-
हिंदूंनो, या यशासाठी कृतज्ञता व्यक्त करा !
-
राष्ट्रभक्त हिंदूंच्या संघटित शक्तीचे यश !
पुणे : चित्रपट, मालिका, तसेच विज्ञापने आदींच्या माध्यमातून मनोरंजनाच्या नावाखाली हिंदूंच्या देवता, राष्ट्रपुरुष यांचे विडंबन करण्याचे प्रकार घडत असतात. झी वाहिनीवरील कॉमेडी शो या कार्यक्रमातही अटकेपार झेंडे फडकवणारे बाजीराव पेशवे यांचे विडंबन करण्यात आले होते. त्यासंदर्भात ब्राह्मण जागृती सेवा संघ, तसेच अन्य राष्ट्रप्रेमी नागरिक यांनी संघटितरित्या निषेध नोंदवला. परिणामस्वरूप झी वाहिनीला सदर आक्षेपार्ह भाग कॉमेडी शोच्या पुनर्प्रक्षेपणातून वगळणे भाग पडले.
अपराजित योद्धे बाजीराव पेशवे यांची कॉमेडी शोमध्ये अपकीर्ती झाल्याचे लक्षात येताच ब्राह्मण जागृती सेवा संघाच्या वतीने झी वाहिनीला निषेधपत्रे पाठवण्यात आली होती, तसेच सामाजिक संकेतस्थळांवरही राष्ट्रभक्त नागरिकांकडून निषेध चळवळ राबवण्यात येत होती. (राष्ट्रपुरुषांच्या अवमानाच्या विरोधात कृतीशील झालेले ब्राह्मण जागृती सेवा संघ आणि अन्य राष्ट्रप्रेमी नागरिक यांचे अभिनंदन ! अशा प्रकारे हिंदूंचे अभेद्य संघटन उभे राहिले, तर राष्ट्रभक्तांच्या श्रद्धास्थानांवर आघात करण्याची कुणाचे धैर्य होणार नाही ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
या संदर्भात ब्राह्मण जागृती सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष श्री. अंकित काणे म्हणाले, कोणत्याही राष्ट्रपुरुषांचे विडंबन होणे निषेधार्हच आहे. बाजीराव पेशवे यांच्या विडंबनाच्या विरोधात कृतीशील निषेध नोंदवल्यानेच हे यश मिळाले. इथून पुढेही महापुरुषांचे विडंबन झाल्यास त्याला अशा प्रकारे विरोध करण्यात येईल.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात