मुंबई : गोव्यात मातृभाषेच्या रक्षणाची चळवळ सुभाष वेलिंगकर यांनी उभी केली. मातृभाषेला संरक्षण दिल्याशिवाय मातृभूमीला कवचकुंडले लाभणार नाहीत, या प्रखर राष्ट्रीय विचाराने सुभाष वेलिंगकर आणि त्यांचे सहकारी मैदानात उतरले. पाद्य्रांच्या इंग्रजी माध्यमांच्या शाळांना अनुदान न देता सरकारने मराठी, तसेच कोकणी भाषेच्या शाळांना पाठबळ द्यावे, ही भूमिका घेऊन वेलिंगकर बेडरपणे लढत राहिले. यात त्यांनी कोणते बेकायदेशीर काम केले ? सुभाष वेलिंगकरांचा गुन्हा काय ?, असा प्रश्न शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या अग्रलेखात विचारण्यात आला आहे.
यात पुढे म्हटले आहे की,
१. गोव्यातील सरकारात भ्रष्टाचार आणि व्यभिचाराची बजबजपुरी माजली आहे. सौदेबाजी आणि भंपकपणास प्रतिष्ठा मिळाली आहे. रशियन, नायजेरियन गुंडांमुळे महिलांचे आणि मंदिरांचे पावित्र्य धोक्यात आले आहे. पुन्हा ज्या राजकर्त्यांच्या ढिलाईमुळे गोव्यात हा अनाचार वाढला त्यांच्या केसालाही धक्का न लावता मातृभूमी आणि मातृभाषा यांच्या रक्षणासाठी लढणार्या सेनापतीलाच काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावली गेली. प्रश्न फक्त वेलिंगकर यांचा नसून यामुळे गोव्यातील पाद्य्रांचा काळ सोकावेल हीच भीती वाटते.
२. गोव्यातील अनेक समुद्रकिनारे आणि गल्लीबोळ नायजेरियन अन् रशियन माफिया यांनी नशेने धूत केले आहेत. सर्व प्रकारचे ड्रग्ज येथे सहज मिळते, ते काय राज्यकर्त्यांच्या पाठिंब्याशिवाय ? भाजपचे राज्य आणा, समुद्रकिनारी चालणार्या कॅसिनो बोटीचा जुगार बंद करू, असे सांगणार्यांचे राज्य आले, तेव्हा कॅसिनो बोटी चारवरून चाळीसवर पोचल्या. हे सर्व गुन्हे बिनबोभाट चालू आहेत. या गुन्हेगारांना राज्यकर्त्यांचे मुजरे झडत आहेत; पण मातृभाषा आणि मातृभूमीचा पुरस्कार करणार्या सुभाष वेलिंगकरांना गुन्हेगार ठरवून हे लोक मोकळे झाले.
३. मनोहर पर्रीकर हे गोव्यात विरोधी पक्षनेते असतांना त्यांनी याच मागणीचा रेटा लावला होता आणि वेलिंगकर यांच्या साहाय्याने त्यांनी आंदोलन उभे केले. त्याच भूमिकेमुळे भाजपसाठी गोव्यात सत्तेचे दार उघडले गेले. जे सत्तेवर आले, त्यांनी मराठीऐवजी पाद्य्रांच्या शाळांना ताकद दिली. १४१ इंग्रजी शाळांना सरकारी अनुदान देऊन वचनभंग केला.
४. गोव्यात अमित शहांचा काळे झेंडे दाखवून निषेध करण्यात आला. या विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करू, असे सुभाष वेलिंगकर यांनी म्हटल्याने त्यांना गोव्याच्या संघप्रमुख पदावरून हटवण्यात आले. गोव्याच्या भूमीत मातृभाषेची कबर खोदण्याचाच हा प्रकार आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात