विजयवाडा (आंध्रप्रदेश) : वरूण देवाला प्रसन्न करण्यासाठी येथील इंद्रकिलाद्रीमधील कनकदुर्गा मंदिरात आरंभलेला ३ दिवसीय वरूण याग नुकताच संपन्न झाला. या वेळी वेदमंत्रांचे पठण करण्यात आले. या यज्ञाचा एक भाग म्हणून वरूण यागाच्या तिसर्या दिवशी पुरोहितांनी कृष्णा नदीचे पाणी आणून मल्लिकार्जुन स्वामी मंदिरात मुख्य देवतेला सहस्र घट कलशाभिषेक केला.
मंदिराचे साहाय्यक कार्यकारी अधिकारी आणि जनसंपर्क अधिकारी एस्. अच्युत रामय्या यांनी यागामध्ये पूर्णाहुती दिली. मोसमी पावसाला झालेला विलंब आणि असह्य उष्णता यांपासून लोकांना होणारा त्रास दूर व्हावा, या उद्देशाने वरूण यागाचे आयोजन करण्यात आले होते, असे रामय्या यांनी सांगितले.
इंद्रकिलाद्रीवरील शिवमंदिरात १२ वेदमूर्ती आणि १० पुरोहित यांनी वरूण जप याग पूर्ण केला. पुरोहितांच्या या गटाने प्रतिदिन वरूण मंत्राची १ लाख आवर्तने पूर्ण केली.
३ दिवसांमध्ये ३ लाख आवर्तने पूर्ण करण्यात आली, असे मंदिराचे मुख्य पुजारी विष्णुभोट्ला शिवप्रसाद शर्मा यांनी सांगितले.
पाऊस न पडल्यामुळे राज्यात निर्माण झालेली पाणीटंचाई दूर होऊन पाऊस पडू दे आणि लोकांना सुख आणि समृद्धी प्राप्त होऊ दे. जप, पारायण आणि अभिषेक यांमुळे वरूण देवा तू प्रसन्न हो आणि राज्यात मुबलक पाऊस पाड, अशी प्रार्थना या वेळी करण्यात आली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात