिसळत आहे. न्यायालयाचा आदेश असूनही आजतागायत नदीमध्ये जनावरे धुणे, वाहने धुणे हे प्रकार चालू आहेत. याविषयी कोणतीही कारवाई झालेली नाही.
५. पंढरपुरात प्रतीदिन सहस्रो लिटर सांडपाणी कोणत्याही प्रक्रियेविना नदीच्या पात्रात एक खड्डा करून त्यात सोडले जात आहे. हे प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेने काय प्रयत्न केले ? यंदा नदीमध्ये मुबलक प्रमाणात पाणी असतांना मूर्तीविसर्जनासाठी आडकाठी का ?
६. गुजरात शासनाने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीवर आणलेली बंदी उठवली आहे.
या वेळी अधिवक्ता श्री. नीलेश सांगोलकर म्हणाले की, न्यायालयाने उत्सवात होणार्या प्रदूषणाविषयी प्रबोधन करण्यास सुचवले आहे. असे असतांना न्यायालयाचा आदेश सांगून मंडळांवर दबाव टाकणे अयोग्य आहे. आम्ही ते होऊ देणार नाही. अधिवक्ता श्री. संदीप अपसिंगेकर म्हणाले की, मागील वर्षी गणेश विसर्जनाविषयी माहितीच्या अधिकारात प्रशासनाला काही प्रश्न विचारले होते. या प्रश्नांनाही प्रशासनाने दिशाभूल करणारी उत्तरे दिली.
मूर्तींची विटंबना करणार्यांवर गुन्हे प्रविष्ट करण्याची मागणी !
मूर्तीदान, तसेच कृत्रीम तलावात मूर्तींचे विसर्जन करण्यास सांगून पुढे त्या मूर्ती कचरा म्हणून टाकून दिल्या जातात आणि गणेशभक्तांचा विश्वासघात केला जातो. मूर्तींची अशा प्रकारे विटंबना करणार्यांवर गुन्हे प्रविष्ट करण्याची मागणी केली जाणार आहे, असे या वेळी श्री. खाडये यांनी सांगितले.
क्षणचित्रे
१. याठिकाणी ठेवण्यात आलेल्या सात्त्विक गणेशमूर्तींना पत्रकारांनी चांगला प्रतिसाद दिला.
२. एका पत्रकाराने सात्त्विक गणेशमूर्तीची मागणी केली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात