- धर्मशिक्षणाच्या अभावी हिंदूंची झालेली दुरवस्था !
- अधिवक्ता कमलेशचंद्र त्रिपाठी यांचे अंत्यसंस्काराचा व्यापार करणार्यांच्या विरोधात जिल्हाधिकार्यांकडे निवेदन
- एका दाह संस्कारासाठी १५ ते २० सहस्र रुपये
- लिलावासाठी सकाळपासून रचण्यात येते चिता
पैशांच्या लोभापाई अंत्यसंस्काराच्या वेळी आपल्याच धर्मबांधवांची अडवणूक करणार्या हिंदूंमुळेच हिंदूंचा त्यांच्या धर्मावरील विश्वास
डळमळीत होतो ! धर्मापासून दूर नेणार्या अशा व्यावसायिक हिंदूंवर कठोर कारवाई केली पाहिजे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
वाराणसी : पौराणिक मान्यता आणि श्रद्धा यांमुळे येथील मणिकर्णिका घाटावर जवळच्या नातेवाइकांचे अंत्यसंस्कार करण्यासाठी येणार्या दु:खी आणि शोकग्रस्त नातेवाइकांकडून दाह संस्कारासाठी अव्वाच्या सव्वा रक्कम उकळणारे समाजकंटक आणि लाकूड व्यापारी यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी येथील अधिवक्ता कमलेशचंद्र त्रिपाठी यांनी जिल्हाधिकार्यांकडे एका निवेदनाद्वारे केली.
एका मृतदेहाचे दहन करण्यासाठी १५ ते २० सहस्र रुपयांची मागणी
पुरामुळे येथील घाट पाण्यात खाली बुडाले आहेत. त्यामुळे येथील मणिकर्णिका घाटावरील महास्मशानावर या दिवसांमध्ये दाह संस्कारासाठी जागा अल्प पडत आहे. याचा काही लोकांकडून अपलाभ उठवला जात आहे. सध्या सिंधिया घाट, रत्नेश्वर मंदिराच्या समोरिल जागा आणि स्मशानेश्वर महादेवाच्या छतावरील जागेवर ३-४ चिता जाळण्यात येतात. या छताचा लिलाव लाकडांचा व्यवसाय करणार्यांकडून करण्यात येत आहे.
स्मशानेश्वर महादेवाच्या छतावर एका मृतदेहाचे दहन करण्यासाठी १५ ते २० सहस्र रुपये घेण्यात येत आहेत. ज्यांच्याकडे पैसे आहेत, ते त्यांच्या मृतदेहाचा अंत्यसंस्कार करून लवकर निघून जातात; मात्र ज्यांच्याकडे पैशाची कमतरता आहे, त्यांना अनेक घंटे ताटकळत थांबून रहावे लागत आहे.
लोकांना खोट्या अडचणी सांगून त्यांच्याकडून पैसे उकळणारे दलाल !
सकाळीच घाटावर २-३ चिता उभारण्यात येतात. त्याविषयी विचारल्यावर अति महत्त्वाच्या व्यक्तीच्या मृतदेहाचे दहन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते. याविषयी सत्य परिस्थिती ही की, काही दलाल असून ते धनिक लोकांना हेरतात. त्यांना अंत्यसंस्काराच्या ठिकाणी असलेल्या अडचणींविषयी भीती दाखवतात. त्यानंतर आधीच रचलेल्या चिता त्यांना विकून टाकतात. या बदल्यात त्यांना पैसे मिळतात.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात