नंदुरबार येथील हिंदु जनजागृती समितीपुरस्कृत सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे आवाहन !
नंदुरबार : हिंदूंचे प्रभावी संघटन व्हावे, हा लोकमान्य टिळकांंचा गणेशोत्सवामागील उद्देश साध्य करण्याच्या दृष्टीनेच शहरात गणेशोत्सव मंडळांचे संघटन करून हिंदु जनजागृती समितीच्या माध्यमातून सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे. राष्ट्र आणि धर्म संकटात असतांना सार्वजनिक गणेशोत्सवातील अपप्रकार न्यून करून आदर्श गणोशोत्सव साजरा करणे, हे प्रत्येक धर्मप्रेमी आणि राष्ट्रप्रेमी यांचे कर्तव्य आहे. गणेशभक्तांनी असा आदर्श ठेवून आणि भक्तीभावपूर्ण गणेशोत्सव साजरा करून श्रीगणेशाची कृपा संपादन करावी, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे डॉ. नरेंद्र पाटील यांनी येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत केले. हिंदु जनजागृती समिती पुरस्कृत सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाच्या वतीने या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
या पत्रकार परिषदेला शहरातील मानाचा गणपति असलेल्या श्री दादा गणपति मंडळाचे अध्यक्ष श्री. प्रेम सोनार, मानाचा गणपति असलेल्या श्री बाबा गणपति मंडळाचे उपाध्यक्ष श्री. हर्षल सोनार, कुणबी पाटील गणेश मंडळाच्या सौ. चेतना पाटील, जय बजरंग व्यायामशाळेचे व्यवस्थापक श्री. शेखर मराठे आणि हिंदु जनजागृती समितीच्या कु. रागेश्री देशपांडे उपस्थित होत्या.
डॉ. पाटील पुढे म्हणाले, गणेशोत्सव मंडळे संघटित होऊन सार्वजनिक महामंडळ स्थापन झाल्याने प्रशासनाकडून एक खिडकी योजना चालू करून घेतली गेली. त्यामुळे बर्याच अडचणी सुटल्या, तसेच गणेशभक्तांचे संघटन झाल्यामुळे यंदा महामंडळाच्या माध्यमातून प्रशासनाला गणेशोत्सव मंडळांची स्वतंत्र बैठक घ्यावी लागली. त्या माध्यमातून प्रशासनाशी चांगला समन्वय साधता आला.
या वेळी श्री दादा गणपति मंडळाचे अध्यक्ष श्री. प्रेम सोनार म्हणाले, मंडळाकडून गोळा केलेल्या वर्गणीचा वापर सामाजिक आणि धार्मिक कार्यासाठी केला जातो. गणेशोत्सवाच्या काळात शाळेच्या विद्यार्थ्यांना बोलावून सामूहिक अथर्वशीर्षाचे पठण करून घेतले जाते. गणेशोत्सवामागील संघटनाचा उद्देश साध्य व्हावा, यासाठी एक वॉर्ड एक गणपति आणि एक गाव एक गणपति अशा पद्धतीने हा उत्सव साजरा करावा.
श्री बाबा गणपति मंडळाचे उपाअध्यक्ष श्री. हर्षल सोनार या वेळी म्हणाले, आम्हीसुद्धा मिळालेल्या वर्गणीचा वापर सामाजिक आणि धार्मिक कार्यासाठीच करतो. मागे तापीला पूर आला होता, तेव्हा पूरग्रस्तांना या वर्गणीतूनच साहाय्य केले होते. तापी नदीत पाण्याची पातळी थोडी अल्प असल्याने विसर्जनाच्या दिवशी नदीत पाणी सोडल्यास मूर्तीविसर्जनाच्या दृष्टीने साहाय्य होईल.
कुणबी पाटील गणेश मंडळाच्या सौ. चेतना पाटील म्हणाल्या, आम्ही सामाजिक उपक्रमांवर अधिक भर देतो, तसेच वायूप्रदूषण टाळण्यासाठी आम्ही गुलालाऐवजी फुलांचा वापर करतो, तर ध्वनीप्रदूषण टाळण्यासाठी ढोलताशांऐवजी श्रीगणेशाची भजने लावतो. यंदा आम्ही व्यसनमुक्तीचा संदेश देण्याची आरास केली आहे, तसेच हिंदु जनजागृती समितीने बनवलेले क्रांतीकारकांचे प्रदर्शनही लावणार आहोत.
जय बजरंग व्यायामशाळेचे व्यवस्थापक श्री. शेखर मराठे म्हणाले, हिंदु जनजागृती समितीच्या पुढाकारामुळे आज शहरात गणेशभक्तांचे प्रभावी असे संघटन झाले आहे. त्या माध्यमातून गणेशभक्तांच्या अनेक अडचणीही सुटल्या आहेत आणि उत्सवाची धार्मिकता जपण्याच्या दृष्टीने सर्वांचे प्रबोधनही होत आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात