नंदुरबार येथे पोलिसांसाठी सदनिका बांधणार्या कंत्राटदाराकडून दंडवसुली करण्यात झालेला घोटाळा
मुंबई : नंदुरबार येथे पोलिसांसाठी सदनिका बांधणार्या कंत्राटदाराकडून दंड वसुलीत भ्रष्टाचार झाल्याने हिंदु विधीज्ञ परिषदेने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली आहे. महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळ मर्यादितचे तत्कालीन महाव्यवस्थापक टी.सी. भाल आणि व्यवस्थापकीय संचालक संजीव दयाळ यांनी कमी वसुली करून महामंडळाची आर्थिक हानी तर केलीच आहे; परंतु या प्रकरणी विधानमंडळाला खोटी माहिती देऊन विधान मंडळाची दिशाभूल केली आहे. या प्रकरणी हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी मुख्यमंत्री, पोलीस महासंचालक आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांना पत्र पाठवून या भ्रष्टाचाराची चौकशी करून संबंधितांवर गुन्हे नोंदवण्याची मागणी केली आहे. तसेच गृहनिर्माण विभागाच्या अधिकार्यांनी या गैरव्यवहारात खाल्लेला पैसा कुठे लपवला आहे, याचा शोध घेणे आवश्यक असल्याचेही हिंदु विधीज्ञ परिषदेने आपल्या पत्रात म्हटले आहे.
परिषदेने केलेल्या तक्रारीनुसार, पोलिसांना निवासासाठी महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळ मर्यादित घरे बांधते. नंदुरबार येथे पोलिसांना रहाण्यासाठी १६८ निवासस्थाने बांधण्यात येणार होती. त्या बांधकामाचे कंत्राट मे. साईनाथ एंटरप्राइजेस या कंत्राटदाराला देण्यात आले. या एकूण प्रकरणात गलथानपणा झाल्याने महामंडळाची पर्यायाने पोलिसांची हानी झाल्याचे ताशेरे भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक यांनी महाराष्ट्र शासनाच्या वर्ष २००७-०८ च्या हिशेबावरील आपल्या (वाणिज्यिक) अहवालात ओढले होते.
अहवालानुसार, या प्रकरणाची चौकशी विधीमंडळाच्या सार्वजनिक उपक्रम समितीने केली. या समितीनेही महामंडळाच्या कारभारावर ताशेरे ओढले; परंतु या सार्वजनिक उपक्रम समितीसमोर दिलेल्या साक्षीत महामंडळाचे महाव्यवस्थापक भाल आणि व्यवस्थापकीय संचालक संजीव दयाळ यांनी दिलेल्या साक्षीत नंदुरबार येथील बांधकामातील कंत्राटदाराकडून ३ कोटी ७८ लाख रुपयांची वसुली करण्यासाठी न्यायालयात दावा दाखल करण्यात आल्याचे म्हटले होते. प्रत्यक्षात मात्र न्यायालयीन दाव्यातील रक्कम ३ कोटी ६१ लाख ६४ सहत्र ८१५ रुपये इतकीच आहे. मग १७ लाख रुपये गेले कुठे, असा प्रश्न पडतो. हा प्रकार म्हणजे हेतुपुरस्सर खोटी माहिती देऊन घोटाळा लपवणे आहे. शिवाय नंदुरबार आणि रत्नागिरी येथील पोलिसांची घरे बांधल्याच्या प्रकरणी अंदाजे पावणेआठ कोटी रुपयांहून अधिक रक्कम मे. साईनाथ एंटरप्राइजेस यांच्याकडून वसूल करण्याबाबत संबंधित न्यायालयांतून एकतर्फी आदेश घेऊनही ही वसूली अजूनपर्यंत करण्यात आलेली नाही. हा महामंडळाला, पर्यायाने सामान्य पोलिसांना झालेला तोटा आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात