-
शारदीय नवरात्रोत्सवात धार्मिक रूढी आणि परंपरांत प्रशासन यांची ढवळाढवळ नको !
-
देऊळ संस्थानचे अध्यक्ष यांचीही सीआयडी चौकशी करा !
तुळजापूर (जिल्हा धाराशिव) : श्री तुळजाभवानी देवस्थान संरक्षक कृती समितीच्या वतीने शारदीय नवरात्रोत्सवाच्या काळात श्री तुळजाभवानी देऊळ संस्थानने धार्मिक विधी आणि परंपरा यांत ढवळाढवळ न करता व्यवस्था करावी आणि देऊळ संस्थानच्या अध्यक्षांना गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) चौकशीतून न वगळता त्यांच्यासह चौकशी करावी, याविषयीचे निवेदन तहसीलदारांच्या अनुपस्थित श्री. सी.एस्. सुरवसे यांना देण्यात आले, तसेच तहसीलदार अनुपस्थित असल्याने कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी रिकाम्या खुर्चीला हार घालून हे निवेदन दिले.
शारदीय नवरात्रोत्सवाच्या काळात सुरक्षतेच्या नावाखाली सहस्रो वर्षांची परंपरा मोडीत काढून धार्मिक रूढी आणि परंपरा यांना छेद दिल्यामुळे संपूर्ण हिंदुस्थानातून येणारे देवीभक्त कुलधर्म आणि कुलाचार करण्यापासून वंचित रहात आहेत.
श्री तुळजाभवानी देऊळ संस्थान व्यवस्थापनासाठी नेमलेले अध्यक्ष हे शासकीय पदसिद्ध जिल्हाधिकारी आहेत, ते धार्मिक रुढी परंपरेला छेद देऊन मंदिरामध्ये मनमानी कारभार करीत आहेत, तसेच त्यांनी देवळामधील दानपेटी तसेच इतर माध्यमातून येणारी देणगी, सोने, हिरे, माणिक यांची अफरातफर केलेली आहे. याविषयीची चौकशी गुन्हे अन्वेषण विभागाच्या वतीने चालू आहे. या चौकशीमधून देऊळ व्यवस्थापनाच्या अध्यक्षांना सीआयडीने वगळले आहे. अध्यक्ष हेच प्रमुख असल्याने यांच्यासह चौकशी होणे आवश्यक आहे, असे या प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. निवेदन देतांना पू. महंत मावजीनाथ महाराज, श्री. अर्जुन साळुंके, श्री. संजय सोनवणे, श्री. सुहास साळुंके, श्री. किशोर गंगणे, श्री. अमित कदम यांसह २० धर्माभिमानी उपस्थित होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात